मुंबई बातम्या

… तर दहा वर्षात मुंबई सोडावी लागेल – आदित्य ठाकरे – Loksatta

वातावरण बदलाच्या परिणामांचे सर्वाधिक धोके असलेल्या शहरांपैकी मुंबई एक शहर असल्याने, मुंबईचा पहिला वातावरण कृती आराखड्याचा शुभारंभ राज्याचे पर्यावरण, पर्यटन आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी केला. हा आराखडा भविष्याचे अधिक चांगले नियोजन आणि वाढ राखत, वातावरणाशी अनुकूलता, धोके कमी करणे आणि सक्षमतेची खात्री देतो.

यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, आत्ता हीच वेळ कृती करण्याची असून, त्यात दिरंगाई झाली तर पुढील दशकभरात मुंबई शहर राहण्यासाठी अयोग्य ठरेल. ‘मुंबईच्या विकास आराखड्याची अंमलबजावणी करतानाच वातावरण बदलांबाबतची कृती मुख्य प्रवाहात आणल्यामुळे शहरातील नैसर्गिक रचनेचे संरक्षण, संवदेनशील समूहाची सक्षमता वाढवणे आणि शहराची समृद्ध वाढ होणे शक्य होऊन शहरातील हरितगृह वायूंच्या उत्सर्जनात प्रभावी घट करता येईल.’ असे ते म्हणाले.

वातावरण बदलाचे आव्हान हाताळण्यासाठी व्यापक आणि सर्वसमावेशक असे धोरण तयार करणे, हे या आराखड्याचे मुख्य उद्दीष्ट असल्याचे ठाकरे यांनी यावेळी मांडले. त्यासाठी वातावरण बदलाचे धोके कमी करणारे ठोस, प्रभावी आणि सर्वसमावेशक असे अनुकूल धोरण स्वीकारले जाईल.

डिसेंबर २०२० मध्ये मुंबई सी ४० शहरांच्या जाळ्यामध्ये (सी ४० सिटी नेटवर्क) सहभागी झाले असून शहराचा वातावरण कृती आराखडा २०२१ च्या अखेरीस तयार होईल. सी ४० ची मार्गदर्शक तत्त्वे आणि महत्वाकांक्षी निकषांना अनुसरुन हा आराखडा तयार होत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका, वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट इंडिया (डब्ल्यूआरआय) यांच्या तांत्रिक सहकार्याने हा आराखडा विकसित करत आहे. डब्ल्यूआरआय हे यामध्ये नॉलेज पार्टनर म्हणून कार्यरत आहेत.

हेही वाचा- उद्योगपती हेच राज्याचे ‘ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर’- मुख्यमंत्री

तज्ज्ञ आणि नागरिकांकडून सूचना स्वीकारण्यासाठी शुक्रवारच्या कार्यक्रमात ठाकरे यांनी मुंबई वातावरण कृती आराखड्याच्या (एमकॅप) संकेतस्थळाचे उद्घाटन केले. याद्वारे तज्ज्ञ आणि नागरिक त्यांच्या सूचना, शिफारशी २० सप्टेंबर २०२१ पर्यंत पाठवू शकतील. मुंबई वातावरण कृती आराखड्याच्या अंतर्गत असलेले संकल्पनाधारीत सहा कृती मार्ग, उपाय नोव्हेंबर २०२१ पर्यंत म्हणजेच संयुक्त राष्ट्रे वातावरण बदल परिषदेच्या (युनायटेड नेशन्स क्लायमेट चेंज कॉनफरन्स – COP26) नजीकच्या काळात तयार होण्याची शक्यता आहे.

मुंबई वातावरण कृती आराखडा

हा आराखडा सहा प्रकारच्या कृती मार्गांवर, उपायांवर लक्ष्य केंद्रीत करतो. ज्यायोगे विविध क्षेत्रांच्या अनुषंगाने धोके कमी करणाऱ्या अनुकूल अशा विशिष्ट धोरणामुळे अंमलबजावणी करण्याजोगे वातावरण प्रकल्प शहराच्या सक्षमतेत मदत करतील. घन कचऱ्याचे शाश्वत व्यवस्थापन, शहरातील हिरवळ आणि जैवविविधता, शहरातील पूर आणि जलस्रोतांचे व्यवस्थापन, उर्जा कार्यक्षमतेची उभारणी, स्वच्छ हवा आणि शाश्वत वाहतूक यंत्रणा हे सहा संकल्पनाधारीत कृती मार्ग आहेत.

विचारात बदल करण्याची गरज

बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आयएस चहल म्हणाले, “वातावरणीय बदलाच्या ताज्या घडामोडी पाहील्या तर आपल्या विचारात बदल करण्याची गरज आहे. नोंदी आणि माहितीवर देखरेख आणि व्यवस्थापन हे अचूक माहितीवर आधारलेले तातडीचे निर्णय घेण्यास उपयुक्त ठरेल. जेणेकरुन शहरातील सर्वाधिक संवेदनशील घटकांच्या सुरक्षेची खात्री देता येईल. कोरोना महामारीमध्ये मुंबईचा दृष्टीकोन असाच होता.”

हेही वाचा- पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांतून पाच वर्षांत मुंबईचे नवनिर्माण

आराखड्याच्या मांडणीसाठी मुंबईतील हरितगृह वायूंचे प्रमाण हे जागतिक निकषांचा वापर करुन काढण्यात आले आहे. त्यानुसार २०३० आणि २०१५ मध्ये उत्सर्जन घटविण्याच्या धोरणांचा मार्ग शोधला आहे. वातावरणीय बदल आव्हानाच्या परिस्थितीनुसार शहराच्या संवेदनशीलता मूल्यांकनासाठी उपग्रहाधारीत प्रतिमांचा वापर करुन गंभीर जोखमीचे घटक शोधले आहेत.

आराखडा ठोकळेबाज नाही

“नविन नैसर्गिक रचनांची उभारणी आणि संरक्षण केल्यास, पूरपरिस्थितीला सक्षमपणे तोंड देण्यायोग्य अस्तित्वातील आणि नियोजित पायाभूत सुविधांसाठी त्या मदतकारी ठरु शकतील. वातावरणीय बदल कृती आरखडा हा विकास आराखडा २०३४ च्या अंमलबजावणीसाठी आणि सक्षम २०३० दृष्टीकोनासाठी मार्गदर्श, दिशादर्शक दृष्टीकोन म्हणून पाहता येईल. हा आराखडा ठोकळेबाज नसून शहर प्रशासनास ठोस आणि सर्वसमावेशक अशा सक्षम मुंबईसाठी प्रवाही आणि प्रभावी काम करण्यास समर्पक असेल,” असे डब्ल्यूआरआय इंडिया रॉस सेंटर फॉर सस्टेनेबल सिटिजच्या सहयोगी संचालक लुबैना रंगवाला म्हणाल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.

First Published on August 27, 2021 4:45 pm

Web Title: launch of mumbai first environmental action plan tourism and etiquette minister aditya thackeray mumbai news srk 94

Source: https://www.loksatta.com/mumbai-news/launch-of-mumbai-first-environmental-action-plan-tourism-and-etiquette-minister-aditya-thackeray-mumbai-news-srk-94-2577839/