मुंबई बातम्या

मुंबई बंदराच्या ऐतिहासिक ठेव्याचे जतन – Loksatta

‘मेरिटाइम संग्रहालय’ उभारण्याचा मुंबई पोर्ट ट्रस्टचा निर्णय

अमर सदाशिव शैला
मुंबई : मुंबई बंदराची आणि त्याच्या अमूल्य अशा इतिहासाची माहिती सामान्य नागरिकांना मिळावी याकरिता मुंबई पोर्ट ट्रस्ट मेरिटाइम संग्रहालय स्थापणार आहे. मुंबई बंदराला १५० वर्षे होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ट्रस्टकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबईच्या आर्थिक वैभवाला चालना देण्यात बंदराचा वाटा मोठा आहे. ब्रिटिशांनी १८७३ मध्ये बॉम्बे पोर्ट ट्रस्ट स्थापन केला. ब्रिटिश काळापासून हे बंदर जागतिक व्यापाराचे एक मोठे केंद्र राहिले आहे. देशातून परदेशात मालाची निर्यात करण्यात, मुंबईतील उद्योग-व्यापाराच्या वाढीत बंदराचे मोठे योगदान आहे. मागील काही वर्षांत मुंबई बंदरातून होणारी बहुतांश मालवाहतूक जेएनपीटी बंदराकडे गेल्याने येथील व्यापार काहीसा घटला. दरम्यान या बंदराची ओळख, त्याचे ऐतिहासिक महत्त्व हा ठेवा जपण्यासाठी आणि त्याची माहिती सर्वसामान्य नागरिकांना व्हावी याकरिता पोर्ट ट्रस्टकडून संग्रहालयाची उभारणी केली जाणार आहे. यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टने स्वारस्य निविदा मागविल्या आहेत.

माझगाव भागात देशांतर्गत क्रुझ टर्मिनल आणि फेरी वॉर्फच्या नजीक १९३१ चौरस मीटर क्षेत्रावर हे संग्रहालय उभे करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी बंदराच्या ताब्यातील सध्याची ८०० चौरस मीटर क्षेत्रफळावरील वास्तू दिली जाणार आहे. ही वास्तू तळमजला अधिक त्यावरील एक मजला अशी आहे. सागरी कलाकृती, शिल्प, नकाशे, ऐतिहासिक माहिती, इन्फोग्राफिक्स, प्रतिकृती (मॉडेल), हस्तकला, जुन्या काळातील फोटो, मुंबई पोर्ट ट्रस्टकडे असलेल्या जुन्या काळातील वस्तू आदी संग्रह येथे पाहता येईल. त्याचबरोबर समुद्रातील सर्वेक्षणासाठी उपयुक्त वस्तू, मुंबई पोर्ट ट्रस्टकडे असलेला वाफेवरचा रोड रोलर, समुद्राची खोली मोजणाऱ्या यंत्रणाही या संग्रहालयात ठेवण्यात येतील. त्याचबरोबर आधुनिक काळातील जहाजांसाठी लागणारी मल्टीमीडिया सामग्रीही याप्रदर्शनात असेल. त्याचबरोबर सागरी संस्थांशी संबंधित प्रदर्शने आणि कार्यक्रमांचेही आयोजनही येथे केले जाणार आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टला १५० वर्षे होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हे संग्रहालय सुरू करण्याचा प्रयत्न आहे. सल्लागार नियुक्तीसाठी स्वारस्य निविदा मागविण्यात आल्या आहेत,’ अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.

First Published on August 5, 2021 1:04 am

Web Title: preservation historical port mumbai port ssh 93

Source: https://www.loksatta.com/mumbai-news/preservation-historical-port-mumbai-port-ssh-93-2552649/