मुंबई बातम्या

तिसऱ्या लाटेसाठी मुंबई महापालिका सज्ज; केले ‘हे’ नियोजन – Maharashtra Times

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबई महापालिकेने करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेवर मात करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. तिसरी लाट आल्यास रुग्णांच्या उपचारांमध्ये त्रुटी राहू नये म्हणून जम्बो करोना केंद्रांमध्ये २० हजार खाटांचे नियोजन केले जात आहे. त्यामुळे करोनारुग्णांची संख्या वाढल्यास त्यांच्या सुविधेत कोणतीही कमतरता राहणार नसल्याचा दावा केला जात आहे.

मुंबईत सध्या करोनाचा कहर कमी असला तरीही तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून पालिकेने तयारी सुरू केली आहे. त्यासाठी पालिकेकडून भायखळ्यातील रिचर्डसन क्रूडास, मालाड, दहिसर, नेस्को, वरळी, मुलुंड इथल्या सहा जम्बो करोना केंद्रांमध्ये २० हजार खाटांची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. त्याचप्रमाणे, यापूर्वी जाहीर केल्यानुसार महालक्ष्मी रेसकोर्स, सोमय्या मैदान आणि कांजुरमार्ग येथे पुढील २५ दिवसांच्या कालावधीत जम्बो करोना केंद्रे सेवेत आणली जाणार आहेत. त्याचप्रमाणे केईएम, सायन, नायर, कूपरसह इतर १६ उपनगरीय रुग्णालये, नर्सिंग होममध्येही खाटांची व्यवस्था केली जाणार आहे. त्याजोडीला खासगी रुग्णालयांमध्ये आवश्यकतेनुसार सुविधा उपलब्ध केल्या जातील, असे पालिकेचे अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी बुधवारी सांगितले.

महालक्ष्मी रेसकोर्स येथे ५०० खाटांच्या क्षमतेचे केंद्र १५ ऑगस्टपर्यंत सुरू केले जाणार आहे, तर कांजुरमार्ग केंद्रात ९०० खाटांची व्यवस्था ठेवण्यात येणार आहे. सोमय्या मैदानातील जम्बो करोना केंद्रात १,२०० खाटांची व्यवस्था केली जाईल. तसेच, मुलांसाठी १,५०० खाटांची व्यवस्था केली जाणार असून त्यात ७० टक्के ऑक्सिजन सुविधा असलेल्या खाटा आणि १० ते १५ टक्के आयसीयू खाटांची सुविधा राहील.

मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्क्यांवर पोहोचले असतानाच जम्बो करोना केंद्रांतील रुग्णसंख्या देखील कमी झाली आहे. गोरेगावमधील नेस्को केंद्रात सध्या १५० रुग्ण दाखल असून रिचर्डसन क्रुडासमध्ये १० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्याचवेळी रुग्णांची संख्या घटली असल्याने दहिसर, बीकेसी, मुलुंडमधील जम्बो करोना केंद्रे बंद आहेत. सद्यस्थितीत बीकेसी केंद्रात २,३०० खाटा, वरळीच्या एनएससीआय केंद्रात ५०० खाटा उपलब्ध आहेत. तर, अंधेरीतील सेव्हन हिल्समधील १,८५० पैकी ७०० खाटा भरल्या आहेत.

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/mumbai-municipal-corporation-has-prepared-to-prevent-third-wave-of-coronavirus/articleshow/84625877.cms