मुंबई बातम्या

लोकलबाबत दिशाभूल! ठोस माहिती नसताना मंत्र्यांची प्रसिद्धीसाठी वक्तव्ये – Maharashtra Times

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक निर्बंधाचा भाग म्हणून सर्वसामान्यांना लोकल प्रवास (Mumbai Local Trains) बंद करण्यात आला आहे. साहजिकच यामुळे मुंबईबाहेरून येणाऱ्या लाखो नागरिकांना रोजगाराला मुकावे लागले आहे. परिणामी लोकलसेवा कधी सुरू होणार याची आतुरतेने वाट पाहिली जात असली तरी प्रादुर्भाव वाढण्याच्या भीतीने राज्य सरकार याबाबत इच्छूक नाही. अशावेळी राज्यातील काही मंत्री मात्र कोणतीच ठोस माहिती नसताना विनाकारण लोकल आज सुरू होईल, उद्या होईल, करोनाची आकडेवारी पाहून निर्णय घेतला जाईल अशाप्रकारची उत्तरे देऊन जाणीवपूर्वक प्रसिद्धीच्या झोतात राहताना दिसत असल्याचा सूर प्रवाशांच्या चर्चेतून उमटत आहे.

राज्यात गेल्या वर्षभरापेक्षा अधिक काळ लॉकडाऊनची परिस्थिती असून, सर्वत्र कडक निर्बंध आहेत. मध्यंतरी काही कालावधीसाठी सुरुवातीला महिलांसाठी तसेच ठरावीक वेळेसाठी सर्वसामान्यांसाठी लोकलसेवा सुरू करण्यात आली होती. ते सोडल्यास बरेच महिने सामान्यांना प्रवासमुभा देण्यात आलेली नाही. मुंबईबाहेरून लाखो नागरिक नोकरीच्या निमित्ताने, छोटा-मोठा व्यापार करण्याच्या उद्देशाने तर काहीजण निव्वळ दोन वेळच्या अन्नाचे पैसे कमावता येतील, यासाठी मुंबईत येत असतात. मात्र लोकलसेवा बंद केल्याने त्यांच्या रोजगारावर एकप्रकारे संकट आले असून, ते लोकल प्रवासाची सेवा आतुरतेने वाट पाहत आहेत.

वाचा:एसटीचा प्रवास खासगीकरणाच्या दिशेने

लोकलबाबत कोणताही निर्णय विचारपूर्वकच घ्यावा लागणार आहे. त्यासाठी तज्ज्ञांशी चर्चा करणे अपेक्षित आहे. चर्चेनंतर जो काही निर्णय घेण्यात येईल याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः नागरिकांना देतील. दर शुक्रवारी टास्क फोर्सद्वारे राज्यातील करोनास्थितीचा आढावा घेतला जातो. त्यानंतर निर्बंधांबाबत योग्य तो निर्णय घेतला जातो, असे वक्तव्य वडेट्टीवार यांनी शनिवारी केले. सध्या राज्यात करोनास्थिती नियंत्रणात येत आहे. मात्र या विषाणूचा धोका अद्याप कमी झालेला नाही. दररोज नव्याने करोनाबाधित होणाऱ्यांची संख्या अजूनही मोठी आहे. त्याचबरोबर तिसऱ्या लाटेचा धोकाही वाढताना दिसत आहे. अशा स्थितीत वस्तुस्थितीचा योग्य आढावा घेतल्यानंतरच निर्बंध हटवण्याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले

दरम्यान, लोकलमध्ये सामान्यांना प्रवासमुभा कशाप्रकारे देता येईल का हे आम्ही तपासून पाहत असल्याचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी नमूद केले. लोकलप्रवासासोबत तिसऱ्या लाटेचा विचार करावा लागतोय. नागरिकांना त्रास होतोय हे मान्य आहे. सगळ्या निकषांचा आम्ही विचार करतोय. जोपर्यंत ५० ते ६० टक्के नागरिकांना लसीकरण होत नाही, तोपर्यंत निर्णय घेणे कठीण आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

वडेट्टीवार, अस्लम शेख आघाडीवर

निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नागरिकांशी संवाद साधत असतात. त्यांचे भाषण आहे हे समजल्यानंतर दरवेळी लाखो प्रवाशांच्या आशा पल्लवीत होतात. मात्र त्यांच्याकडूनही लोकल प्रवासाबाबतची ठोस माहिती मिळत नाही. अशातच राज्य सरकारमधील काही मंत्री मात्र लोकल सेवेबाबत अधूनमधून उलटसुलट विधाने करीत असल्याचे दिसते. यात काँग्रेसचे विजय वडेट्टीवार आणि अस्लम शेख हे दोन मंत्री आघाडीवर असल्याचे निरीक्षण सर्वसामान्य प्रवाशांनी नोंदवले.

‘मुख्यमंत्र्यांनी ठोस माहिती द्यावी’

मंत्र्याच्या वक्तव्याविषयी सर्वसामान्य प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे. एकतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी लोकल कधी सुरू होणार याविषयी ठामपणे सांगायला हवे. आणखी सहा महिने लोकलसेवा सुरू होणार नाहीत, असेही त्यांनी सांगितल्यास त्याला कोणाची हरकत नसावी. त्यामुळे प्रवासाच्या इतर साधनांविषयी योग्य नियोजन करता येईल. मात्र ठाकरे यांच्याऐवजी काही मंत्री माहिती नसताना विनाकारण उलटसुलट माहिती देऊन सर्वसामान्य प्रवाशांना झुलवण्याचे काम करीत असल्याच्या प्रतिक्रिया प्रवाशांकडून व्यक्त होत आहेत.

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/mumbai-local-train-ministers-are-misleading-citizens-over-local-trains-says-mumbaikars/articleshow/84309389.cms