मुंबई बातम्या

मुंबई : नियम मोडणाऱ्या तीन हॉलमालकांवर गुन्हे – Maharashtra Times

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबईत नियंत्रणात आलेला करोना पुन्हा वाढू लागल्याने महापालिकेने कठोर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. सांताक्रुझ येथील कलिना परिसरातील लग्न समारंभात नियमांचे पालन न करणाऱ्या तीन हॉलमालकांवर शुक्रवारी रात्री वाकोला पोलिस ठाण्यात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. लग्नात फक्त ५० जणांनाच उपस्थित राहण्याची परवानगी असताना तीनही हॉलमध्ये प्रत्येकी २०० ते ३००हून अधिक वऱ्हाडी जमले होते. सुरक्षित अंतराचे उल्लंघन करण्यात आले होते. तसेच बहुसंख्य वऱ्हाड्यांनी मास्कदेखील लावले नव्हते.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत पुन्हा रुग्णवाढ होत असून तीन ते चार दिवसांपासून एक हजार रुग्णांची नोंद होत आहे. करोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी पालिकेने प्रत्येक विभागात भरारी पथके नेमून लग्नसोहळे, समारंभ, सांस्कृतिक-राजकीय कार्यक्रम आणि गर्दी होणाऱ्या ठिकाणी धाड टाकली जात आहे. शुक्रवारी रात्री सीएसटी रोड कलिना, सांताक्रुझ पूर्व येथील ग्रँड यशोधन लॉन, गुरूनानक हॉल आणि नूर बँक्वेट या ठिकाणी धाड टाकली असता तिन्ही ठिकाणी करोना खबरदारीचे सर्व नियम मोडून कार्यक्रम सुरू असल्याचे निदर्शनास आले.

पालिकेच्या पथकाने ही गर्दी कमी करण्यास सांगितले. मात्र आयोजक व हॉल संचालकांनी कोणतीही पावले उचलली नाहीत. त्यामुळे यशोधन हॉलचे लग्न कार्यालय प्रमुख रफिक हसन शेख यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी गर्दी असलेला कार्यक्रमही बंद कण्यात आला. तर ५० फुटांवरील गुरूनानक हॉलचे शाम खान आणि नूर बँकेट हॉलचे लग्न कार्यालयप्रमुख समीर अब्दुल सत्तार फारूक यांना ताब्यात घेऊन वाकोला पोलिस ठाण्यात कारवाईसाठी आणले गेल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली.

विनामास्क बेफिकिरी कायम

करोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क महत्त्वपूर्ण ठरत असल्याने सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र याकडे अनेकजण दुर्लक्ष करीत असल्याने पालिका आणि पोलिस कारवाई करत आहेत. पालिकेकडून शुक्रवारी एका दिवसात १५ हजार २८३ जणांवर कारवाई करून ३० लाख ५६ हजार ६०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

३९ लाखांहून अधिक दंड वसूल

मुंबई पोलिसांनी ४ हजार ५३ जणांवर कारवाई करून आठ लाखांहून अधिक दंड वसूल केला. तर पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वेकडून मास्कशिवाय फिरणाऱ्या ५१३ जणांवर कारवाई करण्यात आली असून १० लाख दोन हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. एका दिवसांत पालिका, पोलिस व रेल्वेने १९ हजार ८४९ जणांवर कारवाई करून ३९ लाख ६९ हजार ८०० रुपये दंड वसूल केला.

ठाणे जिल्ह्यात ६२५ नवीन रुग्ण

ठाणे : जिल्ह्यात शनिवारी ६२५ नवीन रुग्ण आढळले. तर ठाणे शहर १९९, कल्याण-डोंबिवली १८७, नवी मुंबई १०१, मिरा-भाईंदर ५१, उल्हासनगर १६, भिवंडी ५, अंबरनाथ १३, बदलापूर ३५, ठाणे ग्रामीणमध्ये १८ रुग्णांची वाढ झाली आहे. जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या दोन लाख ६४ हजार २५० वर गेली असून आतापर्यंत दोन लाख ५२ हजार २९ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या पाच हजार ९५३ रुग्ण उपचार घेत आहेत. तर दिवसभरात पाच रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे करोनाबळीचा आकडा वाढत ६ हजार २६८ झाला आहे.

Source: https://maharashtratimes.com/crime-news/mumbai-police-file-fir-against-three-wedding-owners-for-violate-covid-norms/articleshow/81257038.cms