मुंबई बातम्या

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर पोलिसांच्या आश्रयाने लूटमार – Loksatta

मदतनिसांमार्फत वाहनचालकांकडून पैशांची वसुली

पुणे : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर वाहनांची चौकशीच्या नावाखाली अडवणूक करू नये, असे स्पष्ट आदेश असताना कुसगाव टोलनाक्याजवळ महामार्ग पोलिसांच्या चौकीसमोरच मालवाहू वाहनांना अडवून आणि मोटारींना थांबवून डिकी तपासणीच्या नावाखाली बिनबोभाट पैसे उकळले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी महामार्ग पोलिसांच्या मदतीला दिलेल्या महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना पैसे उकळण्याची ‘कामगिरी’ देण्यात आली असून, या प्रकाराला महामार्ग पोलिसांतील काहींचा थेट आश्रय असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग हा देशातील सर्वाधिक गजबजलेला आणि महत्त्वाचा द्रुतगती मार्ग म्हणून ओळखळा जातो. मार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्याची जबाबदारी महामार्ग पोलीस दलावर (हायवे पोलीस) असून, महामार्ग पोलिसांच्या मदतीला महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळातील सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. द्रुतगती मार्गावर एखादी दुर्घटना घडल्यास किंवा वाहतूक विस्कळीत झाल्यास महामार्ग पोलिसांना मदत करण्यासाठी सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र, ही मंडळी सध्या दुसऱ्याच ‘कामगिरी’त मशगुल असल्याचे दिसून येत आहे. कुसगाव टोलनाक्यावर महामार्ग पोलीस चौकीसमोर थांबलेले सुरक्षा रक्षक मालवाहू वाहनांना अडवून त्यांच्याकडून पैसे घेत आहेत. त्याचप्रमाणे मोटार चालकांनाही अडवून मोटारीची डिकी किंवा अन्य तपासणीच्या नावाने त्यांची अडवणूक केली जात असून, त्यांच्याकडूनही चिरीमिरीची वसुली होत आहे. याबाबतचा सज्जड पुरावा असलेली चित्रफीत एका सजग नागरिकाने ‘लोकसत्ता’कडे पाठविली आहे.

महामार्ग पोलीस दलाच्या खंडाळा येथील सहायक निरीक्षक सुमय्या बागवान यांच्याकडे विचारणा करण्यात आली असता त्यांनी वरिष्ठांनी वाहनांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत, असे ‘लोकसत्ता’च्या स्थानिक वार्ताहराला सांगितले. ‘लोकसत्ता’कडे उपलब्ध असलेल्या चित्रफितीमध्ये आणि सजग नागरिकांनी केलेल्या तक्रारीनुसार वाहतूक पोलिसांच्या मोटारीपासून काही अंतरावरच मदतनीस मालवाहू वाहनांना अडवित आहेत. कुठलीही कटकट नको म्हणून वाहनधारकही सुरक्षा रक्षकांना निमूटपणे पैसे देऊन मोकळे होत आहेत. या मंडळींकडून सर्वसामान्यांच्या मोटारीही ठरवून थांबविल्या जात आहेत. वाहनधारकाकडे काही वेळ चौकशी केल्यानंतर मोटारीची डिकी तपासली जाते. त्यातून मोटारधारकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असून, त्यांच्याकडूनही चिरीमिरीची वसुली केली जात आहे.

वसुलीच्या माहितीपासून वरिष्ठ अनभिज्ञ?

द्रुतगती मार्गावर वाहनचालकांना अडवून त्यांच्याकडून पैसे घेण्यात येत असल्याच्या प्रकाराच्या माहितीबाबत महामार्ग पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अनभिज्ञता दर्शविली. पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावरील लुटमारीचा प्रकार ‘लोकसत्ता’च्या प्रतिनिधीने महामार्ग पोलीस दलाचे पुणे विभागाचे अधीक्षक संजय जाधव यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यांना याबाबत विचारले असता या सर्व प्रकरणाची तातडीने माहिती घेऊन कार्यवाही केली जाईल, असे जाधव यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.

First Published on July 5, 2021 3:13 am

Web Title: robbery pune mumbai expressway help police ssh 93

Source: https://www.loksatta.com/pune-news/robbery-pune-mumbai-expressway-help-police-ssh-93-2519041/