मुंबई बातम्या

मुंबई नक्की कोणाची? वाचा मायानगरीचा हजारो वर्षांपूर्वीचा खरा आणि रंजक इतिहास – News18 लोकमत

अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut Vs Shiv sena) आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्या वाकयुद्धामुळे मुंबई (Mumbai) सध्या जोरदार चर्चेत आली आहे. मुंबई नेमकी कोणाची हा वाद पुन्हा रंगला आहे. पण जरा हा इतिहास (History of Mumbai) वाचून पाहा

  • Share this:

मुंबई, 15 सप्टेंबर : अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut on Mumbai)आणि शिवसेना (Shiv sena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या वाकयुद्धामुळे मुंबई (Mumbai) सध्या जोरदार  चर्चेत आली आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत (Sushant singh Rajput case) याच्या मृत्यूने वाद निर्माण झाला आणि नेहमीसारखा मुंबई कोणाची? मराठी माणूस मुंबई स्पिरिट वगैरे गोष्टी चर्चेत आल्या. पण मुंबईचा खरा इतिहास (History of Mumbai) माहीत आहे का?  हजारो, लाखो वर्षांपूर्वीपासूनचा मुंबईचा इतिहास मोठा रंजक आहे.

ऐतिहासिक काळाशी नाते

मुंबईची भौगोलिक रचना बघितल्यास आपल्या दिसते की, मुंबई एक नैसर्गिक बंदर आहे.  यामुळे ते भारतातील दळणवळणाचे एक मोठे माध्यम बनले आहे. मुंबईचं महत्त्व वाढवणारं हे एक ऐतिहासिक कारण.  पण व्यापारी बंदराचं महत्त्व वाढण्यापूर्वीपासून इथे वस्ती होती. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या बीबीसीच्या रिपोर्टनुसार, प्रागैतिहासिक काळापासून या ठिकाणी लोकांचा अधिवास आहे. 1930 साली कुलाब्याच्या समुद्र तटावर 25 लाख वर्षं जुने दगड आढळून आले होते. त्या काळात मानव या प्रकारच्या दगडांचा वापर हत्यार म्हणून करीत असे.नरेश फर्नांडिस यांचं पुस्तक सिटी एड्रीप्टी यात यांचा उल्लेख आहे.

मुंबईत सर्वात आधी राहणारे आद्य रहिवासी म्हणजे मच्छिमार. हे गुजरातहून आलेले होते आणि ते आपल्यासोबत मुंबईची पहिली देवी मुंबादेवी घेऊन आले होते, अशीही एक मान्यता आहे. प्राचीन भारतात राजवटी बदलल्या, संस्कृती बदलली तसे मुंबईत अनेक ऐतिहासिक बदल झाले. मुंबईच्या इतिहासचे चार भाग करता येतील.

एका रिपोर्टनुसार,  इसवीसन पूर्व 250 मध्ये मौर्यवंशाचे प्रमुख कोकणात गेले होते. अर्थातच मुंबईतही ते आले होते.  तेव्हापासून मुंबईवर अनेक राज्यकर्त्यांचं राज्य राहिलं. मौर्यांनंतर या ठिकाणी सातवाहनांचा प्रभाव राहिला. तसंच त्यानंतर क्षत्रप वंश, राष्ट्रकूट, यादव आणि शिलाहार वंश यांचं राज्य होतं. व्यापाऱ्यांचं  मुंबईवर नेहमीच अधिक प्रभुत्व राहिलं. कारण अर्थातच समुद्र आणि मुंबईचा भूगोल. नैसर्गिक बंदरामुळे मुंबईत व्यापाऱ्यांची वर्दळ नेहमीचीच होती.

मुस्लीम आणि पोर्तुगीजांचा काळ

13 ते 15 व्या शतकात गुजरातच्या सुलतानाचे  मुंबईवर प्रभुत्व राहिले. पण मुंबईचं महत्त्व वाढवलं परकीयांनीच. 1534 मध्ये मुंबई पोर्तुरगीजांच्या हाती गेली. त्यांनी मुंबईला आपल्या नौसेनेचं केंद्र बनविले. त्यानंतर लवकरच मुंबई इंग्रजांच्या नजरेत आली आणि त्यांनी मुंबई मिळविण्यासाठी अनेक प्रयत्न केले. 23 जून 1661 मध्ये इंग्लडचा राजा चार्ल्स द्वितीय आणि पोर्तुगीज राजकुमारी कॅथरीलच्या विवाहाप्रसंगी पोतुगीजांनी मुंबई इंग्रजांना चक्क आंदण म्हणून दिली.

इंग्रजांचा काळ

इंग्रजांच्या काळात मुंबईत व्यापाऱ्यांचा  प्रभाव वाढला. मुंबईचं महत्त्व खऱ्या अर्थाने वाढवलं इंग्रजाने. त्यांनी सुरतऐवजी मुंबईतून व्यापाराला प्राधान्य दिलं. 18 व्या शतकात इंग्रजांचा पोर्तुगीजांशी संबध तुटल्यानंतर मुंबईत प्रगतीचे वारे वाहू लागले.  दुसरीकडे मराठ्यांची ताकद वाढली होती. इंग्रजांना मुंबई हाताततून जाईल याचं भय सतावत होतं. मराठे जेव्हा वसईपर्यंत आले आणि मुंबईकडे मार्गक्रमण करू लागले तेव्हा इंग्रजांनी त्यांच्याशी समझोता केला. मात्र ते संतुष्ट नव्हते. मुंबई मराठ्यांच्या हाती जाऊ नये म्हणून इंग्रजांनी शिकस्त केली. मुंबईच्या चौफेर खंदक खणले. त्या काळी यासाठी अडीच लाखापर्यंत खर्च आला असं सांगतात. यासाठी मुंबईच्या व्यापाऱ्यांनी पैसा दिला होता. 1761 मध्ये पानीपतच्या लढाईत मराठ्यांचा पराभव झाला आणि मराठ्यांनी ताकद कमी झाली. तेव्हा इंग्रजांना मुंबईबद्दल दिलासा मिळाला.

19 व्या शतकात पेशवाई संपली आणि मराठ्यांची सत्ताही संपुष्टात आली.  मुंबईचा त्याच वेळी एक आर्थिक केंद्र म्हणून वेगळा विकास सुरू झाला होता. मुंबई न्यायपालिका, आर्थिक व्यवस्था यासह ते शिक्षणाचंही केंद्र बनू लागलं. 1853 मध्ये देशातल्या पहिल्या वहिल्या रेल्वेमुळे मुंबईच्या विकासाला एक वेगळी दिशा मिळाली. 1857 नंतर मुंबई विद्यापीठ स्थापन झालं. नंतर मुंबईत महापालिका आली. अनेक ऐतिहासिक इमारती मुंबईत याच काळात उभ्या राहिल्या.

20 व्या शतकात भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाला मोठं महत्त्व प्राप्त झाले. फिरोजशहा मेहतांनंतर लोकमान्य टिळकांमुळे मुंबईला मोठं महत्त्व प्राप्त झालं. स्वातंत्र्यानंतर 1956 मध्ये मुंबई एक स्वतंत्र राज्य बनवण्यात आलं. यामध्ये कच्छ आणि सौराष्ट्राचा काही भाग होता. 1960 मध्ये भाषेच्या  आधारावर राज्यांचं पुनर्गठन झालं आणि महाराष्ट्र आणि गुजरात  ही दोन वेगळी राज्य झाली. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा यासाठी मोठी चळवळ उभी राहिली होती. त्यासाठी काही हुतात्म्यांनी रक्त सांडलं. अखेर महाराष्ट्राला मुंबई मिळाली. मुंबई महाराष्ट्राची राजधानी झाली. मुंबईत पूर्वीच्या काळापासून असलेलं व्यापाऱ्यांचं  महत्त्व वाढतच राहिल्याने आणि आंतरराष्ट्रीय आयात निर्यातीचं प्रमुख केंद्र असल्याने मुंबईचा नेहमी विकास होत राहिला. इतकी वर्षं मुंबई अविरत सुरू आहे. न थकता धावते आहे. अनेक संकटं या शहराने पचवली, पण हे शहर मान उंचावून उभं आहे.

Published by:
अरुंधती रानडे जोशी

First published:
September 15, 2020, 7:57 AM IST

Source: https://lokmat.news18.com/lifestyle/whose-mumbai-debate-history-of-mumbai-dating-back-25-lakh-years-479726.html