मुंबई बातम्या

कॅन्सरग्रस्तांच्या नातेवाईकांना बॉम्बे डाईंगमध्ये 100 घरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा यशस्वी तोडगा – Saamana (सामना)

लालबागमधील हाजीकासम चाळीच्या जागेवरील इमारतींत 100 घरे कॅन्सर रुग्णांच्या नातेवाईकांना देण्याच्या निर्णयाला स्थानिकांचा असलेला विरोध लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावर यशस्वी तोडगा काढला. लालबागमधील स्थानिक रहिवाशी आणि कॅ न्सर रुग्ण यांच्या हिताचा निर्णय घेत टाटा रुग्णालयापासून जवळ भोईवाडय़ातील बॉम्बे डाईंग इमारतीतील 100 घरे कर्करोगग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांच्या निवासासाठी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला. त्यांच्या या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.

टाटा रुग्णालयात येणाऱया कॅन्सर रुग्णांच्या नातेवाईकांसाठी 100 सदनिका हाजी कासम चाळीत देण्याचा निर्णय गृहनिर्माण विभागाने घेतला होता. मात्र या निर्णयाला लालबागमधील स्थानिकांचा तीव्र विरोध होता. शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून स्थानिकांच्या भावना याविरोधात तीव्र असल्याचे सांगितले. स्थानिकांच्या भावना लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी तत्काळ या निर्णयाला स्थगिती दिली. हाजीकासम चाळीत कर्करोगग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांना घरे देण्याबाबत प्रतीकात्मकरीत्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते चावीवाटप झाले असल्याने मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी कोणावरही अन्याय होणार नाही अशी भूमिका घेत आज मंत्रिमंडळ बैठकीआधी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याशी चर्चा केली. अन्य पर्यायांबाबत झालेल्या चर्चेनंतर बॉम्बे डाइंग येथील इमारतींतील 100 सदनिका कर्करोगग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांना देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला. भोईवाडय़ातील ही जागा टाटा रुग्णालयापासून अगदी जवळ असल्याने कर्करोगग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांनाही दिलासा मिळाला असून लालबागमधील रहिवाशांच्या तक्रारीचेही निवारण झाले आहे.

image

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाचे स्वागत – जितेंद्र आव्हाड

गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या निर्णयाची माहिती पत्रकार परिषद घेऊन दिली. ते म्हणाले, हाजी कासम इमारतीतील घरे देण्यास स्थानिकांनी आक्षेप घेतल्यानंतर तेथील आमदारांनी तो प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या दरबारी नेला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्याला स्थगिती दिली; पण ती स्थगिती देतानाच पॅबिनेटच्या आधी मुख्यमंत्र्यांनी मला बोलावून घेतलं आणि त्याच परिसरात जागा शोधा आणि ताबडतोब त्याबाबत कारवाई करा असं सांगितले. आम्ही शोध घेतला असता बॉम्बे डाईंगच्या 22 इमारतींमधील 100 सदनिका देता येतील असा निर्णय मुख्यमंत्र्यांनी दिला असून आम्ही त्याचं स्वागत करतो. महाविकास आघाडीमध्ये कोणताही विसंवाद नाही. विसंवाद असता तर 24 तासांच्या आत निर्णय झाला नसता. निर्णय फिरवला गेला असला तरी त्याच तत्परतने जवळजवळ एक किमीच्या अंतरावर आला असल्याचं त्यांनी सांगितलं. मला आनंद आहे की, काल मिळालेल्या स्थगितीवर लगेच निर्णय झाला असून परत तेवढय़ाच जागा, तेवढय़ाच जवळ, चांगल्या परिसरात कॅन्सर रुग्णांना देऊ शकलो.

स्थानिकांचा विरोध कशासाठी?

z हाजी कासम चाळीच्या जागेवर सुखकर्ता आणि विघ्नहर्ता या पुनर्विकसित इमारतींमध्ये 700 मराठी कुटुंबे राहतात. मतदारसंघातील येथील 100 सदनिका कर्करुग्णांच्या नातेवाईकांना राहण्यासाठी देण्याच्या म्हाडाच्या निर्णयामुळे या रहिवाशामध्ये भीतीचे वातावरण पसरले. स्थानिकांनी ही बाब शिवसेना आमदार अजय चौधरी यांच्या निदर्शनास आणल्यानंतर त्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले. कर्करोगग्रस्तांना येथील सदनिका देण्याच्या निर्णयाला तत्काळ स्थगिती द्यावी आणि याऐवजी भोईवाडा येथील म्हाडा गृहसंकुलामधील तयार इमारतींमधील सदनिका टाटा रुग्णालयास द्याव्यात, अशी मागणी अजय चौधरी यांनी पत्रातून मुख्यमंत्र्यांना केली होती. त्याची दखल घेत ‘तपासून अहवाल सादर करावा, तोपर्यंत स्थगिती देण्यात येण्यात येत आहे’ असे आदेश मुख्यमंत्र्यांनी गृहनिर्माण विभागाच्या प्रधान सचिवांना दिले होते.

बीडीडी चाळीतील रहिवाशांसाठी संक्रमण शिबीर

बीडीडी चाळीचा पुनर्विकास होईपर्यंत ज्या चाळी तोडल्या जातील तेथील रहिवाशांना राहण्यासाठी संक्रमण शिबीर म्हणून हाजी कासममधील या 100 घरांचा वापर होऊ शकतो, अशी माहिती गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली.







Source: https://www.saamana.com/cancer-patient-relatives-family-100-house-in-hajikasam-chawal-building/