मुंबई बातम्या

मुंबईतील शाळा पुढील आदेशापर्यंत बंदच राहणार – Maharashtra Times

मुंबईतील शाळा पुढील आदेश मिळेपर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. मुंबई महानगरपालिका हद्दीतील शाळा १५ जानेवारीपर्यंत बंद होत्या. त्या पुढील सूचना मिळेपर्यंत बंदच राहतील. दरम्यान, राज्य सरकारने मात्र इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू करण्यास हिरवा कंदिला दाखवला आहे. अंतिम निर्णय मात्र स्थानिक प्रशासनाने घ्यायचा आहे.यासंदर्भातल्या परिपत्रकात मुंबई महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी म्हटले आहे की मुंबईतील करोनास्थिती नियंत्रणात आहे, मात्र देशात अन्य राज्यातील करोनास्थिती पाहता आणि अन्य देशातील करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका हद्दीतील शाळा पुढील आदेश मिळेपर्यंत बंदच राहतील. शाळा तूर्त बंदच ठेवण्यात येणार असल्याची माहिती देणारे मुंबई महानगरपालिकेचे परिपत्रक पुढीलप्रमाणे –
मुंबई महानगरपालिकेचे परिपत्रक
राज्यातील पाचवी ते आठवीच्या शाळा २७ जानेवारीपासून
राज्यातील इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा २७ जानेवारीपासून सुरु करण्यासाठी राज्य सरकारने हिरवा कंदिल दाखवला आहे. अंतिम निर्णय मात्र स्थानिक प्रशासनावरच सोडण्यात आला आहे. स्थानिक परिस्थितीनुसार तेथील स्थानिक प्रशासनाने याबाबतचा निर्णय घ्यावयाचा आहे. अर्थात यासाठी पालकांची संमती, शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी आदी सर्व यापूर्वीचे नियम यापुढेही लागू राहणार आहेत. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.

वर्षा गायकवाड म्हणाल्या की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर हा शाळा उघडण्यासंबंधीचा प्रस्ताव मांडण्यात आला. करोनासंदर्भातली खबरदारीच्या सर्व उपाययोजना अंमलात आणून, सर्व नियम पाळूनच शाळा सुरू करा अशा सूचनाही यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.
मुंबई महापालिकेची शाळांना ऑफलाइन परीक्षा घेण्याची परवानगी

JEE Main च्या ‘या’ बोगस वेबसाइटवरून भरू नका अर्ज; NTA ने केले सावध

Source: https://maharashtratimes.com/career/career-news/bmc-announced-no-school-reopening-in-mumbai-till-further-order/articleshow/80289817.cms