मुंबई बातम्या

मुंबई महापालिकेच्या सफाई कामगाराच्या पत्नीची ओढाताण – Maharashtra Times

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

नवऱ्याच्या निधनानंतर त्याचा भविष्य निर्वाह निधी, ग्रॅच्युईटी, रजेचा पगार यासह अन्य थकबाकी मिळवण्यासाठी एक महिला गेली तीन वर्षे महापालिका कार्यालयाच्या चकरा मारते आहे. मात्र निगरगट्ट प्रशासकीय यंत्रणेच्या काळजाला पाझर फुटलेला नाही. ‘रोज पालिकेच्या कार्यालयात फेऱ्या मारून अक्षरश: थकले आहे. माझ्या हाताला रोजगार नाही, मुलीच्या घरी आणखी किती दिवस राहू’ असा प्रश्न करत या महिलेने माझ्या नवऱ्याची थकबाकी देऊन माझी सुटका करा, असे साकडे पालिकेला घातले आहे.

पालिकेत सफाई कामगार असणाऱ्या शिरपत जाधव यांचे ३ वर्षांपूर्वी निधन झाले. परळ येथील जी-दक्षिण विभाग कार्यालयांतर्गत ते सेवेत होते. त्यांच्या पश्चात पत्नी अर्चना आणि एक मुलगी असा परिवार आहे. पतीच्या निधनानंतर ही महिला आपल्या मुलीच्या घरी डोंगरी उमरखाडी येथे राहात आहेत. नवऱ्याच्या निधनानंतर त्याचा भविष्य निर्वाह निधी, ग्रॅच्युईटी, रजेचा पगार मिळवण्यासाठी तसेच पेन्शन सुरू करण्यासाठी अर्चना यांनी २०१८ मध्ये विभाग कार्यालयात अर्ज दाखल केला. काही दिवसातच प्रशासकीय कार्यवाही पूर्ण केली जाईल, असे त्यांना पालिकेकडून कळवण्यात आले.

या घटनेनंतर तब्बल तीन वर्ष त्यांची फाईल या टेबलवरून त्या टेबलवर फिरत आहे. मात्र थकबाकीची रक्कम काही मिळालेली नाही. कधी जुनी फाइल मिळत नाही, कधी नवीन फाइल केली जाते आहे, अशी उत्तरे अर्चना जाधव यांना दिली जात आहेत. स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याकडे अखेर जाधव यांनी धाव घेतली आहे. जाधव यांनी याबाबत जी-दक्षिण विभाग कार्यालयातून माहिती घेतली असता ‘शिरपत जाधव हे पालिकेच्या सेवेत रुजू झाले तेव्हा त्यांची नियुक्ती कोणत्या विभागात झाली होती. ही माहिती मिळवण्यासाठी जी-दक्षिण विभाग कार्यालयाने मुंबईतील सर्व २४ विभाग कार्यालयांशी पत्रव्यवहार केला आहे. या माहितीनंतर त्यांचा सेवाकालावधी काही तक्रारी असल्यास त्याची माहिती काढली जाणार’ असल्याचे त्यांना सांगण्यात आले.

आठवड्यात थकबाकी द्या

जाधव यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फैलावर घेत थकबाकी मिळवण्यासाठी एका सामान्य महिलेला तीन वर्षे फेऱ्या माराव्या लागतात यावरून पालिकेचा प्रशासकीय कारभार कसा चालला आहे, हे समजते असे फटकारत या महिलेस आठवडाभरात थकबाकी देऊन पेन्शनची प्रक्रिया सुरू करा, असा आदेश जाधव यांना पालिका प्रशासनाला दिला.

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/a-bmc-deceased-employees-wife-is-waiting-for-provident-fund-gratuity-leave-pay-from-last-three-year/articleshow/83656347.cms