मुंबई बातम्या

मुंबई महापालिकेत वाढते खासगीकरण – Maharashtra Times

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबई महापालिकेची खासगीकरणाच्या दिशेने वेगाने वाटचाल सुरू असल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी घनकचरा व्यवस्थापन विभागासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून भाड्याने गाड्या घेण्यात आल्यानंतर आता मलनि:सारण विभागासाठी तब्बल एक कोटी ६६ लाख रुपये मोजून ११ टेम्पो घेतले जाणार आहेत.

पालिकेच्या विविध विभागांत मोठ्या प्रमाणावर खासगीकरणातून कामे केली जातात. त्यामुळे कामगार भरती केली जात नसल्याचे अनेकदा कामगार संघटनांनी उघडकीस आणले आहे. खासगीकरणाचा वेग वाढत असल्याचे पालिका सभागृह तसेच, अन्य समित्यांच्या बैठकात नगरसेवकांकडून उघडकीस आणण्यात आले आहे. त्यानंतरही खासगीकरणाला लगाम लागलेला नाही. पालिकेत सध्या मुख्यालयासह विभाग कार्यालये, रुग्णालये, शाळा तसेच प्रमुख रस्त्यांची सफाई खासगी संस्थांमार्फत करण्यात येते.

पालिकेची रुग्णालये, उद्याने, मालमत्तांची सुरक्षाही खासगी सुरक्षारक्षकांच्या हातात सोपवण्यात आली आहे. प्रभाग समिती अध्यक्षांसह अनेक अधिकाऱ्यांसाठी भाड्याने वाहनांची सेवा घेण्यात आली आहे. आता मलनि:सारण विभागातील साहित्य व कामगारांना वाहून नेण्यासाठी चारचाकी टेम्पो भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत. मलनि:सारण खात्यातर्फे मुंबई शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरातील मलवाहिन्यांमधील अडथळे व गाळ काढण्याचे काम पार पाडण्यासाठी ही वाहने घेतली जाणार आहेत.

दोन वर्षांत ८,०३० शिफ्ट

या कामासाठी चोक मशिन, ऑइल फ्री एअर कॉम्प्रेसर, एअर ब्लोअर ही यंत्रे तसेच, कामगारांना घेऊन जाण्यासाठी ११ टेम्पो भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत. टेम्पोला एका शिफ्टसाठी तीन हजार ७० रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. दोन वर्षांत एकूण ८,०३० शिफ्ट होणार आहेत.

निविदा न काढताच काम

शहर आणि उपनगरांतील रस्त्यालगतच्या उघड्या गटारांची सफाई करण्यासाठी पालिकेने ७ वर्षांसाठी कंत्राटदाराकडून भाडेतत्त्वावर मशिन घेतल्या होत्या. त्यासाठी कंत्राटदाराला ३ कोटी ४४ लाख रुपये अदा करण्यात आले. या कंत्राटदाराचा कालावधी संपुष्टात येण्यापूर्वी नवीन कंत्राटदार नेमणे आवश्यक असताना पालिकेने निविदा न काढता जुन्याच कंत्राटदाराला पुढील दीड वर्षासाठी आणखी ८३ लाख रुपये देऊन काम सुरू ठेवले आहे. स्थायी समितीने या प्रस्तावास मंजुरी दिली आहे.

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/privatization-increasing-in-mumbai-municipal-corporation/articleshow/83623715.cms