मुंबई बातम्या

मुंबई काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह? झिशान सिद्दिकींची भाई जगतापांविरोधात हायकमांडकडे तक्रार! – Loksatta

राज्यात महाविकासआघाडीचं सरकार असताना काँग्रेसने मात्र आत्तापासूनच पुढील विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवण्याचा नारा दिला आहे. अवघ्या वर्षभरातच मुंबईत महानगर पालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांनी कंबर कसून कामाला सुरुवात केली आहे. मात्र, मुंबई पालिकेसारखी महत्त्वाची निवडणूक तोंडावर असतानाच मुंबई काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस दिसू लागली आहे. काँग्रेसचे वांद्रे पूर्वमधील आमदार झिशान सिद्दिकी यांनी मुंबई काँग्रेस अध्यक्षांविरुद्ध थेट पार्टी हायकमांड अर्थात राहुल गांधी आणि पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडेच तक्रार केली आहे. त्यावर भाई जगताप यांनीही प्रत्युत्तर दिल्यामुळे मुंबई काँग्रेसमध्ये अंतर्गत कलगीतुरा पाहायला मिळत आहे.

नेमका वाद कशामुळे?

झिशान सिद्दिकी हे काँग्रेसचे वांद्रे पूर्वमधील आमदार. काँग्रेसचे मुंबईतील ते सर्वात तरुण आमदार आहेत. भाई जगताप यांनी वर्षभरापूर्वीच मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाचा कार्यभार हाती घेतला. मात्र, वर्षभराच्या आतच त्यांच्या निर्णयांना मुंबईतूनच आव्हान दिलं जाऊ लागलं आहे. भाई जगताप आपल्याला बाजूला सारून सूरज ठाकूर या युवक काँग्रेसमधील दुसऱ्या नेत्याला मुंबई युवक काँग्रेसचा अध्यक्ष करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोप झिशान सिद्दिकी यांनी केला आहे. एवढंच नाही, तर त्यांनी थेट तशी तक्रार करणारं पत्रच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना लिहिलं आहे! भाई जगताप यांनी यासंदर्भात प्रसारमाध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेनंतर हा सगळा प्रकार उघड झाला!

झिशानचं काम मी पाहिलंच नाही!

भाई जगताप यांनी या वादावर एएनआयशी बोलताना झिशान सिद्दिकी यांचे कान टोचले आहेत. “झिशान फक्त २७ वर्षांचा आहे. मी आयुष्याची ४० वर्ष काँग्रेसला दिली आहेत. मी सूरज ठाकूरला पाठिंबा देत राहणार. तो रस्त्यावर उतरून कामं करतो. पण मी झिशानचं काम पाहिलेलं नाही”, असं भाई जगताप म्हणाले. त्यामुळे डिवचल्या गेलेल्या झिशान सिद्दिकी यांनी उलट भाई जगताप यांनाच पक्षांतर्गत बाबींचा धडा दिला आहे!

…भाई जगताप हे शिकले नाहीत हे दुर्दैवी!

भाई जगताप यांच्याविरोधात सोनिया गांधींकडे तक्रार करणाऱ्या झिशान सिद्दिकी यांनी देखील माध्यमांसमोर नाराजी व्यक्त केली आहे. “ही पक्षाची अंतर्गत बाब आहे. मी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना पत्र लिहिलं आहे. जर भाई जगताप पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, तर त्यांनी अशा पद्धतीने पक्षांतर्गत बाबींवर माध्यमांसमोर बोलायला नको होतं. हे दुर्दैवी आहे की ते अजून ही गोष्ट शिकू शकले नाहीत”, अशा शब्दांत झिशान सिद्दिकी यांनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे.

झिशान सिद्दिकींचा आरोप काय?

सूरज ठाकूर यांच्याविषयी झिशान सिद्दिकी यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. वांद्रे पूर्व मतदारसंघातील कामांमध्ये पक्षातील मुंबईतील वरीष्ठ नेते अडथळे आणतात. तसेच, २०१९मध्ये आपल्याविरोधात काम केल्याबद्दल पक्षाने निलंबित केलेल्या व्यक्तीला(सूरज ठाकूर) ते पाठिंबा देत आहेत, असा आरोप झिशान सिद्दिकी यांनी केला आहे. तसेच, आपल्या मतदारसंघातील कार्यक्रमांसाठी आपल्यालाच आमंत्रण दिलं जात नसल्याची तक्रार देखील झिशान सिद्दिकी यांनी केली आहे.

काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवणार का?; बाळासाहेब थोरात म्हणतात…

मुंबई पालिका निवडणुकांचं काय?

करोनाच्या परिस्थितीत सुधारणा झाल्यास पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका आहेत. विधानसभा निवडणुकांमध्ये स्वबळावर लढण्यासाठी मुंबई पालिका निवडणुकीतील कामगिरी ही काँग्रेससाठी लिटमस टेस्ट ठरणार आहे. मात्र, मुंबई काँग्रसमध्ये सुरू असलेल्या या अंतर्गत धुसफुशीचा काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.

First Published on June 18, 2021 2:12 pm

Web Title: mumbai congress controversy zeeshan siddiqui complains against bhai jagtap pmw 88

Source: https://www.loksatta.com/mumbai-news/mumbai-congress-controversy-zeeshan-siddiqui-complains-against-bhai-jagtap-pmw-88-2503509/