मुंबई बातम्या

बालरोगतज्ज्ञांना विशेष प्रशिक्षण ते सार्वजनिक स्वच्छता, मुंबई महापालिका तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सज्ज – TV9 Marathi

मुंबईतील बालरोगतज्ज्ञांना विशेष प्रशिक्षण देण्याचे ठरवले आहेत. तसेच विभाग स्तरावर कृती आराखडाही तयार केला आहे. (Mumbai BMC alert On Covid third wave)

मुंबई महापालिका

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होतो ना होतो आता तिसऱ्या लाटेचे संकेत मिळत आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका अधिक असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने तयारी सुरु केली आहे. या लाटेत लहान मुलांना संसर्ग होण्याचा धोका लक्षात घेऊन पालिकेने मुंबईतील बालरोगतज्ज्ञांना विशेष प्रशिक्षण देण्याचे ठरवले आहेत. तसेच विभाग स्तरावर कृती आराखडाही तयार केला आहे. (Mumbai BMC alert On Covid third wave)

सतर्क राहण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना आणि झोपडपट्टीमधील रहिवाशांना संसर्गाची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. त्यादृष्टीने सुसज्ज आणि सतर्क राहण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी सर्व परिमंडळाचे उपायुक्त, 24 प्रशासकीय विभागांचे साहाय्यक आयुक्त आणि आरोग्य विभागातील संबंधित अधिकारी यांना कार्यवाही आणि अंमलबजावणीबाबत विशेष निर्देश दिले आहेत.

मुंबई महापालिकेचे निर्देश 

1. महानगरपालिकेच्या सर्व विभागस्तरीय सहाय्यक आयुक्तांनी आपापल्या क्षेत्रातील बालरोग तज्ज्ञांना विशेष प्रशिक्षण देण्याच्या‌ दृष्टीने कार्यवाही करावी. तसेच प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करावे.

2. हे प्रशिक्षण कार्यक्रम प्रत्यक्ष पद्धतीने आयोजित करावेत. तसेच सुरक्षित अंतर राखण्याच्या दृष्टीने प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन तुकड्यांमध्ये (बॅचेस) करण्यात यावे.

3. अशा प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये महानगरपालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांमधील संबंधित विभागातील ज्येष्ठ तज्ज्ञ मंडळी मार्गदर्शन करतील.

4. यादृष्टीने आवश्यक ते नियोजन करण्याची जबाबदारी महानगरपालिकेचे संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) डॉ. रमेश भारमल यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

5. त्याचबरोबर ‘पेडियाट्रिक टास्क फोर्स’ मधील सदस्यांनाही मार्गदर्शक म्हणून या प्रशिक्षण कार्यक्रमांना निमंत्रित करण्यात यावे.

6. या व्यतिरिक्त महानगरपालिकेच्या सर्व ‘हेल्थ पोस्ट’ च्या स्तरावर गृहभेटी वाढविण्यात याव्यात.

7. तसेच सर्व झोपडपट्टी परिसर, सार्वजनिक शौचालये आणि सार्वजनिक सुविधा इत्यादींच्या ठिकाणी अधिक प्रभावी स्वच्छता राखण्यात यावी.

8. या सर्व बाबतीत संनियंत्रण आणि पुनर्विलोकन हे परिमंडळ उपायुक्तांच्या स्तरावर करण्यात यावे.

9. या सर्व बाबींसंदर्भात प्रशासकीय विभागांच्या स्तरावर कृती आराखडा तयार करून तो कार्यकारी आरोग्य अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात यावा.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रासह देशभरात खळबळ उडवली आहे. कोरोनाग्रस्त मृतांची संख्याही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. विशेष म्हणजे दुसऱ्या लाटेचा कहर थांबत नाही, तोच तिसऱ्या लाटेचे संकेत मिळत आहेत. याच पार्श्वभूमीवर कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी महानगरपालिकेची यंत्रणा सर्व उपाययोजनांसह सुसज्ज झाली आहे. (Mumbai BMC alert On Covid third wave)

संबंधित बातम्या : 

BMC Election 2022 : तयारीला लागा, मुंबई मनपाची निवडणूक ठरल्या वेळेतच होण्याची चिन्हं, वॉर्ड पुनर्रचनेचे आदेश

मुंबईत आता अत्यावश्यक सेवेतली दुकाने आठवडाभर ओपन राहणार, इतर नियम काय?

मुंबई शहराने कोरोनाला कसं रोखलं? इक्बाल सिंह चहल यांचा राज्यातील महापालिका आयुक्तांशी संवाद

Source: https://www.tv9marathi.com/maharashtra/mumbai/mumbai-bmc-commissioner-iqbal-singh-chahal-alert-on-corona-third-wave-467726.html