मुंबई बातम्या

नातलगांच्या चिंतेने कुटुंबीय हवालदिल – Loksatta

मुंबई : बॉम्बे हायनजीक तराफा बुडून झालेल्या दुर्घटनेत बचावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी समुद्रात अडकलेल्या नातलगांशी संवाद साधल्यानंतर नि:श्वास सोडला.

बॉम्बे हाय येथील हिरा ऑईल फिल्डजवळ ‘पी ३०५’ हा तराफा वादळात सापडल्याची बातमी रविवारी रात्री कानावर येताच क्षणी अभिषेक आव्हाड यांचे कुटुंब हवालदिल झाले होते. अभिषेक हा नाशिक जिल्ह्यातील सिन्नरचा रहिवाशी आहे. अभिषेकने बुधवारी सकाळी फोन करून घरी येत असल्याचे सांगितल्यानंतर आमच्या जीवात जीव आला. आता काही झाले तरी पुन्हा मुलांना तेथे कामाला परत पाठवणार नाही, असे त्याच्या काकांनी तुकाराम आव्हाड यांनी सांगितले. अभिषेकच्याच गावातील विशाल केदार हा तरुणही सुखरूप परतला.

कामाच्या ठिकाणी पिळवणूक?

अभिषेकसोबत त्याचा चुलत भाऊही ‘पी ३०५’ तराफ्यावर कामाला गेला होता. कामातील पिळवणुकीमुळे तो पंधरा दिवसातच माघारी परतला होता. ‘मॅथ्यु या दलालाला ५० हजार रुपये देऊन नोकरीला लागलो होतो. ८ किंवा १२ तासांची ड्युटी असेल, असे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात दररोज १५ तास काम करावे लागत होते. तसेच आठवड्याची सुट्टी मिळत नव्हती. अतिरिक्त काम केल्याचा मोबदला दिला जात नव्हता. यामुळे हे काम सोडून निघून आलो. काम सोडल्यावर कंत्राटदाराने पैसे द्यायला नकार दिला,’ असे अभिजित आव्हाड याने सांगितले.

‘नौदलाने शोध घेऊन वाचवले’

खवळलेल्या समुद्रात ८ ते १० तास मदतीची प्रतीक्षा करत होतो. नांगर तुटल्याने सोमवारी पहाटेच्या तराफा समुद्रात भरकटू लागला. एका फलाटाशी धडकल्याने तराफ्याला हानी झाली. त्यामुळे त्यामध्ये पाणी भरू लागले. कॅप्टनने तराफा सोडण्याची सूचना सोमवारी सकाळच्या सुमारास केली होती. तराफा पूर्ण बुडेपर्यंत मदतीसाठी कोणीतरी येईल या आशेवर आम्ही त्यामध्ये बसून होतो. सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास तराफा पूर्ण बुडाला. तेव्हा आम्ही काही जणांनी उड्या मारल्या. नौदलाची युद्धनौका काही वेळाने तेथे दाखल झाली. मात्र वादळामुळे तिच्या जवळ पोहचणे अशक्य होते. अंधारात युद्धनौका दिसत असूनही आम्ही तिच्यापर्यंत पोहोचू शकत नव्हतो. मध्यरात्री नौदलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढले, असे अफराज नाडकर याने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.

First Published on May 20, 2021 1:08 am

Web Title: family is worried about the relatives near bombay hyen employees who survived the accident akp 94

Source: https://www.loksatta.com/mumbai-news/family-is-worried-about-the-relatives-near-bombay-hyen-employees-who-survived-the-accident-akp-94-2475704/