मुंबई बातम्या

मुंबई महापालिका करणार २०० व्हेंटिलेटरची खरेदी – Maharashtra Times

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

करोनारुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे व्हेंटिलेटरची गरज लक्षात घेता महापालिकेने २०० व्हेंटिलेटर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी १०० व्हेंटिलेटर खरेदीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच स्थायी समितीच्या मंजुरीसाठी हा प्रस्ताव येणार आहे. हे व्हेंटिलेटर कोविड रुग्णालय आणि कोविड केंद्रांना दिले जाणार आहेत. यंदाच्या फेब्रुवारीपासून करोनारुग्णांची संख्या पुन्हा झपाट्याने वाढू लागली आहे. मुंबईतील एकूण रुग्णांपैकी ८० टक्क्यांहून अधिक रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत. यापैकी बहुसंख्य रुग्णांचे घरातच विलगीकरण करण्यात आले आहे. तर, सुमारे दहा टक्के रुग्णांना उपचाराची गरज असल्याने रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. यातील काही रुग्णांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना खासगी तसेच पालिकेच्या कोविड रुग्णालयात दाखल करावे लागते आहे. त्यामुळे आयसीयू खाटा आणि व्हेंटिलेटरची मागणी वाढली

आहे. आयसीयू खाटांच्या वाढत्या मागणीमुळे खबरदारी म्हणून पालिकेने २०० व्हेंटिलेटर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी १०० व्हेंटिलेटर खरेदीसाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तीन वर्षे हमी कालावधी आणि पुढील पाच वर्षांची देखभाल याकरीता १६.७७ कोटी रुपये खर्च व्हेंटिलेटर खरेदीवर केला जाणार आहे.

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/mumbai-municipal-corporation-has-decided-to-purchase-200-hundred-ventilator-due-to-corona-cases-rapidly-increases/articleshow/82319891.cms