मुंबई बातम्या

मुंबई: हॉस्पिटलमध्ये नाइट शिफ्टसाठी जाताना नर्सचा धावत्या ट्रेनमध्ये विनयभंग – Maharashtra Times

मुंबई: करोना काळात रुग्णांच्या सेवेसाठी अहोरात्र झटणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना मुंबईत घडली आहे. हॉस्पिटलमध्ये नाइट शिफ्टला जाताना नर्सचा धावत्या लोकल ट्रेनमध्ये विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी २४ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे.

कांदिवली आणि बोरिवली रेल्वे स्थानकांदरम्यान रात्री साडेदहाच्या सुमारास धावत्या लोकल ट्रेनमध्ये ही घटना घडली. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी २४ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. रामेश्वर असे या तरुणाचे नाव आहे. याआधीही त्याने अशा प्रकारचे गुन्हे केले असावेत, असा पोलिसांना संशय आहे. आरोपी तरुणाकडे रेल्वेने प्रवास करण्याचे कोणतेही अधिकृत ओळखपत्र नव्हते, अशी माहितीही पोलिसांनी दिली.

करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांसाठी उपनगरी रेल्वे सेवा बंद ठेवण्यात आली आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच रेल्वेमधून प्रवास करण्याची मुभा आहे. गोरेगाव येथील सरकारी हॉस्पिटलमध्ये नोकरीला असलेली नर्स नाइट शिफ्टसाठी जात होती. कांदिवली आणि बोरिवली दरम्यान ट्रेन थांबली असता, आरोपी तरुण डब्यामध्ये चढला. त्याने नर्सचा विनयभंग केला. या घटनेनंतर नर्स ट्रेनमधून उतरली आणि तिने रेल्वे पोलिसांकडे याबाबत तक्रार केली, अशी माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.

आरोपी सीसीटीव्हीत कैद

आरोपी तरूण दहीसर स्थानकात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्याच्याबाबत खबर मिळताच, रेल्वे पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. तिन्ही मार्गावरील काही उपनगरी रेल्वेस्थानकांवरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो दिसून आला आहे. त्यामुळे अशा प्रकारे त्याने अनेक गुन्हे केले असावेत, असा संशय आहे. त्या दिशेने तपास केला जात आहे, अशी माहितीही पोलिसांनी दिली.

आणखी बातम्या वाचा:

मुंबई: करोनाबाधित अल्पवयीन मुलीचा क्वारंटाइन सेंटरमध्ये विनयभंग

कोविड सेंटरमध्ये तरुणीवर बाऊन्सरने केला सलग ३ दिवस बलात्कार

संतापजनक! ड्युटीवरून परतणाऱ्या नर्सवर सामूहिक बलात्कार

धक्कादायक! मुलानेच मित्राच्या मदतीने केला वडिलांचा खून, मृतदेह फेकला होता नदीत

धक्कादायक! ‘लिव्ह-इन’मध्ये राहणाऱ्या तरुणीवर सामूहिक बलात्कार

Source: https://maharashtratimes.com/crime-news/man-arrested-for-molesting-nurse-on-mumbai-local-train/articleshow/78149270.cms