मुंबई बातम्या

Coronavirus: मुंबई लोकलमध्ये विनामास्क फिरणाऱ्यांना जोरदार दणका – Maharashtra Times

म. टा. प्रतिनिधी । मुंबई

करोना प्रादूर्भावात ‘सुपरस्प्रेडर’चे काम करणाऱ्या विनामास्क प्रवाशांवरील कारवाई अत्यंत कडक पद्धतीने सुरू आहे. विनामास्क फिरणाऱ्या प्रवाशांसाठी नियुक्त केलेल्या मार्शल आणि अन्य कर्मचाऱ्यांनी साडेपाच हजारांहून अधिक जणांवर कारवाई करीत, ११ लाख रु.हून अधिक रकमेची दंडवसुली केली आहे. (Action Against Commuters Not Wearing Face Mask In Local Trains)

वाचा: ‘राज्यात करोना खरेच वाढलाय की औषध कंपन्यांसाठी…’

रेल्वे स्थानकांत रेल्वे पोलिस आणि रेल्वे सुरक्षा दलाचे अधिकारी सोबत असल्याने मार्शलकडून होणारी कारवाई वाढली आहे. गेल्या काही दिवसांत रोज ३००हून अधिक विनामास्क प्रवाशांवर कारवाई करण्यात येत आहे. १ ते २१ फेब्रुवारी या काळात मध्य रेल्वेवरील ३४९७ प्रवाशांवर कारवाई केली. या प्रवाशांकडून एकूण ८ लाख ६ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेवर मध्य रेल्वेच्या तुलनेत कमी दंड वसूल करण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेवर विनामास्क फिरणाऱ्या २२०० विनामास्क प्रवाशांकडून ३ लाख २१ हजार रु.चा दंड वसूल करण्यात आला.

वाचा: सांगली जिंकण्यासाठी जयंत पाटील यांनी नेमकं काय केलं?

मध्य-पश्चिम रेल्वे स्थानकात विनामास्क फिरणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळेत प्रवाशांकडून सुरक्षित वावर नियमांचे पालन होत नाही. अशातच मास्क न वापरणाऱ्या प्रवाशांमुळे करोनाचा प्रसार वेगाने होण्याची शक्यता असते. करोनाबधितांच्या संख्येतील वाढ अशीच कायम राहिल्यास पुन्हा एकदा लॉकडाउनचा सामना मुंबईकरांना करावा लागणार आहे. लॉकडाउन होणे कोणालाही परवडण्यासारखे नाही. यामुळे करोनाचा प्रसार रोखण्यासाठी नियमभंग करणाऱ्या प्रवाशांवर मोठ्या प्रमाणात कारवाईचा धडाका सुरू आहे. प्रवाशांच्या तुलनेत मार्शलची संख्या कमी आहे. यामुळे महापालिकेकडून रेल्वे स्थानकात अतिरिक्त मार्शलची नियुक्ती करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

वाचा: …तर मुंबईतही लॉकडाउन; पालकमंत्र्यांनी दिली माहिती

अशी झाली कारवाई (१ ते २१ फेब्रुवारी)

मध्य रेल्वे

विनामास्क प्रवासी

३४९७

दंडवसुली

८ लाख ६ हजार ९०० रु.

पश्चिम रेल्वे

विनामास्क प्रवासी

२२००

दंडवसुली

३ लाख २१ हजार रु.

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/action-against-commuters-not-wearing-face-mask-while-travelling-in-mumbai-local-trains/articleshow/81183551.cms