मुंबई बातम्या

Mumbai Lockdown: मुंबईवर पुन्हा घोंगावू लागले लॉकडाऊनचे संकट!; महापौरांनी केले ‘हे’ महत्त्वाचे विधान – Maharashtra Times

हायलाइट्स:

  • मुंबईचे पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने मार्गक्रमण.
  • महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिला इशारा.
  • लोकांनी नियम न पाळल्यास लॉकडाऊन लावावे लागेल!

मुंबई: राज्यात करोना साथ नियंत्रणात आली असे वाटत असतानाच गेल्या दोन आठवड्यांपासून चित्र बदलू लागलं आहे. मुंबईसह ग्रामीण भागात नवीन बाधितांचा आकडा वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कठोर निर्णय घेतला जाण्याचे स्पष्ट संकेत दिले असतानाच आज मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही लॉकडाऊनबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. ( Mayor Kishori Pednekar On Mumbai Lockdown )

वाचा: महाराष्ट्र पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने?; अजित पवार, टोपेंनी दिला ‘हा’ इशारा

मुंबईत करोनाचा ग्राफ सातत्याने खाली येत असल्याचे पाहून राज्य सरकारने लोकल रेल्वे सर्वांसाठी खुली करण्याची विनंती रेल्वेकडे केली होती. त्यानुसार १ फेब्रुवारीपासून वेळेचे बंधन घालून सर्वांसाठी लोकलचे दार उघडण्यात आले आहे. मात्र, गेल्या पंधरवड्यात मुंबईत करोना रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. हीच बाब काळजीत भर घालणारी ठरली आहे. याबाबत मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी कालच अनेक बाबी स्पष्ट केल्या होत्या. लोकल सर्वांसाठी सुरू केल्यानंतर रुग्णसंख्या नेमकी किती वाढली. रुग्णवाढीला लोकलसह आणि आणखी कोणती कारणे आहेत, याचा आढावा घेतला जाणार आहे व त्यानंतरच पुढची पावले टाकली जाणार आहेत, असे ते म्हणाले होते. लॉकडाऊनबाबत कोणतीही चर्चा झाली नसली तरी मास्क वापरणे, हात धूत राहणे आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणे ही त्रिसुत्री आपल्याला पाळावीच लागेल, असेही त्यांनी नमूद केले होते. त्यानंतर आता महापौरांनी याबाबत महत्त्वाचे विधान केले आहे व चिंताही व्यक्त केली आहे.












मुंबईत पुन्हा लॉकडाउन? महापौरांनी केलं महत्वाचं विधान

वाचा: मुंबईतील लोकलसेवा पुन्हा थांबणार का?; टोपे यांनी केले ‘हे’ मोठे विधान

‘मुंबईत करोनाचे रुग्ण वाढत आहेत ही खूपच चिंतेची बाब आहे. मास्क न लावता अनेक लोक लोकलमधून प्रवास करत असल्याचे आढळून आले आहे. हा बेजबाबदारपणा असून आपल्याला खबरदारी बाळगावीच लागेल, अन्यथा आणखी एका लॉकडाऊनच्या दिशेने आपला प्रवास सुरू होईल. तेव्हा लॉकडाऊन पुन्हा हवे आहे की नको हे सर्वस्वी लोकांच्याच हातात आहे’, असे नमूद करत महापौर पेडणेकर यांनी मुंबईत पुन्हा लॉकडाऊन लावले जाऊ शकते, असा इशाराच दिला.

दरम्यान, राज्यात मागील दोन आठवड्यांत २० हजार २११ नवीन करोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यावर चिंता व्यक्त करत गरज भासल्यास पुन्हा कठोर निर्णय घ्यावे लागतील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी औरंगाबाद येथे बोलताना सांगितले होते. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तर थेट लॉकडाऊनचेच संकेत दिले होते. करोनाची साथ कायम असल्याने नागरिकांनी नियम पाळणे आवश्यक आहे, अन्यथा लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय आमच्यापाशी उरेल आणि लोकहितासाठी तो कठोर निर्णय घेतला जाईल, असे टोपे यांनी बजावले होते.

वाचा: मुंबई पालिका निवडणुकीबाबत नाना पटोले यांची ठाम भूमिका; म्हणाले…

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/if-people-do-not-take-precaution-lockdown-will-be-imposed-in-mumbai-again-says-mumbai-mayor-kishori-pednekar/articleshow/80981450.cms