मुंबई बातम्या

भिक्षेकरीमुक्त मुंबई – Maharashtra Times

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

मुंबईत सिग्नलवर, प्रार्थनास्थळाबाहेर किंवा बाजारांमध्ये आपल्यामागे भीक मागताना यापुढे कुणी दिसू नये, यासाठी प्रयत्नांचे पाऊल पडत आहे. मुंबईला भिक्षेकरीमुक्त करण्याच्यादृष्टीने मुंबई पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. भिक्षेकऱ्यांना पकडण्याचे आदेश सर्व पोलिस ठाण्यांना देण्यात आले असून त्यांना चेंबूर येथील भिक्षेकरी स्वीकार केंद्रात ठेवण्यात येणार आहे.

सार्वजनिक ठिकाणी भीक मागणे हा कायद्याने गुन्हा आहे. अनेक ठिकाणी लहान मुलांना भीक मागण्यासही भाग पाडले जाते. हीच प्रवृत्ती रोखण्यासाठी राज्य सरकारने मुंबई भिक्षा प्रतिबंध अधिनियम १९५९ कायदा संमत केला आहे. या कायद्यान्वये भिक्षा मागणाऱ्यांवर तसेच त्यांना मागायला लावणाऱ्यांवर कारवाई करण्याचे पोलिसांनी ठरविले आहे. पोलिसांच्या समाजसेवा शाखेच्या वतीने भिक्षेकरींवर कारवाई करण्यात येणार आहे. मुंबईतील ९४ पोलिस ठाण्यांनी भिक्षेकरींना पकडण्याची मोहीम सुरू केली. आपल्या हद्दीतील भीक मागणाऱ्यांना पकडून, चौकशी करून भिक्षेकरी स्वीकार केंद्रात ठेवावे, असे आदेश सर्व पोलिस ठाण्यांच्या प्रमुखांना देण्यात आले आहेत.

चेंबूर येथील शासकीय इमारतीमध्ये भिक्षेकरी स्वीकार केंद्र तयार करण्यात आले आहे. ८५० भिक्षेकरांना ठेवता येईल, अशी व्यवस्था या केंद्रात आहे. विशेष मोहिमेत पकडण्यात आलेल्या भिक्षेकरींना या केंद्रात ठेवण्यात येणार आहे. भीक मागणाऱ्यांना पकडल्यानंतर प्रथम त्यांची करोनाचाचणी करावी. चाचणी निगेटिव्ह आल्यास त्यांची रवानगी या केंद्रात करावी, अशा सूचना सर्व पोलिसांना करण्यात आल्या आहेत.

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/mumbai-police-will-beggar-free-awareness-campaign-in-mumbai/articleshow/80903705.cms