मुंबई बातम्या

करोना संसर्ग मुंबईत उतरणीला – Maharashtra Times

म. टा. विशेष प्रतिनिधी

मुंबई : करोना रुग्णांचे प्रमाण आता कमी होत असून, संसर्गाच्या फैलावाचा टक्काही उतरला आहे. मागील आठ दिवसांमध्ये यामध्ये चार टक्क्यांची घसरण झाली आहे. हे प्रमाण आता ११.८३ टक्क्यांवर आले आहे. मुंबईत एकूण रुग्णांची संख्या २ लाख ९९ हजार ७९६ असून, २५ लाख ३३ हजार ३४० चाचण्या करण्यात आल्या आहेत.

कोविड रुग्णांना वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉ. आर.एस. अंकित यांनी सांगितले, ‘करोनामध्ये मृत्युदर आणि संसर्गाचे प्रमाण कमी होणे महत्त्वाचे असते. करोनाला अटकाव करण्यासाठी इतर सर्व बाबींचे काटेकोर पालन करून, मृत्युदर कमी करण्यात यश मिळाले आहे. मुंबईतील संसर्गाचा फैलाव पूर्वीइतक्या तीव्रतेने होत नसून, तो आटोक्यात येत असल्याचे दिसून येते.’ करोना संसर्ग झाल्यानंतर ४१ लाख ९७ हजार ६६ व्यक्तींनी विलगीकरणाचा कालावधी पूर्ण केला. तर ७५ हजार ४५९ जणांनी गृहविलगीकरणाची प्रक्रिया पूर्ण केली. रुग्णांच्या संपर्कात आलेल्या ५६ टक्के व्यक्तींमध्ये सौम्य प्रकारचा संसर्ग आहे. तर ४४ टक्के व्यक्तींमध्ये हा संसर्ग तीव्र स्वरूपाचा आढळला. गंभीर रुग्णांचे प्रमाणही घटले असून, मुंबईमध्ये असे ४२७ रुग्ण आहेत. लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या २५८१ तर लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या ४३८२ आहे.

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/mumbai-covid-update-mumbai-covid-infection-rate-drop-by-4-percent/articleshow/80282968.cms