मुंबई बातम्या

Mumbai Police: ‘आपल्या मुंबई पोलिसांवर भाजपचा इतका राग का?’ – Maharashtra Times

मुंबई: पवई पोलीस ठाण्यातील एका कॉन्स्टेबलला भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मारहाणीवरून राजकारण तापण्याची चिन्हं आहेत. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील युवा सेनेनं या मुद्द्यावरून भाजपला घेरलं आहे. ‘भाजपचा आपल्या मुंबई पोलिसांवर इतका राग का?,’ असा खोचक टोला युवा सेनेनं हाणला आहे. (Yuva Sena Secretary Varun Sardesai attacks BJP)

वाचा: राज ठाकरेंच्या सुरक्षेत कपात; मनसैनिकांनी उचललं ‘हे’ पाऊल

पवई हिरानंदानी येथील गॅलरिया मॉलजवळ दोन दिवसांपूर्वी एका महिला डॉक्टरच्या गाडीला भाजपचे कार्यकर्ते धडकले होते. नियमांचं उल्लंघन करत हे तीन कार्यकर्ते बाइकवरून प्रवास करत होते. पोलिसांनी या तिघांनाही ताब्यात घेतले व रिक्षातून पोलीस ठाण्यात नेले. मात्र, रिक्षातून जाताना या तिघांनी पोलीस कॉन्स्टेबल नितीन खैरमोडे यांना मारहाण केली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. अटकेनंतर भाजपचे आमदार राम कदम यांनी फोन करून आरोपींना सोडण्याची विनंती केली होती. या घटनाक्रमावरून युवा सेनेनं भाजपवर तोफ डागली आहे.

वाचा: पुण्यात सदाशिव पेठेतील बंद खोलीत महिलेचा मृतदेह; खुनाचा संशय

‘मुंबई पोलिसांना आधी शिव्या आणि आता तर भाजप कार्यकर्त्यांनी थेट पोलिसांवर हल्ला केला. भाजपचा आपल्या मुंबई पोलिसांवर इतका राग का आहे?,’ असा प्रश्न युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी ट्विटरच्या माध्यमातून उपस्थित केला आहे. ‘ह्या घटनेचा निषेध करावा तितका कमी आहे. या सर्व आरोपींना कठोर शिक्षा व्हायला हवी. जेणेकरून पोलिसांवर हात टाकण्याची पुन्हा कोणाची हिंमत होता कामा नये,’ असंही त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.



काही दिवसांपूर्वी अभिनेत्री कंगना राणावतसह भाजपच्या काही नेत्यांनी मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करत सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण सीबीआयकडं सोपवण्याची मागणी केली होती. मुंबई पोलिसांवर सतत आरोप करणाऱ्या कंगनाची भाजपच्या नेत्यांनी उघडउघड पाठराखणही केली होती. त्यावेळी शिवसेनेसह सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपवर टीकेची झोड उठवली होती. आता भाजप कार्यकर्त्यांनी पोलिसाला मारहाण केल्यानंतर युवा सेनेनंही टीकेची संधी साधली आहे.

वाचा: रोहित पवारांच्या आरोपांना उत्तर देताना माजी मंत्र्याचा मोठा गौप्यस्फोट

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/why-is-bjp-so-angry-with-mumbai-police-asks-shivsena/articleshow/80229671.cms