मुंबई बातम्या

‘वादग्रस्त ट्विटचे परिणाम अमेरिकेतही’ – Maharashtra Times

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

‘लॉकडाउनच्या काळात वांद्रे स्थानकाबाहेर स्थलांतरित कामगार मोठ्या प्रमाणावर जमून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असताना याचिकादार महिलेने जाणीवपूर्वक मशिदीचा उल्लेख करून विशिष्ट समुदायाला लक्ष्य करत आक्षेपार्ह ट्विट केले. म्हणून पोलिसांनी एफआयआर नोदवला. आक्षेपार्ह व चिथावणी देणारे ट्विट हे कधी व कोणत्या परिस्थितीत केले, हे पाहणे महत्त्वाचे ठरते’, असा युक्तिवाद राज्य सरकारतर्फे विशेष सरकारी वकील मनोज मोहिते यांनी गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात मांडले. त्याचवेळी ‘वादग्रस्त ट्विट्समळे काय होते याचे परिणाम जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असलेल्या अमेरिकेतही आज दिसत आहेत’, असेही मोहिते यांनी अमेरिकेतील कॅपिटल हिल या संसद इमारतीबाहेर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प समर्थकांनी केलेल्या हिंसक आंदोलनाच्या संदर्भाने नमूद केले.

नवी मुंबईतील सुनयना होळे (३८) यांनी वांद्रे रेल्वे स्थानकाबाहेरील जमावाच्या अनुषंगाने आणि त्या जमावातील एकाने केलेल्या वादग्रस्त विधानाच्या आधारे विशिष्ट समुदायाला लक्ष्य करणारे आक्षेपार्ह ट्विट केले, या आरोपाखाली पोलिसांनी त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला. त्याशिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याविरोधातही सोशल मीडियावर २५ व २८ जुलै रोजी आक्षेपार्ह मजकुराचे अनेक पोस्ट प्रसिद्ध केले, या आरोपाखाली दोन एफआयआर केले. त्यामुळे त्यांनी हे एफआयआर रद्द करण्यासाठी आणि त्या प्रकरणांत अटकेपासून संरक्षण मिळण्यासाठी अॅड. अभिनव चंद्रचूड यांच्यामार्फत याचिका केली आहे. त्याविषयीचा दोन्ही बाजूंचा युक्तिवाद नुकताच पूर्ण झाल्यानंतर न्या. संभाजी शिंदे व न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने आपला निर्णय राखून ठेवला.

‘सर्वोच्च न्यायालयाने अमिश देवगण प्रकरणात घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कथित आक्षेपार्ह व बदनामीकारक शब्द नेमके कोणते, कोणत्या परिस्थितीत ते म्हटले गेले आणि त्याचे परिणाम किंवा त्यामुळे झालेले नुकसान काय? हे अशा प्रकरणांत तपासणे महत्त्वाचे आहे. शिवाय पोलिस कलम १५३(अ) लावत असतील तर दोन वेगवेगळ्या धर्मांच्या गटांमध्ये द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे दाखवता आले पाहिजे. या प्रकरणात होळे यांनी कोणत्याही समुदायाचा उल्लेख केला नाही. केवळ मशिदीचा उल्लेख केला’, असा युक्तिवाद अॅड. चंद्रचूड यांनी मांडला. तर ‘आधीच परिस्थिती चिघळलेली असताना होळे यांनी विशिष्ट समुदायाला लक्ष्य करत आणि विशिष्ट हेतूने वादग्रस्त ट्विट केले. ते नंतर त्यांच्या हजारो फॉलोअर्सनी रिट्विट केले. पूर्वीही त्यांनी मुख्यमंत्र्यांची बदनामी करणारे अत्यंत आक्षेपार्ह ट्विट्स केले होते. त्यामुळे कधी व कोणत्या परिस्थिती ट्विट केले, हे महत्त्वाचे ठरते. सर्वोच्च न्यायालयानेही अमिश देवगण प्रकरणात हा मुद्दा मांडला आहे’, असा युक्तिवाद मोहिते यांनी मांडला. परंतु, ‘याचिकादार महिलेच्या ट्विटनंतर वांद्रेमधील परिस्थिती अधिक चिघळली का? अन्यत्र पडसाद उमटल्याची उदाहरणे आहेत का?’, अशी विचारणा करत या प्रकरणात सारासार विचारसरणी असलेल्या व्यक्तीच्या भूमिकेतूनही आम्हाला पहावे लागेल, असे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले.

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/results-of-the-controversial-tweet-are-seen-in-the-us-says-adv-manoj-mohite-in-bombay-high-court/articleshow/80198677.cms