मुंबई बातम्या

मुंबई पोलिसांची कोल्हापुरात कारवाई ; चार जणांना अटक – Sakal

कोल्हापूर – सरकारी कार्यालयात नोकरी लावतो म्हणून वीस-पंचवीस लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी कोल्हापुरातून चौघांना अटक केली. संजय दिनकर गाडेकर (वय 51, बिरदेव वसाहत,ता.कागल), भिकाजी हरी भोसले (वय 45 एमआयडीसी युनिट दोन,,ता.करवीर) नामदेव रामचंद्र पाटील ( 40, वेतवडे,ता. पन्हाळा), जयसिंग शंकर पाटील-पवार (38,खारघर नवी मुंबई, मुळ रा. शिरोली दुमाला, ता.करवीर) आणि कृष्णात राजाराम शेटे (50, खारघर नवी मुंबई, शिरोली दुमाला. ता.करवीर), अशी त्यांची नावे आहेत. त्यांना मुंबई पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता चार दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. 

पोलिसांनी सांगितले, की मुंबई महानगरपालिकेसह वेगवेगळ्या सरकारी कार्यालयात नोकरी लावतो म्हणून पाच तरुणांकडून प्रत्येकी पाच लाख असे सुमारे पंचवीस लाख रुपये अटक केलेल्या पाच जणांनी घेतले आहेत. मित्रपरिवारातील ओळखीतून त्यांनी मुंबईत संपर्क साधला होता. त्यानंतर कोठेच नोकरी न लावल्यामुळे मुंबईतील तरुणांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी मुंबईतील एनआरआय पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक समीर चासकर यांनी कोल्हापुरात येवून पाचजणांनाही ताब्यात घेतले. मुंबईत गेल्यानंतर त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनीच फसवणूक केल्याचे स्पष्ट झाल्यावर सर्वांना अटक केली. 

हे पण वाचा – सायकलिंगला जातो म्हणून सकाळी घरा बाहेर पडला होतो

 
कोल्हापुरातील तरुणांकडून नोकरीच्या अमिषाने फसवणूक केली जात असल्याचे अलीकडील गुन्ह्यांत दिसून आले आहे. जळगाव, लातूरसह इतर ठिकाणातील तरुणांची सैन्यात भरती करतो म्हणून तर मुंबईसह इतर काही जिल्ह्यातील तरुणांची फसवणूक “आसाम रायफल’ भरतीसह वेगवेगळ्या सरकारी कार्यालयात नोकरी लावतो, असे सांगून फसवणूक केली आहे. विशेषतः सर्व संशयित आरोपी हे ग्रामीण भागातील असल्याचे दिसून आले आहे. 

संपादन – धनाजी सुर्वे 

Source: https://www.esakal.com/paschim-maharashtra-news/kolhapur/mumbai-police-arrested-four-people-kolhapur-393696