मुंबई बातम्या

मुंबई-पुणे प्रवास सुरक्षित – Maharashtra Times

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

दिवाळी पर्यटनाच्या हंगामाला बहर आलेला असतानाच रस्ते मार्गे प्रवास करणाऱ्यांना दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर राबविण्यात आलेल्या शून्य अपघात उपक्रमामुळे या महामार्गावरील अपघाती मृत्यूच्या प्रमाणात ५४ टक्क्यांनी घट नोंदवण्यात आली आहे. यामुळे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गापाठोपाठ जुन्या महामार्गावरील प्रवासदेखील आता सुरक्षित ठरला आहे. महामार्गांवरील रस्ते अपघात कमी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी), महामार्ग पोलिस, स्कोडा ऑटो, फोक्सवॅगन इंडिया आणि सेव्हलाइफ फाऊंडेशन यांनी संयुक्तपणे शून्य अपघात हा उपक्रम हाती घेतला होता. या उपक्रमातील माहिती नुकतीच जाहीर करण्यात आली. ‘सन २०१८मध्ये हा उपक्रम सुरू झाला त्यावेळी राष्ट्रीय महामार्ग ४८वर (एनएच-४८) मुंबई-पुणे विभागात २६८ मृत्यू नोंदवण्यात आले होते. या उपक्रमामुळे सन २०१९मध्ये मृतांचा आकडा २०१पर्यंत घसरला. पोलिसांच्या नोंदींनुसार सन २०२०मध्ये निर्बंध असताना ७९ मृत्यूंची नोंद झाली. दरम्यान, सर्व महिन्यांतील अपघातांची सरासरी लक्षात घेता हा आकडा १२३पर्यंत घसरल्याचे दिसून येत आहे’, असे सेव्ह लाइफ फाऊंडेशनच्या वतीने स्पष्ट करण्यात आले

आहे. एमएसआरडीसीचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सांगितले, ‘गेल्या वर्षी आम्ही एनएच-४८वर काही प्रमुख उपक्रमांचे नेतृत्व केले. ज्यामुळे आम्हाला अंडा पॉइंटवरील ब्लॅक स्पॉट निर्मूलनासह रस्ता सुरक्षा सुधारण्यास मदत झाली आहे. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर बेकायदेशीरपणे उभी केलेली वाहने हटविण्यासाठी योग्य अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी एमएसआरडीसीकडे समर्पित गस्ती वाहने आहेत. जुन्या महामार्गावर अभियांत्रिकी सुरक्षा उपाय लागू करण्यात एमएसआरडीसीच्या माध्यमातून १२००हून अधिक अभियांत्रिकीसंबंधित सुरक्षा सुधारणा उपाय लागू करण्यात आले आहेत.’ जुना मुंबई-पुणे महामार्ग हा द्रुतगती महामार्गाप्रमाणे एक महत्त्वाचा मार्ग आहे. यावर वाहनांची रहदारी सतत चालू असते. यामुळे महामार्गावरील सुरक्षा सुधारण्यासाठी या ठिकाणी अतिरिक्त कर्मचारी तैनात केले असल्याचे वाहतूक विभागाचे अपर पोलिस महासंचालक भूषण कुमार उपाध्याय यांनी सांगितले. सेव्हलाइफ फाऊंडेशनद्वारे संकल्पित आणि व्यवस्थापन करण्यात आलेल्या या प्रकल्पात स्कोडा ऑटो आणि फोक्सवॅगन इंडियाने सामाजिक दायित्व निधी (सीएसआर) अंतर्गत सहभाग घेतला

आहे.

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/death-on-mumbai-pune-highway-drops-by-54/articleshow/87232885.cms