मुंबई बातम्या

कोर्टाच्या शिफ्टचा आज होणार निर्णय – Maharashtra Times

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे जिल्ह्यातील न्यायालये दोन शिफ्टमध्ये सुरू करण्याच्या पुणे बार असोसिएशनच्या मागणीवर आज, मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांच्यात होणाऱ्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे.

पुणे जिल्हा सोडून राज्यातील सर्व न्यायालये एक डिसेंबरपासून दोन शिफ्टमध्ये सुरू होणार आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने याबाबत न्यायालयीन कामकाजाच्या वेळांबाबत, घ्यावयाची काळजी, करोनाविषयक सुरक्षा याबाबत कार्यप्रणाली तयार करून दिली आहे. यातून पुणे जिल्ह्याला वगळण्यात आले आहे. पुण्यातील न्यायालये यामुळे एकाच शिफ्टमध्ये सुरू राहणार आहेत.

मात्र, पुण्यालाही नवीन कार्यप्रणाली लागू करण्यात यावी. पुण्यातील न्यायालये दोन शिफ्टमध्ये सुरू करण्यात यावीत, अशी मागणी पुणे बार असोसिएशनकडून करण्यात आली आहेत. त्याबाबतचे पत्र असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सतीश मुळीक यांनी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या अध्यक्षांना दिले आहे. सध्या एकाच शिफ्टमध्ये कामकाज सुरू आहे. याचा फटका ज्युनिअर वकिलांना मोठ्या प्रमाणावर बसला आहे. त्या पार्श्वभूमीवर वकिलांनी ही मागणी केली आहे.

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/today-bombay-high-court-justice-and-bar-council-of-maharashtra-and-goa-wil-taken-decision-on-court-work-in-2-shift/articleshow/79497121.cms