मुंबई बातम्या

नऊ उमेदवारांना अनुकंपा यादीत घ्या – Maharashtra Times

म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर

सेवाकाळात मृत कर्मचाऱ्यांच्या जागेवर अनुकंपा यादीत दिलेले नाव बदलवून दुसऱ्या वारसाचे नाव दाखल करून घेण्याची तरतूद नसल्याच्या कारणावरुन यादीतून काढून टाकलेल्या ९ उमेदवारांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलासा दिला. त्या उमेदवारांची नावे पुन्हा यादीत घेण्याचे आदेश दिलेत.

चंद्रपूर जिल्हा परिषदेमधील सेवेत असताना मृत पावलेल्या कर्मचाऱ्याच्या विधवा पत्नी किंवा पतीने अनुकंपा तत्वावर नोकरी मिळावी म्हणून अर्ज सादर केले होते. त्यानुसार त्यांची नावे अनुकंपा तत्वावर नोकरीसाठी तयार केलेल्या प्रतीक्षा यादीत समावेश करण्यात आला होता. दरम्यान अनेक वर्ष नियुक्ती न मिळाल्याने विधवा पत्नी या वयोमर्यादा उलटल्याने अपात्र झाल्याने किंवा मुले १८ वर्ष पूर्ण झाल्याने आधीच्या नावांच्याऐवजी त्यांच्या मुलांची नावे यादीत दाखल करण्यात आली. परंतु दिनांक २० मे २०१५च्या शासन निर्णयानुसार अशाप्रकारे नाव बदलता येत नसल्याचे कारण देत मुलांची नावे काढून यादीत विधवा पत्नीची नावे पुन्हा नोंदविण्यात आली. नंतर वयोमर्यदा झाल्याचे कारण देऊन त्यांची नावे अपात्र करण्यात आली होती. सदर निर्णयाला सुमित कांबळे आणि शुभम राऊत या उमेदवारांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यावर न्या. सुनील शुक्रे आणि न्या. अविनाश घरोटे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. अनुकंपा यादीतील नावांचा बदल हा शासन निर्णय लागू होण्यापूर्वी झालेला आहे. त्यामुळे पूर्वलक्षीप्रभावाने त्या निर्णयाची अंमलबजावणी करता येणार नाही, असे नमूद करीत प्रतीक्षा यादी पूर्ववत करण्याचा आदेश न्यायालयाने दिला. याचिकाकर्त्याच्यावतीने अॅड. प्रदीप क्षीरसागर यांनी बाजू मांडली.

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/bombay-high-court-nagpur-bench-directs-to-take-nine-candidates-on-the-compassionate-list-to-chandrapur-zilla-parishad/articleshow/78606799.cms