मुंबई बातम्या

बाजारात व्हेंटिलेटरचा तुटवडा; दर्जा योग्य नसल्याने नवी मुंबई महापालिकेची खरेदी रखडली – Sakal

नवी मुंबई : कोरोनामुळे प्राणवायू खालावलेल्या रुग्णाला वाचवण्यासाठी संजीवनी ठरलेल्या व्हेंटिलेटरला आरोग्य क्षेत्रात मोठी मागणी वाढली आहे. मागणीच्या तुलनेत नामांकित कंपन्यांचे व्हेंटिलेटर बाजारात कमी असल्यामुळे त्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. दोन महिन्यांपासून नवी मुंबई महापालिकेला दर्जात्मक व्हेंटिलेटर मिळत नसल्याने 50 व्हेंटिलेटरची प्रक्रिया रखडली आहे.

गुप्तेश्वर पांडे यांना तिकीट न मिळण्याचे प्रयत्न फडणवीसांनी करावेत, सचिन सावंत यांची मागणी

कोरोनामुळे फुफ्फुसावर थेट हल्ला होत असल्याने रुग्णांना न्युमोनिया होतो. या आजाराने रुग्णांची प्रकृती अधिकच खालावत जाऊन श्वास घेता येत नाही. अखेर रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवले जाते. सध्या रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे ऑक्सिजन आणि नंतर व्हेंटिलेटर हे कोरोनाबाधितांवर उपचार करण्याचे जणूकाही वैद्यकीय समीकरणच बनले आहे. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांत व्हेंटिलेटरची मागणी दहापटीने वाढली आहे.
रुग्ण जगवण्यात अथवा मृत्यू होण्यात व्हेंटिलेटरची प्रमुख भूमिका असल्याने त्याची खरेदी करताना सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करावा लागत आहे. त्यानुसार दर्जात्मक व्हेंटिलेटरच्या खरेदीवर सध्या विविध महापालिका आणि रुग्णालये भर देत आहेत. यात युरोपियन, रशियन, जर्मन आणि स्विस बनावटीच्या व्हेंटिलेटरचा समावेश होतो. सध्या पालिकेला एकूण 50 व्हेंटिलेटर खरेदी करायचे आहेत. नवी मुंबईप्रमाणेच एमएमआर क्षेत्रातील सर्वच महापालिकांना हा प्रश्न भेडसावत आहे.

राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांना कोरोनाची लागण; सौम्य लक्षणे असल्याने होम क्वारंटाईन

जगभरात मागणी वाढल्याने पुरवठा कमी
जगभरात कोरोनाचे थैमान वाढल्याने चांगल्या दर्जाच्या व्हेंटिलेटरची जगभरातील देशांमध्ये मागणी वाढली आहे. वाढत्या मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी झाल्याने वैद्यकीय क्षेत्रातील बाजारात व्हेंटिलेटरची मोठी कमतरता निर्माण झाली आहे. नवी मुंबई महापालिका गेले दोन महिने चांगल्या दर्जाच्या व्हेंटिलेटरच्या शोधात आहे.

काय आहे परिस्थिती 
नवी मुंबई महापालिकेत सध्या 114 व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. त्यापैकी 44 व्हेंटिलेटर महापालिकेतर्फे विविध कोव्हिड केअर रुग्णालयात वापरले जात आहेत. उर्वरित व्हेंटिलेटर डी. वाय. पाटील रुग्णालयात आहेत. वाढत्या रुग्णांचे प्रमाण लक्षात घेता महापालिकेने आणखीन 115 व्हेंटिलेटरचे नियोजन केले आहे. त्यापैकी 50 व्हेंटिलेटरची पालिकेला पुढील 15 दिवसांमध्ये गरज आहे. दोन वेळा राबवलेल्या निविदा प्रक्रियेत चांगल्या दर्जाच्या व्हेंटिलेटरच्या कंपन्या न आल्यामुळे आता सरकारच्या संकेतस्थळावर आणि हाफकिन्स संस्थेच्या संकेतस्थळावर व्हेंटिलेटरच्या मार्गदर्शक सूचनांचा अभ्यास करून व्हेंटिलेटरच्या कंपन्यांचा शोध महापालिकेमार्फत सुरू आहे.   

 

व्हेंटिलेटरच्या निविदा प्रक्रिया सुरू आहे. यात एल वन आणि एल टू तांत्रिकदृष्ट्या अपात्र ठरल्याने त्या फेटाळल्या आहेत. व्हेंटिलेटर खरेदी करताना दर्जा आणि वेळ अशा दोन्ही बाबी पाहायच्या असतात. यात दिरंगाई होणार नाही याची काळजी घेतली जाईल. 
अभिजित बांगर,
आयुक्त, नवी मुंबई महापालिका

—————————————————

( संपादन – तुषार सोनवणे )

Source: https://www.esakal.com/mumbai/shortage-ventilators-market-navi-mumbai-351891