मुंबई बातम्या

मुंबई, ठाणे, पालघरमध्ये ३ जून रोजी मुसळधार पावसाची शक्यता – Zee २४ तास

मुंबई : हवामान खात्याने (आयएमडी) 3 जून रोजी मुंबई, ठाणे आणि पालघर येथे ऑरेंज अलर्ट जारी केला असून, मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार अरबी समुद्रात लक्षद्वीपच्या वर कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. येत्या 24 तासांत चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे. या चक्रीय वादळाला निसर्ग असे नाव देण्यात आले आहे. हे  वादळ उत्तरेच्या दिशेने जात आहे. 3 जूनपर्यंत उत्तर महाराष्ट्र आणि गुजरात किनारपट्टीवर हे पोहोचेल.

हवामान खात्याने दिला सतर्कतेचा इशारा 

लक्षद्वीप, केरळ आणि कर्नाटकच्या किनारी भागात 1 जूनपासून पासून मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. 2 जून रोजी कोकण आणि गोव्यात आणि 3 जून रोजी दक्षिण कोकण आणि गोव्यात बहुतेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. 3 ते 4 जून रोजी उत्तर कोकण आणि महाराष्ट्रात बर्‍याच ठिकाणी पाऊस पडेल. काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 3 जून रोजी दक्षिण गुजरात राज्य, दमण आणि दीव, दादरा आणि नगर हवेली येथे बर्‍याच ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

जोरदार वारे

पुढील 48 तासांत अरबी समुद्र, लक्षद्वीप आणि आसपासच्या केरळ किनारपट्टीच्या भागात ताशी 45 ते 55 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. ताशी 65 किमी पर्यंत या वाऱ्याची गती वाढू शकते. वाऱ्याचा वेग हळूहळू वाढेल. 2 जून रोजी सकाळी अरबी समुद्र, कर्नाटक आणि दक्षिण महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर 85 किमी प्रतितासाच्या वेगाने वारे वाहतील. 3 जून रोजी सकाळी कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील भागात 90-100 किमी प्रतितास वेगाने वारे वाहू शकतात.

पुढील 24 तासांच्या दरम्यान, अरबी समुद्रामध्ये, विशेषत: लक्षद्वीपच्या सभोवतालच्या समुद्रावर बराच हालचाल राहील. 2 जूनपासून कर्नाटक, महाराष्ट्र आणि किनारपट्टीच्या भागात परिस्थिती अत्यंत बिकट होण्याची शक्यता आहे. येथे खूप उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे. 3 जूनपासून महाराष्ट्र व गुजरातच्या किनार्यालगतच्या समुद्रात लाटा वाढण्याची शक्यता आहे.

Source: https://zeenews.india.com/marathi/mumbai/orange-alert-for-mumbai-thane-and-palghar-of-heavy-rain/522324