मुंबई बातम्या

‘महापालिकेची तत्परता कुहेतूने’ – Maharashtra Times

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

‘सर्व तपशील लक्षात घेतले, तर या संबंधित अनधिकृत बांधकामावर मुंबई महापालिकेने तत्परतेने सुरू केलेल्या कारवाईमागे कुहेतू दिसतो. सर्वच बेकायदा व अनधिकृत बांधकामांवर महापालिकेने अशी तत्परतेने कारवाई केली असती, तर आज मुंबई शहर हे नागरिकांना जगण्यासाठी एक वेगळेच शहर ठरले असते’, असे अत्यंत गंभीर व कठोर निरीक्षण नोंदवून मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी अभिनेत्री कंगना रनौटच्या बंगल्याच्या प्रकरणात महापालिकेला जोरदार चपराक लगावली. त्याचबरोबर महापालिकेची एकंदरीत वर्तणूक निषेधार्ह आहे, असे निरीक्षण नोंदवतानाच प्रतिज्ञापत्रावर भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश देऊन न्यायालयाने आज, गुरुवारी दुपारी ३ वाजता पुन्हा सुनावणी ठेवली. तसेच तोपर्यंत पाडकामाच्या कारवाईला स्थगिती दिली.

वांद्रे पश्चिम पाली हिल येथील चेतक रो हाऊस बंगला क्रमांक-५वर महापालिकेने बुधवारी सकाळी मुंबई महापालिका कायद्याच्या कलम ३५४-अ अन्वये अनधिकृत बांधकामांप्रकरणी नोटीस बजावली होती. तसेच या बांधकामांसंदर्भात परवानगी घेतल्याची कागदपत्रे २४ तासांत सादर न केल्यास तोडकामाचा इशारा दिला होता. त्यामुळे कंगनाने अॅड. रिझवान सिद्दिकी यांच्यामार्फत तातडीने रिट याचिका केली होती. त्याविषयी न्या. शाहरुख काथावाला व न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठासमोर ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे सुनावणी झाली.

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/bombay-high-court-stops-demolition-of-kangana-ranaut-office/articleshow/78025613.cms