मुंबई बातम्या

मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डय़ांबरोबर सेल्फी का काढत नाही? – Loksatta

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खड्डय़ांवरून भाजप नेते आशीष शेलार यांनी टीकास्त्र सोडले असून, गेल्या वर्षीप्रमाणे खड्डय़ांबरोबर सेल्फी काढण्याचा स्तुत्य उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेस यंदा का राबवीत नाही आणि सरकारपुढे आरसा का धरीत नाही, असा खोचक सवाल केला आहे.

कोकणात जाणाऱ्या नोकरदारांना इतके का छळत आहात? संपूर्ण महामार्गाची दुर्दशा झालेली का दिसत नाही? कोकणी माणसाच्या सहनशीलतेचा अंत का पाहात आहात? असे सवाल आमदार शेलार यांनी केले आहेत.

शेलार म्हणाले, ‘‘मुंबई-गोवा महामार्गाची  दुरवस्था झाली असून कोकणातून परतीच्या प्रवासात े हाल होत आहेत. भाजप सरकारच्या काळात रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचा कालबद्द कार्यक्रम हाती घेण्यात आला असतानाही त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने खड्डय़ांबरोबर सेल्फी काढण्याचे आंदोलन करून राजकारण केले होते.

यंदा सरकारने मुंबईसह राज्यातील रस्त्यांवरील खड्डे बुजवलेच नाहीत. कोकणात तर अख्खा रस्ता उखडून गेला आहे. मग राष्ट्रवादी काँग्रेस सेल्फीचा ‘स्तुत्य उपक्रम’ का राबवीत नाही? कोकणातील लोकप्रतिनिधी, चाकरमानी यांचा आवाज सरकारला का ऐकू येत नाही?’’ असे सवाल आमदार शेलार यांनी केले आहेत. राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांना रस्त्यांवरील खड्डय़ांबाबत पत्र लिहून शेलार यांनी त्यांचे लक्षही वेधले आहे.

या पत्रात आमदार शेलार यांनी म्हटले आहे की, महाविकास आघाडी सरकारने गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची ठरवून कोंडी केली. वेळीच ई-पास, एसटी गाडय़ा उपलब्ध करून दिल्या नाहीत. गाडय़ा सोडण्यासाठी रेल्वे प्रशासन तयार असताना वेळेवर मागणी केली नाही. विलगीकरण कालावधी व आरोग्याच्या उपाययोजना याबाबत सरपंच व कोकणातील लोकप्रतिनिधी यांच्याशी सरकारने वेळीच चर्चा केली नाही. सरकारच्या आडमुठय़ा भूमिकेतून मार्ग काढून कोकणी माणूस आपल्या गावी गणेशोत्सवासाठी पोहचला त्या चाकरमान्यांचे परतीच्या प्रवासात हाल होत आहेत. खेडय़ातील कच्च्या रस्त्यांपेक्षा वाईट व दयनीय अवस्था या महामार्गाची झालेली आहे. दरवर्षी पावसामुळे पडणारे खड्डे गणेशोत्सव काळात बुजविण्यात येतात, मात्र यावेळी ते झाले नाही. किमान आता तरी रस्त्यावरील खड्डे बुजवावेत, अशी मागणी आमदार शेलार यांनी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.

First Published on August 31, 2020 12:03 am

Web Title: why not take selfies with potholes on mumbai goa highway abn 97

Source: https://www.loksatta.com/mumbai-news/why-not-take-selfies-with-potholes-on-mumbai-goa-highway-abn-97-2262644/