मुंबई बातम्या

‘सरकारी मदतीवर पहिल्या पत्नीचाच हक्क’ – Maharashtra Times

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

‘दोन पत्नी असल्याच्या प्रकरणात पतीच्या निधनानंतर नुकसान भरपाईचे पैसे मिळणार असतील तर त्यावर केवळ पहिल्या पत्नीचा आणि दोन्ही पत्नींच्या मुलामुलींचा हक्क राहू शकतो’, असे प्राथमिक निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच नोंदवले. महाराष्ट्र रेल्वे पोलिस दलातील सहायक पोलिस उपनिरीक्षक सुरेश हातणकर यांचे ३० मे रोजी करोनामुळे निधन झाले. राज्य सरकारच्या जीआरप्रमाणे हातणकर यांच्या कुटुंबाला ६५ लाख रुपयांची भरपाई मिळणार असल्याने त्यांच्या दोन्ही पत्नींकडून यासाठी दावा करण्यात आला आहे.

दुसऱ्या पत्नीपासूनच्या मुलीने भरपाईत वाटा मिळण्यासाठी दावा केला आहे. या संदर्भात न्या. शाहरुख काथावाला यांच्या खंडपीठासमोर ‘व्हिडीओ कॉन्फरन्सिंग’द्वारे प्राथमिक सुनावणी झाली. त्यावेळी पतीच्या निधनानंतर केवळ पहिल्या पत्नीचा व तिच्या मुलामुलींचा आणि दुसऱ्या पत्नीपासूनच्या मुलामुलींचा हक्क राहू शकतो, असा निवाडा औरंगाबाद खंडपीठाने पूर्वी दिला असल्याची माहिती सरकारी वकील ज्योती चव्हाण यांनी दिली. त्याविषयी खंडपीठानेही सहमती दर्शवली.

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/bombay-high-court-says-the-first-wife-will-be-entitled-to-government-assistance/articleshow/77838527.cms