मुंबई बातम्या

मुंबई पोलीस उपायुक्त्यांच्या बदल्यांना स्थगिती, किरीट सोमय्या म्हणतात ‘करुन दाखवलं’ – Times Now Marathi

मुंबई पोलीस उपायुक्त्यांच्या बदल्यांना स्थगिती, किरीट सोमय्या म्हणतात ‘करुन दाखवलं’& 

थोडं पण कामाचं

  • मुंबईतील पोलीस उपायुक्तांच्या बदल्यांना स्थगिती
  • अवघ्या तीन दिवसांपूर्वीच करण्यात आल्या होत्या बदल्या
  • सत्ताधारी पक्षांत समन्वयाच्या अभावामुळे बदल्यांना स्थगिती दिल्याची चर्चा

मुंबई: मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. अशा परिस्थितीत तीन दिवसांपूर्वी मुंबई पोलीस दलातील (Mumbai Police Force) उपायुक्तांच्या बदल्या (DCP transfer) करण्यात आल्याचे आदेश काढण्यात आले होते. मात्र, आज या बदल्यांना स्थगिती देण्यात आली आहे. या पोलीस अधिकाऱ्यांना पूर्वी पोस्टिंग असलेल्याच ठिकाणी पून्हा रुजू होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सत्तेत असलेल्या शिवसेना (Shiv Sena)-राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) या पक्षांत समन्वय नसल्यानेच हा घोळ झाला असल्याचं बोललं जात आहे. पाहूयात काय आहे संपूर्ण प्रकरण…

मुंबई पोलीस दलातील १० पोलीस उपायुक्तांच्या मुंबईत इतर ठिकाणी बदल्या करण्यात आल्या. या बदल्यांचे आदेश तीन दिवसांपूर्वी काढण्यात आले होते. मात्र, आज या बदल्यांना स्थगिती देण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विश्वासात न घेता बदल्या करण्यात आल्याने या बदल्यांना स्थगिती देण्यात आल्याचं बोललं जात आहे. 

गृहमंत्री अनिल देशमुखांचं स्पष्टीकरण

या संपूर्ण प्रकरणाची जोरदार चर्चा होण्यास सुरूवात झाल्यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं आहे. अनिल देशमुख यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, “मुंबई पोलीस आयुक्तांनी केलेल्या मुंबईतील अंतर्गत बदल्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माझ्या कार्यालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे”.

भाजपची ठाकरे सरकारवर टीका

या घटनेनंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाराष्ट्र सरकारवर टीका केली आहे. किरीट सोमय्या यांनी म्हटलं, “करुन दाखवलंचा अर्थ आता महाराष्ट्राच्या जनतेला कळत आहे. १२ डीसीपींच्या बदल्या केल्या दोन दिवसांत स्टे, दोन किलोमीटरच्या बाहेर जायचं नाही दोन दिवसांत स्टे, नवी मुंबई मनपा आयुक्तांची बदली केली दोन दिवसांत स्टे”.

महाविकास आघाडीत समन्वयाचा अभाव?

महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मतभेद असल्याच्या अनेक घटना आतापर्यंत समोर आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते नाराज होते. सरकार निर्णय घेताना आपल्याला विश्वास घेत नसल्याची खंत काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेताना मुख्यमंत्र्यांनी आपल्याला विश्वासात घेतलं नसल्याचं काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी म्हटल्याची माहिती समोर आली. हे सर्व सुरू असताना आता पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरुन महाविकास आघाडीत मतभेद असल्याचं समोर आलं आहे.

बातमीची भावकी

Source: https://www.timesnowmarathi.com/maharashtra-news/mumbai-news/article/mumbai-police-dcp-officers-internal-transfers-put-on-hold-by-cm-uddhav-thackeray-and-anil-deshmukh/301491