मुंबई बातम्या

कोरोना मुंबई: उंच इमारतींच्या सोसायटींमध्ये रुग्णांची संख्या सर्वाधिक वाढतेय का? – BBC News मराठी

आपल्या वेगासाठी जगभरात प्रसिद्ध असणारं शहर म्हणजेच मुंबई. सतत धावणारी ही देशाची आर्थिक राजधानी अडीच महिने लॉकडाऊनमध्ये बंद होती.

कोरोनामुळे ठप्प झालेलं हे शहर हळूहळू उभारी घेण्याचा प्रयत्न करतेय, पुन्हा वेग पकडण्यासाठी सज्ज होतंय. लोक कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडतायत. पण, यामुळे कोरोनाचा धोका अधिक वाढतोय?

हा प्रश्न पडण्याचं कारण म्हणजे, जूनच्या सुरुवातीला मुंबई आणि मुंबई मेट्रोपोलिटन परिसरातील लॉकडाऊन काहीसा शिथिल करण्यात आला. अर्थचक्राला गती देण्यासाठी दुकानं, ऑड-इव्हन फॉर्म्युलानुसार बाजार खुला करण्यात आला. कमीत-कमी संख्याबळाने ऑफिसेसही सुरू करण्यात आली. लोकं खरेदी, कामानिमित्त घराबाहेर पडले.

काही सोसायट्यांमध्ये घरात काम करण्यासाठी येणाऱ्या लोकांची ये-जा सुरू झाली. ड्रायव्हर, सफाई कर्मचाऱ्यांचा सोसायट्यांमध्ये वावर वाढू लागला. यामुळे लॉकडाऊन शिथिल झाल्यापासून मुंबईतील सोसायट्यांमध्ये कोरोनाग्रस्तांच्या संख्येत अचानक वाढ झाल्याचं चित्र पहायला मिळत आहे.

मुंबईतील सील करण्यात आलेली ठिकाणं

  • चाळ आणि झोपडपट्यांमध्ये कंटेनमेंट झोन- 770
  • 22 जूनपर्यंत अॅक्टिव्ह सील इमारती – 5,951
  • जून 09 रोजी सील इमारती – 4,071
  • लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर 13 दिवसात सील करण्यात आलेल्या इमारतींची संख्या 1,880ने वाढली (स्रोत – बीएमसी)

मुंबईतील मलबार हिल, गावदेवी, नेपियन्सी रोड हा ‘डी’ वॉर्डचा परिसर उच्चभू लोकांचा परिसर म्हणून ओळखला जातो. मात्र लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्यानंतर या परिसरातील इमारतींमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या अचानक वाढलीय.

याबाबत बीबीसीशी बोलताना डी वॉर्डचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड म्हणतात, “लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर मुंबईतील सोसायट्यांमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढलीये हे निश्चित. घरात काम करण्यासाठी लोकं येऊ लागले. सोसायटीत ड्रायव्हर, नोकरांची यांची ये-जा सुरू झाली. लोकं ऑफिसला जाण्यासाठी घराबाहेर पडले. यातील काही नोकर, ड्रायव्हर यांना कोरोनाचा संसर्ग झाला. ज्यामुळे यांच्या संपर्कात आलेल्यांनाही कोरोनाची लागण झाली.

“लॉकडाऊनच्या काळात 5 किंवा 10 कोरोनाच्या केस सापडत असतील. तर आता 15 ते 20 केसेस मिळत आहेत. 4 सोसायट्यांमध्ये 10 ते 12 केसेस एकाच वेळी आढळून आल्या आहेत. तर, एका इमारतीत 15 केसेस आढळल्यानंतर संपूर्ण इमारत आम्ही सील केली. या इमारतीत पूर्णत: लोकांची ये-जा बंद करण्यात आली आहे,” असं प्रशांत गायकवाड पुढे म्हणतात.

झोपडपट्यांच्या तूलनेत इमारतीतील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढलीये का? यावर प्रशांत गायकवाड म्हणतात, “या आधी कोरोनाची प्रकरणं झोपडपट्या आणि चाळीत मोठ्या संख्येने होती. मात्र, लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर आता इमारतीतील लोकांना याचं इन्फेक्शन होऊ लागलंय. कोरोनाची लागण होणाऱ्यांमध्ये नोकरही आहेत आणि त्यांचे मालकही.”

डी वॉर्डमध्ये सद्य स्थितीत चाळ आणि झोपडपट्यांमध्ये 11 कंटेनमेंट झोन आहेत. तर या भागातील 113 इमारती पालिकेने सील केल्या आहेत. तर 7 जूनपासून 320 केसेस वाढल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिलीये. पालिकेने या इमारतीतील सार्वजनिक स्वच्छतागृह दिवसातून 4-5 वेळा सॅनिटाईज करण्याबाबत इमारतींना सूचना केल्या आहेत.

मलबाल हिल परिसरात राहणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो म्हणतात, “मोठ्या इमारतींमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतेय. लोकांनी यासाठी खबरदारी घेतली पाहिजे. सरकार आणि पालिकेने घालून दिलेल्या निर्देशांचं पालन योग्य केलं पाहिजे. लॉकडाऊनमध्ये लोकं घरी होते.

“मुंबई अंशत: अनलॉक झाल्यानंतर लोक कामाला जावू लागलेत. घरकाम करणारे, डायव्हर आणि इतर लोकं सोसायटीत येवू लागलेत. सॅनिटायझेशन, स्वत:ची सुरक्षा, मास्कचा वापर केला नाही तर इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे लोकांनी सोशल डिस्टन्सिंग आणि नियमांचं पालन केलं पाहिजे.”

मुंबईतील उच्चभू मानल्या जाणाऱ्या दादर, शिवाजीपार्क, माहिम या भागातली परिस्थितीही काहीशी अशीच आहे. एकीकडे आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीत कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असताना. दादर, माहिम परिसरात मात्र ही संख्या वाढतेय.

दादर

एकूण रुग्णसंख्या- 813

इमारतींमधील रुग्ण- 298म्हणजेच 48.13 टक्के

चाळीतील रुग्ण- 67 म्हणजेच 10.89 टक्के

मे महिन्यात दिवसाला सरासरी 9 रुग्ण आढळून येत होते. मात्र, जून महिन्यात यामध्ये वाढ होऊन सरासरी 15 रुग्ण आढळून येत आहेत. जूनच्या सुरुवातीपासून आत्तापर्यंत कोरोनाग्रस्तांच्या संख्येत 300ने वाढ झाली आहे.

(स्रोत – बीएमसी)

माहिम

कोरोनाबाधितांची संख्या- 885

जी-नॉर्थ भागातील 13 चाळी, झोपडपट्या कंटनमेंट झोन

सद्य स्थितीत 259 इमारती सील करण्यात आल्या आहेत

(स्रोत – बीएमसी)

मे महिन्यात दिवसाला सरासरी 15 रुग्ण आढळून येत होते. मात्र, जून महिन्यात यामध्ये वाढ होवून सरासरी 19 रुग्ण आढळून येत आहेत.

पण ही परिस्थिती फक्त काही विभागांची नाही. मुंबईतील इतर परिसरातही इमारतीत मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येत आहेत.

इमारतींमध्ये वाढणाऱ्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येबाबत जी नॉर्थ विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर म्हणतात, “एकीकडे धारावीतील कोरोनाबाधितांची संख्या कमी होतेय. सोमवारी धारावीत फक्त 5 नवीन रुग्णांची नोंद झालीये. मात्र, दुसरीकडे दादर, माहिम भागातील सोसायट्यांमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतेय. लॉकडाऊन शिथिल झाला. 50 टक्के दुकानं उघडली. इमारतींमध्ये कामासाठी बाहेरून येणाऱ्यांचा वावर वाढल्यामुळे इमारतींमध्ये अचानक कोव्हिड-19 चे रुग्ण वाढू लागले आहेत.”

मुंबईतील विभाग सील इमारतींची संख्या
टी वॉर्ड (मुलुंडचा परिसर) 454
के इस्ट (विलेपार्ले-अंधेरी) 644
आर सेंट्रेल (बोरीवली-पूर्व आणि पश्चिम) 589
एफ नॉर्थ (सायन-माटुंगा-वडाळा) 532
पी नॉर्थ (मालाड-कांदिवली) 471
पी साऊथ (गोरेगाव-मलाड) 277

याबाबत बोलताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर सांगतात, “हाउसिंग सोसायट्यांनी घरकामासाठी येणाऱ्या सर्व नोकरांची दररोज तपासणी गरजेची आहे. त्यांचं तापमान आणि शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण तपासावं, त्याची नोंद असावी. एकाद्याच्या शरीरात ऑक्सिजनची लेव्हल कमी आढळली तर तात्काळ योग्य पावलं उचलावीत. जेणेकरून संसर्गावर वेळीच आळा घालता येऊ शकेल.”

इमारतीत वाढणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेता द मुंबई डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशनने सर्व सोसायट्यांना एक पत्र लिहीलंय. या पत्रात हाउसिंग सोसायटीने काय काळजी घ्यावी याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत.

सोसायटींना करण्यात आलेल्या सूचना

  • ड्रायव्हरला सोसायटीच्या एन्ट्री किंवा बाहेर जाण्याच्या गेटपर्यंत येऊ द्यावं. आत येऊ देऊ नये
  • मालकांनी ड्रायव्हर कंटेनमेंट परिसरातून येणार नाही याची खबरदारी घ्यावी
  • अत्यावश्यक परिस्थितीत ड्रायव्हरला आत घ्यावं. मात्र शरीराचं तापमान आणि शरीरातील ऑक्सिजनची पातळी तपावासी
  • दूध, सेक्युरीटी गेटवर ठेवण्यात यावं
  • किराणा, पार्सल सिक्युरीटी गेटवरून कलेक्ट करावं
  • घरकामासाठी येणारे कंटेनमेंट झोनमधून येत नाहीत याची खबरदारी घ्यावी
  • मास्क आणि हॅन्ड ग्लोव्ह्ज गरजेचे आहेत

याबाबत बीबीसीशी बोलताना द मुंबई डिस्ट्रीक्ट को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर म्हणाले, “कोरोनाचा मुंबईत होणारा प्रादुर्भाव पाहता या सूचना देण्यात आल्या आहेत. जेणेकरून कोरोनाची साथ पसरणार नाही आणि यावर नियंत्रण शक्य होईल.”

गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या उत्तर आणि पूर्व उपनगरात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतेय. पोलिसांनी कोरोनाच्या वाढत्या संख्येवर नियंत्रणासाठी उत्तर मुंबईतील काही परिसरात पुन्हा लॉकडाऊन जारी केलाय.

याबाबत बोलताना उत्तर मुंबईचे अतिरिक्त आयुक्त दिलीप सावंत म्हणाले, “उत्तर मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या लक्षात घेता काजूपाडा, केतकीपाडा, संतोष नगर, गणपत पाटील नगर यांसारख्या भागांमध्ये लॉकडाऊन पुन्हा लावण्यात आलाय. या भागात रुग्णांची संख्या वाढतेय. त्यामुळे अत्यावश्यक सेवा फक्त सुरू ठेवण्यात आल्या आहेत.”

उत्तर मुंबईच्या दहिसर भागातील शिवसेना नगरसेविका शीतल म्हात्रे म्हणतात, “घरकामासाठी येणारे नोकर, ड्रायव्हर आणि इतरांबाबत राज्य सरकारकडून काहीच दिशा निर्देश आलेले नाहीत. घरकाम करणारे नोकर कंटेनमेंट झोनमधून येतात. चाळीत, झोपडपट्यात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर आहे. लॉकडाऊननंतर त्यांची इमारतीत ये-जा वाढली आहे. त्यामुळे सरकारने याबाबत ठोस नियमावली जाहीर करावी.”

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.बीबीसी विश्वरोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)

Source: https://www.bbc.com/marathi/india-53171482