मुंबई बातम्या

कोविडमुळे कला परंपरेला नवा आयाम – Maharashtra Times

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

द बॉम्बे आर्ट सोसायटीचे वार्षिक प्रदर्शन ही कलारसिकांसाठी पर्वणी असते. यंदा मात्र १२९व्या प्रदर्शनला कलाकार, कलारसिक हा माहौल करोनाच्या संकटामुळे प्रत्यक्षात अनुभवू शकणार नाहीत. तरीही प्रदर्शनाची परंपरा मोडायची नाही यासाठी बॉम्बे आर्ट सोसायटीच्या माध्यमातून हे प्रदर्शन यंदा ऑनलाइन माध्यमातून अनुभवता येणार आहे. या प्रदर्शनासाठी कलाकारांनी प्रवेशिका पाठवायला सुरुवात केली असून त्याची अंतिम तारीख २८ फेब्रुवारी आहे. त्यानंतर २५ मार्च ते २५ एप्रिल या काळात हे प्रदर्शन रसिकांना बॉम्बे आर्ट सोसायटीच्या वेबसाइटवर ऑनलाइन अनुभवता येईल.

यंदा करोनामुळे अजूनही कलादालने सुरू न झाल्याने या वार्षिक प्रदर्शनामध्ये खंड पडेल अशी भीती निर्माण होत असताना तंत्रज्ञानाचा अवलंब करत ऑनलाइनचा पर्याय स्वीकारण्यात आला. या वार्षिक प्रदर्शनामध्ये सर्वसाधारणपणे दिल्लीपासून दक्षिणेत आंध्र प्रदेश, तामिळनाडूपर्यंतचे कलाकार सहभाग नोंदवतात. मात्र यंदा ऑनलाइनमुळे अगदी जम्मूपासून सगळे कलाकार यात सहभागी होत आहेत, असे बॉम्बे आर्ट सोसायटीकडून स्पष्ट करण्यात आले. या निमित्ताने कलाक्षेत्रालाही थोडी चालना मिळेल तसे कला संग्रहाकांसाठीही खरेदीची संधी निर्माण होईल. यंदाही सुमारे तीन ते साडे तीन लाख रुपयांची पारितोषिके विजेत्यांना देण्यात येणार आहेत.

द बॉम्बे आर्ट सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी यंदा ऑनलाइन पद्धतीने प्रदर्शन असल्याने त्या वातावरणाचा अनुभव चित्रकारांना घेता येणार नाही असे सांगतानाच सगळ्या कलाकृती नाही तरी जहांगीर कलादालन सुरू झाल्यास कलादालनाशी बोलून नंतर विजेत्या सुमारे ४० कलाकृती रसिकांना पाहता येतील यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे सांगितले.

द बॉम्बे आर्ट सोसायटीचे वार्षिक प्रदर्शन हा कलाकारांच्याही अभिमानाचा विषय असतो. दिग्गज कलाकारही या स्पर्धेमध्ये मिळालेल्या पारितोषिकांचा वैयक्तिक ओळख करून देताना आवर्जून उल्लेख करतात. कलादालने उदयाला आलेली नव्हती तेव्हापासून या प्रदर्शनाची परंपरा सुरू आहे. त्यामुळे ही परंपरा कायम ठेवण्याचा यंदाही प्रयत्न करण्यात आला आहे, असे पाटील म्हणाले.

प्रतिसादाला विलंब

दरवर्षी या प्रदर्शनासाठी दोन ते अडीच हजार कलाकार प्रवेशिका पाठवतात. यंदा कदाचित महाविद्यालये सुरू नसल्याने विद्यार्थ्यांकडून प्रतिसाद मिळायला विलंब होऊ शकेल. मात्र प्रवेशिका पाठवण्यासाठी २८ फेब्रुवारीपर्यंतची तारीख असल्याने तोवर महाविद्यालये सुरू झाल्यास विद्यार्थ्यांनाही या प्रदर्शन आणि स्पर्धेमध्ये भाग घेण्याची संधी उपलब्ध होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. चित्रकार, कला विद्यार्थी यांच्यामध्ये अस्वस्थता जाणवत आहे. ही अस्वस्थता कमी होण्यासाठी या सोहळ्याची मोठी मदत होईल, असाही विश्वास या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना वाटत आहे.

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/this-year-exhibition-of-bombay-art-society-is-online/articleshow/80613078.cms