मुंबई बातम्या

Coronavirus : मुंबईत ३२४ नवे रुग्ण! – Loksatta

एकूण रुग्णसंख्या ५,१९४; आतापर्यंत २०४ जणांचा मृत्यू

मुंबई : मुंबईत रविवारी ३२४ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या ५,१९४ आणि मृतांची आकडेवारी २०४ इतकी झाली आहे.

रविवारी १३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली असून त्यात आठ पुरुष आणि पाच  महिला आहेत. त्यापैकी चार जणांना कोणताही आजार नसल्याचे समोर आले आहे.

मुंबईतील २४ पैकी दहा विभागांमध्ये २०० पेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. त्यात वरळी, प्रभादेवी, भायखळा, ग्रँटरोड, नाना चौक, अंधेरी-पार्ले पश्चिम, शीव-वडाळा, धारावी या भागांचा समावेश आहे.

दरम्यान, रविवारी १३५ जण करोनामुक्त होऊन घरी परतले. आतापर्यंत आढळलेल्या पाच हजार १९४ रुग्णांपैकी ८९७ जण करोनामुक्त झाले. यात मुंबई पालिका क्षेत्राबाहेर वास्तव्यास असलेल्या ९५ नागरिकांचा देखील समावेश आहे.

वरळी, प्रभादेवी विभागात सर्वाधिक ६०० रुग्ण आढळले असले तरी त्यातील १२५ बरे झाले आहेत. येत्या दिवसांमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढावे यासाठी पालिकेचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. रुग्ण बरे होण्याचा वेग वाढल्याने प्रतिबंधित क्षेत्र कमी होऊन नागरिकांची दिनचर्या सुरळीत होण्यास आणखी मदत होईल, असा विश्वास पालिकेने व्यक्त केला आहे.

धारावीतील रुग्णसंख्या २७५ 

’ धारावीमध्ये रविवारी एका दिवसात तब्बल ३४ नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकटय़ा धारावीतील रुग्णांचा आकडा २७५ वर गेला आहे. या रुग्णांमध्ये १८ ते ८८ वर्षे वयोगटातील महिला व पुरुषांचा समावेश आहे.

’ येथील रहिवाशांच्या मोठय़ा प्रमाणावर तपासण्या सुरू असून त्यातून हे रुग्ण पुढे येत आहेत. धारावीत टप्प्याटप्प्याने विविध गल्लय़ांमध्ये तपासणी होत आहे.

’ पेन्शन चाळ, सोशलनगर, विजयनगर, राजीव गांधी चाळ, जनता सोसायटी, ढोरवाडा अशा अनेक ठिकाणी हे रुग्ण आढळून आले आहेत.

’ धारावीत अंदाजे १० लाख लोक राहत असून त्यांच्यापर्यंत हा संसर्ग वेगाने पसरू नये म्हणून मोठय़ा प्रमाणावर तपासण्या करून त्यातून रुग्ण शोधण्याचे काम पालिकेची यंत्रणा करत आहे.

’ जास्तीत जास्त संशयित रुग्णांना वेगळे करून त्यांच्या चाचण्या करण्यावर भर देण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

विलगीकरण कक्ष वाढवले

धारावीत संशयित रुग्णांना एखाद्या संस्थेत विलगीकरण करून ठेवण्यावर भर दिला जात आहे. बाधित रुग्णाच्या अतिनिकट संपर्कातील लोकांमध्ये लक्षणे नसली तरी त्यांचे विलगीकरण केले जाते. मात्र जागेअभावी घरात विलगीकरण शक्य नसल्यामुळे विलगीकरण कक्षात पाठवले जात आहे. आतापर्यंत २,३०० खाटांची सोय करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

दवाखाने सुरू करण्याचे आदेश

धारावीतील ३५० खासगी दवाखान्यांच्या संघटनेशी पालिका अधिकाऱ्यांनी चर्चा केली असून हे सर्व दवाखाने सोमवारपासून सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या डॉक्टरांना पालिकेतर्फे सुरक्षा साहित्य पुरवले जाणार असून डॉक्टरांनी आपल्याकडे येणाऱ्या संशयित रुग्णांची महिती पालिकेला देण्याच्या सूचना दिल्या आहेत.

ताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.

First Published on April 27, 2020 1:48 am

Web Title: coronavirus cases in mumbai 324 new covid 19 positive patients in mumbai zws 70

Source: https://www.loksatta.com/mumbai-news/coronavirus-cases-in-mumbai-324-new-covid-19-positive-patients-in-mumbai-zws-70-2142618/