मुंबई बातम्या

मुंबई महापालिका आयुक्तांशी ‘वेबसंवादा’ची संधी – Loksatta

आर्थिक राजधानीबरोबरच देशाची ‘करोना राजधानी’ बनलेल्या मुंबईत, या अभूतपूर्व परिस्थितीशी मुंबई महापालिकेचे योद्धे जिवाची पर्वा न करता लढत आहेत. या योद्धय़ांचे शिलेदार, महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांच्याशी या लढाईविषयी जाणून घेण्याची संधी ‘लोकसत्ता’च्या वाचकांना ‘लोकसत्ता विश्लेषण’ कार्यक्रमातून मिळणार आहे.

विदेशातून आलेल्या नागरिकांची विमानतळावरच तपासणी करून करोनाबाधित आणि संशयितांची अलगीकरण आणि विलगीकरणात ठेवण्याची व्यवस्था पालिकेने चोख बजावली. त्यामुळे करोनाच्या संसर्गाच्या प्रसारावर नियंत्रण मिळविण्यात प्रशासनाला यश आले. त्यानंतर पालिकेने मोठय़ा प्रमाणावर विलगीकरण आणि अलगीकरण कक्ष सुरू केले. करोनाबाधितांवर उपचार करण्याची सुविधा अन्य रुग्णालयांमध्ये सुरू केली. करोनाविषयक चाचण्या खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यास परवानगी दिली.

आजघडीला देशात सर्वाधिक चाचण्या मुंबई महापालिकेच्या माध्यमातून होत आहेत. करोनाचा मुकाबला करण्यासाठी प्रशासनाने अतिशय वेगाने पावले उचलली. डॉक्टरांच्या मदतीला वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची फौजही उभी केली. आता तात्पुरत्या स्वरूपात मोठय़ा संख्येने डॉक्टर, परिचारिकांना पालिकेच्या सेवेत दाखल करून घेण्यात येणार आहे. आरोग्य खात्यातील कर्मचारी, आरोग्य स्वयंसेविकांनी घरोघरी फिरून तपासणीची मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे करोनाची लक्षणे असलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर वेळीच उपचार करण्यात यश मिळत आहे. करोनाच्या विरोधात मुंबई महापालिका कशा पद्धतीने सामना करीत आहे, कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत, आरोग्य यंत्रणा कशी काम करीत आहे याविषयी प्रवीणसिंह परदेशी माहिती देतील.

होणार काय?

करोनामुळे निर्माण झालेल्या टाळेबंदी-संचारबंदीच्या काळात हा संवाद वेबिनारच्या माध्यमातून, ‘झूम अ‍ॅप’च्या साह्य़ाने येत्या शुक्रवारी, १७ एप्रिल रोजी साधता येईल. या वेबिनारमध्ये वाचकांना आयुक्तांना थेट प्रश्न विचारता येणार आहेत. याशिवाय त्यांच्या कामातील लढय़ाचे अनुभव जाणून घेता येतील.

सहभागी कसे व्हाल?

http:// tiny.cc/Loksatta_Vishleshan या लिंकवर जाऊन नोंदणी करायची आहे. ती केल्यावर आपल्या इनबॉक्समध्ये एक संदेश येईल. त्यावर क्लिक करायचे आहे. अधिक माहितीसाठी या https://www.loksatta.com संकेतस्थळाला भेट द्या. याशिवाय वाचकांना बाजूचा क्यूआर कोडही स्कॅन करता येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.

First Published on April 15, 2020 12:51 am

Web Title: web interaction with mumbai municipal commissioner abn 97

Source: https://www.loksatta.com/mumbai-news/web-interaction-with-mumbai-municipal-commissioner-abn-97-2132331/