मुंबई बातम्या

Ranji Cricket : महाराष्ट्राविरुद्ध मुंबई बॅकफूटवरच – Sakal

Published on : 26 January 2023, 4:48 am

मुंबई : प्रतिष्ठा पणास लागलेला मुंबईचा संघ महाराष्ट्राविरुद्धच्या रणजी क्रिकेट सामन्यात दोन दिवस झाले तरी बॅकफूटवरच राहिला आहे. महाराष्ट्राच्या पहिल्या डावातील ३८४ धावांना उत्तर देताना मुंबईने निम्मा संघ १८७ धावांत गमावला आहे.

ब्रेबॉर्न स्टेडियमवर सुरू असलेला हा सामना साखळीतील अखेरचा आहे, पण बाद फेरीसाठी मुंबई-महाराष्ट्रासाठी ‘नॉकआऊट गेम’ सारखाच आहे. पहिल्या डावातील आघाडीतून मिळणारे तीन गुण बाद फेरीत स्थान मिळवून देणारे आहेत. त्यासाठी सुरू असलेल्या लढाईत मुंबईचा संघ मागे पडला आहे.

पृथ्वी शॉ भारतीय संघात निवड झाल्यामुळे त्याची अनुपस्थिती. त्यात खोऱ्याने धावा करत असलेल्या सर्फराझ खानला सामन्याआधी आलेला ताप, यामुळे मुंबईची फलंदाजी कमकुवत झाली. अशा परिस्थितीत अनुभवी अजिंक्य रहाणेवर मोठी मदार होती, पण रहाणे अपयशी ठरला, तसेच हुकमी यशस्वी जयस्वाल भोपळा फोडू शकला नाही. त्यामुळे दडपण अधिकच वाढले आहे.

तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणारा प्रसाद पवार ९९ धावांवार दिवसअखेर नाबाद राहिला, हीच त्यातल्या त्यात मुंबईसाठी समाधानाची बाब ठरली आहे. तनुष कोटियन बोटाला टाके असल्यामुळे फलंदाजीस येण्याची शक्यता कमी आहे.

तत्पूर्वी सकाळी महाराष्ट्राचा डाव ३८४ धावांत संपुष्टात आणल्यावर मुंबईचे सलामीवीर कशी सुरुवात करतात हे महत्त्वाचे होते; परंतु दुखापीनंतर पुनरागमन करणारा यशस्वी जयस्वाल पहिल्याच चेंडूवर बाद झाला आणि तेथून मुंबईचे फलंदाज टप्प्याटप्प्याने बाद होत गेले.

सक्सेना आणि प्रसाद पवार यांनी ७९ धावांची भागीदारी केली; परंतु जम बसला असे वाटत असताना सक्सेना बाद झाला. त्यानंतर तीन चौकारांसह १४ धावा करणाऱ्या रहाणेला दाधेने यष्टीरक्षक नवलेकडे झेल देण्यास भाग पाडले. मुंबईसाठी हा मोठा धक्का होता.

अरमान जाफरने पुन्हा एकदा संघाला गरज असताना निराशा केली. त्यानंतर पवार आणि सुवेद पारकर यांनी डाव सावरला; परंतु दिवसातले अखेरच्या षटकातील दोन चेंडू शिल्लक असताना पारकरच्या यष्टींचा वेध विकी ओस्तवालने घेतला.

कालच्या ६ बाद ३१४ धावांवरून खेळ पुढे सुरू करणारा सौरभ नवले आज आणखी दोनच धावा करू शकला.

संक्षिप्त धावफलक ः महाराष्ट्र, प. डाव ः ३८४ (सिद्धेश वीर ४८, केदार जाधव १२८, सौरभ नवले ५८, अक्षय पालकर ६६, तुषार देशपांडे २८-८-८९-२, मोहित अवस्थी २७-६-८९-५, शम्स मुलानी ३३.५-३-११८-३). मुंबई, पहिला डाव ः ५ बाद १८७ (दिव्यांश सक्सेना ३५, प्रसाद पवार खेळत आहे ९९, अजिंक्य रहाणे १४, अरमान जाफर १९, सुवेद पारकर २०, प्रदीप दाधे १३-३-५०-२, अक्षय पालकर ११-०-३९-१, सत्यजित बच्छाव २२-२-६१-१, विकी ऑस्तवाल १०.४-०-३७-१).

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMiUGh0dHBzOi8vd3d3LmVzYWthbC5jb20va3JpZGEvcmFuamktY3JpY2tldC1tdW1iYWktYmFjay1hZ2FpbnN0LW1haGFyYXNodHJhLXJzbjkz0gFUaHR0cHM6Ly93d3cuZXNha2FsLmNvbS9hbXAva3JpZGEvcmFuamktY3JpY2tldC1tdW1iYWktYmFjay1hZ2FpbnN0LW1haGFyYXNodHJhLXJzbjkz?oc=5