मुंबई बातम्या

मुंबईकरांनो लक्ष द्या! ३० जानेवारीला अर्ध्या मुंबईत पाणी नाही, ‘या’ भागांना बसणार फटका – महाराष्ट्र टाइम्स

म. टा. प्रतिनिधी, मुंबईः भांडुप संकुल येथील जलशुद्धीकरण केंद्रास अतिरिक्त ४,००० मिमी व्यासाची जलवाहिनी जोडण्याचे काम पालिकेद्वारे हाती घेण्यात येणार आहे. तसेच भांडुप संकुलाशी संबंधित जलवाहिन्यांवर दोन ठिकाणी झडपा बसविणे, नवीन जलवाहिन्यांची जोडणी आणि दोन ठिकाणी गळती दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. यासाठी ३० जानेवारी रोजी सकाळी १० ते ३१ रोजी सकाळी १० पर्यंत वांद्रे ते दहिसर पट्ट्यातील १२ विभागांत पाणीपुरवठा बंद; तर दादर, वरळी या दोन विभागांत २५ टक्के पाणीकपात केली जाणार आहे.

पश्चिम उपनगरातील वांद्रे एच पूर्व आणि वांद्रे एच पश्चिम, अंधेरी के पूर्व, अंधेरी के पश्चिम, गोरेगाव पी दक्षिण, मालाड पी उत्तर, कांदिवली आर दक्षिण, बोरिवली आर मध्य, दहिसर आर उत्तर, या नऊ विभागांतील तसेच पूर्व उपनगरांतील भांडुप एस विभाग, घाटकोपर एन विभाग आणि कुर्ला एल विभागातील अनेक भागांतदेखील पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित असणार आहे. या व्यतिरिक्त दादर ‘जी उत्तर’ आणि वरळी ‘जी दक्षिण’ या दोन विभागांतील माहीम पश्चिम, दादर पश्चिम, प्रभादेवी व माटुंगा पश्चिम या परिसरातील पाणीपुरवठ्यात २५ टक्के कपात करण्यात येणार आहे. तर, धारावी परिसरातील ज्या भागात दुपारी ४ ते सायंकाळी ९ या दरम्यान पाणीपुरवठा होतो, त्या भागात ३० जानेवारी रोजी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद असणार आहे.

४ फेब्रुवारीपर्यंत कमी दाबाने पुरवठा

नागरिकांना करण्यात येणारा पाणीपुरवठा हा अधिक सुरळीतपणे व चांगल्या पद्धतीने व्हावा, यासाठी ही कामे हाती घेतली जात आहेत. या कामांमुळे २९ जानेवारी तसेच ३१ जानेवारी ते ४ फेब्रुवारी या दरम्यान पालिकेच्या उपरोक्त विभागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. पाणीपुरवठा खंडित असण्याच्या व कमी दाबाने होण्याच्या कालावधीत नागरिकांनी पाणी जपून व काळजीपूर्वक वापरावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMigQFodHRwczovL21haGFyYXNodHJhdGltZXMuY29tL21haGFyYXNodHJhL211bWJhaS1uZXdzL2hhbGYtb2YtbXVtYmFpLXdvbnQtZ2V0LXdhdGVyLWZyb20tamFudWFyeS0zMC10by0zMS9hcnRpY2xlc2hvdy85NzI5NDcyNy5jbXPSAYUBaHR0cHM6Ly9tYWhhcmFzaHRyYXRpbWVzLmNvbS9tYWhhcmFzaHRyYS9tdW1iYWktbmV3cy9oYWxmLW9mLW11bWJhaS13b250LWdldC13YXRlci1mcm9tLWphbnVhcnktMzAtdG8tMzEvYW1wX2FydGljbGVzaG93Lzk3Mjk0NzI3LmNtcw?oc=5