मुंबई बातम्या

मुंबई गारठली! कमाल तापमान २५.५ अंश; पुढील तीन दिवस ढगाळ वातावरणाची शक्यता – Maharashtra Times

मुंबई : मुंबईत गेल्या आठवड्यात तापमान चढे होते. त्यानंतर पुन्हा एकदा पश्चिमी प्रकोपानंतर कोकण विभागात कमाल तापमानात घसरण झाली आहे. मुंबईमध्ये सोमवारी कमाल तापमान सांताक्रूझ येथे २६.५, तर कुलाबा येथे २५.५ अंश सेल्सिअस नोंदले गेले. डहाणू येथे २३ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. कोकण विभागात कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत तीन ते चार अंशांनी घसरले आहे. राज्यात उर्वरित भागात मात्र कमाल आणि किमान तापमान सरासरीहून अधिक आहे.

सांताक्रूझ येथे सोमवारी सकाळी १५.६, तर कुलाबा येथे १७.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. रविवारी सांताक्रूझ येथे १७, तर कुलाबा येथे १९.२ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले. रविवारी सांताक्रूझ येथे कमाल तापमान ३० अंश होते, तर कुलाबा येथे २६.४ अंश सेल्सिअस. कुलाबा येथे कमाल तापमानात रविवारपेक्षा मोठी घसरण झाली नाही. मात्र सांताक्रूझ येथे २४ तासांमध्ये तापमानात ३.५ अंशांनी घट झाली. राजस्थानच्या पश्चिम भागामध्ये तापमान कमी असल्याने याचा परिणाम सध्या उत्तर मुंबई, डहाणू येथे दिसत आहे. कोकणावरही याचा किंचित परिणाम दिसत आहे. डहाणू येथे कमाल तापमान ४.१ अंशांनी, हर्णे येथे ३.२ अंशांनी आणि रत्नागिरी येथे सरासरीहून दोन अंशांनी कमी नोंदले गेले. उर्वरित राज्यात कमाल तापमान चढे आहे. विदर्भात ३० ते ३२ अंश, मराठवाड्यातही ३० ते ३२ अंश, तर मध्य महाराष्ट्रात ३० अंशांच्या आसपास कमाल तापमानाची नोंद सोमवारी झाली.

आज अधिक थंडी

मुंबईचे किमान तापमान आज, मंगळवारी सोमवारपेक्षाही कमी नोंदले जाईल अशी शक्यता आहे. दिवसभर वाहत असलेल्या वाऱ्यांमुळे कमाल तापमानावर परिणाम केल्यानंतर मंगळवारी किमान तापमान १५ अंश किंवा त्याहून कमी असण्याचा अंदाज आहे. २५ आणि २६ जानेवारीलाही मुंबईमध्ये सकाळचे वातावरण आल्हाददायक असेल. येत्या सहा दिवसांमध्ये मुंबईच्या कमाल तापमानाचा पारा २९ अंशांच्या पलीकडे जायची शक्यता कमी आहे, असे प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजात सांगण्यात आले आहे. २४ ते २६ जानेवारी या तीन दिवसांच्या काळात मुंबईत सकाळी धुक्याचे वातावरणही असेल. त्यानंतर मात्र काहीसे ढगाळ वातावरणही असण्याची शक्यता आहे.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMiigFodHRwczovL21haGFyYXNodHJhdGltZXMuY29tL21haGFyYXNodHJhL211bWJhaS1uZXdzL211bWJhaXMtbWluaW11bS10ZW1wZXJhdHVyZS1pcy1saWtlbHktdG8tYmUtbG93ZXItb24tdHVlc2RheS9hcnRpY2xlc2hvdy85NzI2NDgwMC5jbXPSAY4BaHR0cHM6Ly9tYWhhcmFzaHRyYXRpbWVzLmNvbS9tYWhhcmFzaHRyYS9tdW1iYWktbmV3cy9tdW1iYWlzLW1pbmltdW0tdGVtcGVyYXR1cmUtaXMtbGlrZWx5LXRvLWJlLWxvd2VyLW9uLXR1ZXNkYXkvYW1wX2FydGljbGVzaG93Lzk3MjY0ODAwLmNtcw?oc=5