मुंबई बातम्या

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा : फलंदाजांच्या अपयशामुळे मुंबई अडचणीत – Loksatta

दिल्लीविरुद्ध दुसऱ्या डावात ९ बाद १६८ अशी स्थिती; केवळ ९२ धावांची आघाडी

नवी दिल्ली : कर्णधार अजिंक्य रहाणे (१०४ चेंडूंत ५१ धावा) आणि तनुष कोटियन (८७ चेंडूंत नाबाद ४८) यांचा अपवाद वगळता फलंदाजांनी केलेल्या निराशाजनक कामगिरीमुळे मुंबईचा संघ रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील ब-गटात दिल्लीविरुद्धच्या सामन्यात अडचणीत सापडला आहे.

नवी दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्याच्या तिसऱ्या दिवसअखेर मुंबईची दुसऱ्या डावात ९ बाद १६८ अशी स्थिती होती. मुंबईकडे केवळ ९२ धावांची आघाडी आहे. याच गटात सौराष्ट्र आणि महाराष्ट्र यांनी आपापले सामने जिंकल्याने मुंबईसाठी विजय महत्त्वाचा आहे. दिल्लीकडून दुसरा प्रथम श्रेणी सामना खेळणारा वेगवान गोलंदाज दिविज मेहराने (५/२९) भेदक मारा केला.

पहिल्या डावात ७६ धावांनी पिछाडीवर पडलेल्या मुंबईच्या दुसऱ्या डावाची सुरुवात अडखळती झाली. दिविज मेहराने मुशीर खान (५), पृथ्वी शॉ (१६), अरमान जाफर (१०) आणि सर्फराज खान (०) या मुंबईच्या आघाडीच्या फळीतील फलंदाजांना झटपट माघारी धाडले. प्रसाद पवारही (१) फार काळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही. त्यामुळे मुंबईची ५ बाद ३७ अशी अवस्था झाली. यानंतर रहाणेने शम्स मुलानीच्या (३०) मुंबईचा डाव सावरला. या दोघांनी ५६ धावांची भागीदारी रचली. फिरकीपटू हृतिक शौकिनने मुलानीला बाद करत ही जोडी फोडली. रहाणेला ५१ धावांवर प्रांशू विजयरनने माघारी पाठवले.

मग कोटियनने झुंजार फलंदाजी करताना मुंबईच्या धावसंख्येत भर घातली. दिवसअखेर तो ४८ धावांवर नाबाद होता.

त्यापूर्वी, तिसऱ्या दिवशी ७ बाद ३१६ धावांवरून पुढे खेळणाऱ्या दिल्लीचा पहिला डाव ३६९ धावांवर संपुष्टात आला.

सरवटेमुळे विदर्भाचा विक्रमी विजय

नागपूर : डावखुरा फिरकीपटू आदित्य सरवटेच्या (६/१७) उत्कृष्ट गोलंदाजीच्या बळावर विदर्भाने रणजी करंडक स्पर्धेतील सामन्यात गुजरातवर १८ धावांनी विक्रमी विजय मिळवला. गुजरातपुढे विजयासाठी केवळ ७३ धावांचे आव्हान होते. मात्र विदर्भाने गुजरातचा डाव केवळ ५४ धावांत गारद केला. त्यामुळे देशांतर्गत क्रिकेटमध्ये चौथ्या डावात सर्वात कमी धावसंख्या यशस्वीरीत्या रोखण्याचा विक्रम विदर्भाने आपल्या नावे केला.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMie2h0dHBzOi8vd3d3Lmxva3NhdHRhLmNvbS9rcmlkYS9yYW5qaS10cm9waHktbXVtYmFpLXZzLWRlbGhpLW11bWJhaS1pbi10cm91YmxlLWFzLWJhdHNtYW4tZmFpbC1hZ2FpbnN0LWRlbGhpLXp3cy03MC0zNDEwNDU0L9IBgAFodHRwczovL3d3dy5sb2tzYXR0YS5jb20va3JpZGEvcmFuamktdHJvcGh5LW11bWJhaS12cy1kZWxoaS1tdW1iYWktaW4tdHJvdWJsZS1hcy1iYXRzbWFuLWZhaWwtYWdhaW5zdC1kZWxoaS16d3MtNzAtMzQxMDQ1NC9saXRlLw?oc=5