मुंबई बातम्या

मुंबई : रस्ते कामांसाठी अखेर पाच कंत्राटदारांवर शिक्कामोर्तब, भूमीपूजनाच्या आदल्या दिवशी निर्णय – Loksatta

मुंबई : मुंबईतील शहर आणि उपनगरांतील रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यासाठी निविदा मागवून दीड महिना उलटून गेल्यानंतर बुधवारी उशिरा पाच कंत्राटदारांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. पंतप्रधानांच्या हस्ते गुरुवारी रस्ते काँक्रिटीकरण कामाचे भूमीपूजन होणार असून आदल्या दिवशी प्रशासनाने अखेर पाच कंत्राटदांराना कार्यादेश दिले.

येत्या दोन वर्षांत मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्याचा संकल्प सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सर्व रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचे निर्देश दिले होते. या कामांसाठी २४ नोव्हेंबर रोजी दुसऱ्यांदा निविदा मागवण्यात आल्या होत्या. शहर भागासाठी एक, पूर्व उपनगरासाठी एक आणि आणि पश्चिम उपनगरासाठी तीन अशा एकूण पाच निविदा मागवण्यात आल्या होत्या.

हेही वाचा – प्रियांका चोप्रा आणि माजी सचिव प्रकाश जाजू यांच्यातील वादावर पडदा, जाजू यांच्याविरोधातील गुन्हा उच्च न्यायालयाकडून रद्द

६,०७८ कोटी रुपये खर्चाच्या कामांसाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या. त्याला नऊ कंत्राटदारांनी प्रतिसाद दिला होता. १९ डिसेंबर रोजी या निविदांचे आर्थिक देकार उघडण्यात आले होते. मात्र या कामासाठी कंत्राटदार निश्चित करण्यात आले नव्हते. चर्चेच्या पातळीवर ही निविदा प्रक्रिया रखडली होती. त्यातच शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी रस्ते कामांच्या निविदा प्रक्रियेवरून आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या. पंतप्रधानांच्या हस्ते गुरुवारी या कामाचे भूमीपूजन होणार असल्याने आदल्या दिवशी प्रशासनाने कंत्राटदारांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.

मुंबई महानगरपालिकेच्यावतीने नियोजित ३९७ किलोमीटर लांबीच्या रस्ते काँक्रिटीकरणाच्या कामांमध्ये निश्चित कार्यपद्धती व नियमानुसारच कार्यवाही करण्यात आली असून या प्रक्रियेमध्ये निविदेतील निकषानुसारच सर्व कंत्राटदार पात्र ठरले आहेत. रस्ते कामांचा कालावधी ठरवताना काँक्रिट क्युरिंग टाइम व वाहतूक समन्वय यासह सर्व बाबी लक्षात घेवूनच तो ठरवण्यात आला आहे, असे महानगरकपालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.

हेही वाचा – मुंबई : राणीच्या बागेच्या विस्तारीकरणासाठी राखीव जागेचे आरक्षण रद्द, माझगावमधील जागा ‘रहिवासी वापरा’साठी आरक्षित होणार

कार्यालयीन अंदाजित खर्चावर कंत्राटदारांनी अधिक बोली लावली होती. मात्र, वाटाघाटीअंती सममूल्य दराने कंत्राट देण्यात आल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

————————

पाच कंत्राटदार कोण?

या पाच कंत्राटदारांच्या नावांबाबत मुंबई महानगरपालिका प्रशासनाने गुप्तता पाळली आहे. समृद्धी महामार्गाचे काम करणाऱ्या एका कंत्राटदाराचा या पाच कंत्राटदारांमध्ये समावेश असल्याचे समजते. राष्ट्रीय व राज्य स्तरावरील महामार्गांचे काम करण्याचा अनुभव असलेल्या संस्थांनाच निविदा प्रक्रियेत सहभाग घेण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे, या पाचही कंत्राटदारांना राष्ट्रीय व राज्य स्तरावरील महामार्ग बांधणीचा अनुभव आहे.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMifmh0dHBzOi8vd3d3Lmxva3NhdHRhLmNvbS9tdW1iYWkvZml2ZS1jb250cmFjdG9ycy1oYXZlLWJlZW4tc2VsZWN0ZWQtZm9yLXJvYWQtd29ya3MtaW4tbXVtYmFpLW11bWJhaS1wcmludC1uZXdzLXNzYi05My0zNDEwMzA0L9IBgwFodHRwczovL3d3dy5sb2tzYXR0YS5jb20vbXVtYmFpL2ZpdmUtY29udHJhY3RvcnMtaGF2ZS1iZWVuLXNlbGVjdGVkLWZvci1yb2FkLXdvcmtzLWluLW11bWJhaS1tdW1iYWktcHJpbnQtbmV3cy1zc2ItOTMtMzQxMDMwNC9saXRlLw?oc=5