मुंबई बातम्या

मुंबईतलं मेट्रोचं जाळं कसं आहे? यामुळे मुंबईकरांचा किती वेळ वाचणार? – BBC

फोटो स्रोत, Getty Images

‘दररोज आमची आर्धी उर्जा तर कामावर जाण्यासाठी आणि कामावरून परत घरी पोहचण्यासाठी खर्च होते आणि यात खूप वेळ जातो,’ ही तक्रार मुंबईत नोकरी करणारा जवळपास प्रत्येक नोकरदार करत असल्याचं दिसतं. कारण मुंबईत नोकरी करणाऱ्यांचा किंवा कामानिमित्त लोकल किंवा बसमधून दररोज प्रवास करणाऱ्यांचा दिवसभरातील बराचसा वेळ प्रवासात जातो. परंतु आता मुंबईत मेट्रोचा विस्तार होत असताना प्रवाशांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा आणखी एक मोठा पर्याय उपलब्ध होत आहे.

मेट्रोने दहिसर ते अंधेरी प्रवास 35 मिनिटांत करणं आता शक्य होणार असल्याने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मेट्रो 1 – घाटकोपर ते वर्सोवा, मेट्रो 2 अ- दहिसर ते अंधेरी पश्चिम आणि मेट्रो 7- दहिसर पूर्व ते गुंदवली, अंधेरी पूर्व अशा तीन मार्गिका एकमेकांशी जोडल्या जाणार आहेत. यामुळे पूर्व आणि पश्चिम प्रवास शक्य होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत गुरुवारी (19 जानेवारी) मेट्रो 1 ला जोडणाऱ्या मेट्रो 2 अ आणि मेट्रो 7 चा लोकार्पण सोहळा पार पडला. यानिमित्ताने जाणून घेऊया, मुंबईतलं मेट्रोचं नेटवर्कींग नेमकं कसं आहे? यामुळे मुंबईकरांना कसा दिलासा मिळणार आहे? आणि आगामी मेट्रोच्या प्रकल्पांची सद्यस्थिती काय आहे?

मेट्रोमुळे प्रवास सुकर आणि जलद होणार?

लोकल रेल्वे  ही देशाची आर्थिक राजधानी मुबंईची ‘लाईफलाईन’ मानली जाते. कारण गेल्या जवळपास 98 वर्षांपासून लोकल सेवा ही मुंबईकरांच्या सेवेत आहे.

आज लोकलमधून लाखो मुंबईकर दररोज प्रवास करतात. आणि आता मुंबईत मेट्रोचं नेटवर्कींग खऱ्या अर्थाने सुरू झालं असल्याने मुंबईकरांवरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होईल अशी प्रवाशांची अपेक्षा आहे.

मुंबईत मध्य, हार्बर आणि पश्चिम असे रेल्वेचे तीन मार्ग आहेत जे मुंबईतल्या सर्व भागातील ठिकाणांना एकमेकांशी जोडतात. परंतु यामुळे लोकल रेल्वेवर प्रचंड ताण आहे. रेल्वेच्या या तिन्ही मार्गांवर विशेषत: कार्यालय सुरू होण्याच्या आणि सुटण्याच्या वेळी मोठी गर्दी होते.

यामुळे अनेकदा प्रवासी जीव धोक्यात घालून प्रवास करत असताना दिसतात. तर अनेक अपघात होतात ज्यात प्रवाशांचा मृत्यूदेखील होतो.

19 जानेवारी 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत मेट्रो 7 आणि मेट्रो 2 अ चे लोकार्पण केले.

फोटो स्रोत, Getty Images

दुसऱ्याबाजूला रस्ते मार्गावरील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे मुंबईत पर्यायी वाहतूक व्यवस्थेची गरज निर्माण झाली आणि मुंबईत मेट्रोचं काम सुरू झालं.

मुंबईच्या पश्चिम उपनगरांना उत्तर आणि दक्षिण जोडणाऱ्या मेट्रो 2 अ आणि मेट्रो 7 या मार्गिका आता सुरू झाल्या आहेत. यामुळे मुंबईकरांना 35 ते 40 मिनिटांत दहिसर ते अंधेरी प्रवास करणं शक्य होणार आहे.

यामुळे पश्चिम द्रूतगती मार्गावरील (western express highway) वाहतूक कोंडी कमी होणार असून प्रवाशांना जलत वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

या दोन्ही मार्गावर मेट्रोच्या 6 कोच असलेल्या 22 ट्रेन्स धावतील.  प्रत्येक ट्रेनची क्षमता 2 हजार 308 प्रवाशांची आहे. यात 310 प्रवासी जागा आणि 1998 प्रवासी उभं राहून प्रवास करू शकतील.

मेट्रो 2 अ आणि मेट्रो 7

फोटो स्रोत, MMRDA

सुरुवातीच्या काळात सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत मेट्रो धावणार. पीक हावर्समध्ये दर 8 मिनिटांनी फेऱ्या होतील तर इतर वेळी दर 10 मिनिटांनी.

दोन्ही मार्गिकांवर सुरक्षेची व्यवस्था केली असून महिलांच्या सुरक्षेसाठी सर्व स्थानकांवर सुरक्षा कर्मचारी असतील अशी माहिती एमएमआरडीएने दिली आहे.

मेट्रोतून प्रवास करणाऱ्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी हेल्पलाईन क्रमांक आहे – 18008890808  आणि सर्व प्रवाशांसाठी हेल्पलाईन क्रमांक आहे – 18008890505

मेट्रो 2 अ – दहिसर ते अंधेरी प्रवास

मेट्रो 2 अ ही मेट्रो मार्गिका पश्चिम मुंबईतील एकूण 17 स्थानकांना जोडते. दहिसर पूर्व ते डीएननगर या मार्गिकेवरील या मेट्रोची एकूण 17 स्थानकं आहेत.

ही मार्गिका 18.6 किलोमिटर लांब असून हे अंतर प्रवाशांना 30-40 मिनिटात पार करता येणार आहे. हा मुंबईकरांसाठी मोठा दिलासा आहे कारण रस्ते मार्गावरून एवढ्या अंतरासाठी प्रवाशांना 1 तासाहून अधिक वेळ लागतो शिवाय प्रदुषण आणि वाहतूक कोडींचा सामाना करावा लागतो.

या प्रकल्पासाठी सरकारने आतापर्यंत 6 हजार 410 कोटी रुपये खर्च केले आहेत.

याच मेट्रोचा पहिला टप्पा आहे दहिसर ते डहाणूकरवाडी. पहिल्या टप्पा एप्रिल 2022 मध्ये एमएमआरडीएकडून (मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण) वाहतूक सेवेत दाखल करण्यात आला होता.

आता मेट्रो 2 अ मार्गिकेचे दोन्ही टप्पे सुरू झाल्याने दहिसर ते अंधेरी पश्चिम असा थेट प्रवास करता येणार आहे.

या मेट्रो मार्गिकेमुळे दहिसर ते अंधेरी प्रवास सुकर आणि अतिजलद होणार आहे.

मुंबई मेट्रो

फोटो स्रोत, Getty Images

मेट्रो 7 – दहिसर ते गुंदवली

मेट्रो मार्गिका 7 अंतर्गत अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व असा प्रवास मुंबईकरांना करता येणार आहे. या मार्गावर 13 स्थानकं असतील.

यामुळे प्रवाशांना 16.5 कि.मी. अंतर अवघ्या 20 ते 25 मिनिटांत पूर्ण करता येणार आहे. हेच अंतर रस्ते मार्गावरून प्रवास केल्यास प्रवाशांना साधारण 1 ते दीड तास वेळ लागतो.

मेट्रो 7 साठी सरकारने आतापर्यंत 6 हजार 208 कोटी रुपये खर्च केला आहे.

यापूर्वी एप्रिल 2022 मध्ये दहिसर ते आरे असा मेट्रो 7 चा पहिला टप्पा सुरू झाला होता. त्यामुळे आता मेट्रो 7 चे दोन्ही टप्पे पूर्ण झाल्याने दहिसर ते गुंदवली असा प्रवास करता येणार आहे.

मेट्रो 1- वर्सोवा ते घाटकोपर

मेट्रो 1 ही मुंबईत सुरू झालेली पहिली मेट्रो सेवा आहे. 2014 पासून ही मुंबईकरांच्या सेवेत आहे.

मध्य आणि पश्चिम रेल्वेला मेट्रो 1 कनेक्ट करते त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील ताण बराचसा कमी झाला आहे.

लॉकडाऊनपूर्वीपर्यंत मेट्रो-1 अंतर्गत एकूण 14 ट्रेनमध्ये दररोज 4 लाख 50 हजार प्रवासी प्रवास करत होते. त्यानंतर आता ही संख्या 3 लाख 85 लाख प्रवासी एवढी आहे. कोरोना आरोग्य संकटानंतर प्रवाशांची संख्या कमी झाल्याचं दिसून येत आहे.

मेट्रे 1 मार्गिका वर्सोवा, डीएन नगर, आजाद नगर, अंधेरी, वेस्‍टर्न एक्‍सप्रेस हाईवे, चकाला, मरोल नाका, साकी नाका, सुभाष नगर, असलफा रोड आणि घाटकोपर या स्थानकांवर थांबते. यामुळे प्रवाशांचा साधारण 1 तास ते 20 मिनिटं वेळ वाचतो.

मुंबई मेट्रोच्या कामामुळे होणारी वाहतूक कोंडी

फोटो स्रोत, Getty Images

मेट्रो 3 – कोलाबा- वांद्रे-सीप्झ – अंडरग्राऊंड मेट्रो

मेट्रो 3 हा प्रकल्प देशातील पहिला संपूर्ण अंडरग्राऊंड मेट्रो प्रकल्प आहे. त्यामुळे हा सरकारचा सर्वाधिक आव्हानात्मक आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.

30.5 किलोमीटर अंडरग्राऊंड मेट्रोचं दोन टप्प्यात काम सुरू आहे.

पहिल्या टप्प्यात अंधेरी सीप्झ ते बीकेसीपर्यंत मेट्रो मार्गिका सुरू होईल. तर दुसऱ्या टप्प्यात कफ परेड ते वरळी असा मार्ग असेल.

मेट्रो 3 मध्ये एकूण 26 स्थानकं असतील.

आरे ते बीकेसीपर्यंतचा पहिला टप्पा सज्ज असल्याची माहिती मेट्रो 3 व्यवस्थापनाने दिली आहे.

मुंबईसारख्या गुंतागुतींच्या शहरात भूमिगत मेट्रोचं काम सुरू असल्याने ते अधिक आव्हानात्मक असल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

मेट्रो 3 - अंडरग्राऊंड मेट्रो

फोटो स्रोत, Metro 3

लोकसंख्येची घनता, छोटे आणि गजबजलेले रस्ते, समुद्रापासून जवळ असल्याने अंडरग्राऊंड मेट्रो 3 चं काम अधिक गुंतागुतींचं आहे. परंतु मेट्रो 3 मुळे जवळपास 15 टक्के मुंबई उपनगर प्रवाशांना याचा फायदा होणार आहे.   

शिवाय मेट्र 3 इतर मेट्रो आणि लोकल रेल्वेलाही कनेक्ट करेल. मेट्रो 5, मेट्रो 9, मेट्रो 1 या मार्गिकांनाही मेट्रो 3 कनेक्ट राहील असं अधिकारी सांगतात.

30 ऑगस्ट 2022 रोजी मेट्रो-3 ची पहिली ट्रायल रन पार पडली.

मेट्रो 3 मध्ये प्रवाशांची क्षमता 2400 जागांची आहे. या मेट्रोचा नियोजित वेग 95 किमी प्रति तास आहे.

मेट्रो 4 आणि मेट्रो 5 – वडाळा ते ठाणे आणि ठाणे ते भिवंडीमार्गे कल्याण

मेट्रो

ठाणे ते भिवंडी ते कल्याण असा 24.90 किमी अंतर असलेला मार्ग मेट्रो 5 अंतर्गत सुरू होणार आहे. यामुळे ठाणे ते कल्याण प्रवास सुकर होईल. एमएमआरडीए अंतर्गत या प्रकल्पाचं काम सुरू आहे.

ठाणे ते कल्याण मेट्रोमध्ये एकूण 15 स्थानकं असतील.

हा मार्ग मेट्रो 4 मार्गिकेशी संलग्न असेल. त्यामुळे वडाळा ते कल्याण असाही प्रवास प्रवाशांना करता येऊ शकतो. तसंच कल्याण ते तळोजा असा मेट्रो लाईन 12 हा प्रकल्प सुद्धा प्रस्तावित आहे.

वडाळा ते ठाणे हा 32.32 किमी अंतराचा मार्ग आहे. यात एकूण 30 स्थानकं असतील. एमएमआरडीए अंतर्गत मेट्रो 4 आणि 5 चे काम सुरू आहे. मेट्रो 4 इस्टर्न एक्सप्रेस हायवेला संलग्न असेल.

तसंच मध्य रेल्वे, मोनो रेल, मेट्रो लाईन 2 बी आणि मेट्रो 5 लाईन या मार्गांना कनेक्ट करेल. यामुळे दक्षिण मुंबई ते ठाणे प्रवास सुकर होईल.

मेट्रो

मेट्रो मुंबईसाठी किती गरजेची?

मुंबई ही देशाची वित्तीय राजधानी असल्याने हे शहर व्यापाराचं मोठं केंद्र मानलं जातं. मुंबईतील अंदाजे 80 टक्क्यांहून अधिक लोक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करतात.

सध्याची उपनगरीय रेल्वे व्यवस्था मुंबईतील दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. परंतु यावरील वाढता ताण कमी करण्यासाठी आणि आगामी लोकसंख्येचा आणि गरजेचा विचार करता मुंबईत मेट्रोचं नेटवर्कींग केलं जात आहे.

पण मुंबईसारख्या गजबजलेल्या आणि समुद्रालगत असलेल्या शहरात मेट्रो व्यवस्था उभी करणं नक्कीच सोपं नाही. याउलट हा अधिक आव्हानात्मक प्रकल्प आहे. शिवाय, पावसाळ्यात मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचतं आणि लोकल रेल्वेलाही याचा फटका बसतो.

तसंच मुंबईसारख्या दाटीवाटीच्या ठिकाणी मेट्रोचं सुरू असलेलं काम हे गेल्या काही वर्षांपासून आणि युपुढेही काही वर्षं दैनंदिन वाहतूक कोंडीला कारणीभूत असेल असं जाणकार सांगतात. पण मुंबई मेट्रोसारखी पर्यायी व्यवस्था ही गरज आहे असंही तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

खरं तर मेट्रोची कामं 1980 नंतर टप्प्याटप्प्याने सुरू व्हायला पाहिजे होती असं  मुंबईत गेल्या अनेक वर्षांपासून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचं कव्हरेज केलेले ज्येष्ठ पत्रकार अमित जोशी सांगतात.

मेट्रो

मुंबई आणि दिल्लीची तुलना करताना ते सांगतात, “दिल्लीत 2000 नंतर मेट्रोची कामे धडाक्यात सुरु झाली आणि ती पुर्ण झाली, दिल्ली हे आठही दिशांना पसरलेलं आहे त्यामुळे तिथे म्हणावं तेवढी वाहतुक कोंडी, बांधकामाचा त्रास झाला नाही. मुंबईच्या तीन बाजूंना समुद्र आहे, त्यामुळे इथे पसरायला जागा नाही, त्यामुळे रस्तेही तसे आहेत, त्यामुळे इथे वाहतुक कोंडीचा अनुभव येत आहे.”

“मुंबईसारख्या महानगरमध्ये विविध सार्वजनिक वाहतुकीचे पर्याय अत्यंत आवश्यक आहेत. मात्र इथे सर्व भार हा लोकल ट्रेनवर आहे, बेस्ट बसमधील प्रवासी संख्या वाढण्यापेक्षा कमी होत आहे, रस्त्यावरली वाहनांची गर्दी वाढत आहे. अशा वेळी मेट्रो एक मोठा पर्याय सर्वसमान्यांना ठरणार आहे. मुंबईत मेट्रोचे जाळे-नेटवर्क हे आवश्यकच आहे. लोकांची पैसे द्यायची तयारी आहे, त्यामुळे एसी प्रवास किंवा त्यासाठी पैसे खर्च करणे लोकांना परवडते,”

मुंबईत आतापर्यंत तीन मेट्रो प्रकल्प सुरू झाले असून बाकी 11 प्रकल्पांचं काम प्रलंबित आहे.

ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र अकलेकर सांगतात, “मेट्रोचं जे नेटवर्किंग आता करत आहेत ते खरं तर 20 वर्षांपूर्वी व्हायला हवं होतं. रेल्वेवरील ताण प्रचंड वाढलाय. 1964 साली ट्राम बंद झाली. त्यानंतर आपण कोणती पर्यायी व्यवसाय सुरू केली नाही. रिक्षा, टॅक्सी, बस आणि लोकल एवढेच पर्याय आहेत. पण या तुलनेत प्रवासी संख्या खूप जास्त आहे.”

मेट्रो सुरू झाल्याने निश्चितच फरक पडेल असंही ते सांगतात. पण आता पश्चिम मुंबई या भागातच मेट्रो सुरू आहे. त्यातही विरारहून चर्चगेटला येणा-या प्रवाशांसाठी यात दिलासा नाही. तसंच पूर्व मुंबई आणि उपनगरातही गर्दी वाढली आहे. विक्रोळी, घाटकोपर, मुलुंड यांसारख्या भागात मेट्रो 4 सुरू झाल्यावर दिलासा मिळेल. पण याला अजून वेळ आहे.

मेट्रो 3 पहिला टप्पा 2023 पर्यंत पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे आता पूर्व उपनगरांकडे लक्ष देण्याची गरज आहे. मुंबईत सगळीकडे रिअल इस्टेटचं जाळं पसरलं, सगळीकडे घरं बांधली पण अपेक्षित सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अजून पोहचली नाही त्यामुळे मुंबईत आजही वाहतूक कोंडी आहे.

ते पुढे सांगतात, “मुंबईत एकाचवेळी एवढे प्रकल्प कधीच सुरू नव्हते. त्यामुळे प्रदुषण वाढलंय. आणखी 2-3 वर्षं अशीच परिस्थिती कायम राहील. त्यानंतर थोडे बदल होतील. मेट्रोचं काम सुरू असताना रिअल टाईम माॅनीटरींग व्हायला हवं. एकाबाजूला पार्क केलेल्या गाड्या आणि मेट्रोचं बॅरिकेटींग यामुळे वाहतूक कोंडी होते. ती कमी करण्यासाठी काम झालं की लगेच बॅरिकेट्स हटवायला हवे. पण हे नियोजन होताना दिसत नाही.”

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. ‘गोष्ट दुनियेची‘, ‘सोपी गोष्ट‘ आणि ‘3 गोष्टी‘ हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMiMWh0dHBzOi8vd3d3LmJiYy5jb20vbWFyYXRoaS9hcnRpY2xlcy9jems5Mm4xanhkOW_SATVodHRwczovL3d3dy5iYmMuY29tL21hcmF0aGkvYXJ0aWNsZXMvY3prOTJuMWp4ZDlvLmFtcA?oc=5