मुंबई बातम्या

दोन वर्षांनी मुंबई पुन्हा धावली! – Sakal

दोन वर्षांनी मुंबई पुन्हा धावली!

मुंबई
sakal_logo

By

मुबई, ता. १५ ः आशिया खंडातील सर्वात मोठी धावण्याची शर्यत असा लौकिक असलेली ‘मुंबई मॅरेथॉन’ रविवारी पुन्हा एकदा आपल्या मूळ रूपात आणि ढंगात जोशात पार पडली. कोरोना संसर्गाच्या दोन वर्षांनंतर तोच उत्साह आणि तेवढाच जल्लोष पुन्हा एकदा मुंबईकरांनी अनुभवला. ५० हजारांपेक्षा अधिक धावपटूंचा विक्रमी सहभाग मॅरेथॉनच्या इतिहासात प्रथमच पाहायला मिळाला. पहाटेच्या गुलाबी थंडीत तब्बल ५५ हजार धावपटूंनी मुंबईचे स्पिरीट पुन्हा एकदा दाखवून दिले.

जानेवारीचा तिसरा रविवार ‘मुंबई मॅरेथॉन’चा दिवस असतो. कोरोनामुळे गेली दोन वर्षे मुंबई मॅरेथॉनला ब्रेक लागला होता; पण यंदाचे पुनरागमन तेवढेच झोकात होते. कोठेही उत्साह कमी नव्हता. पहाटे पहाटे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या लोकल हौशी धावपटूंच्या गर्दीमुळे भरभरून वाहत होत्या. मॅरेथॉनला मिळणाऱ्या पसंतीची पहिली निशाणी अशी गर्दीच असते. हौशी स्पर्धक मुंबई मॅरेथॉनची शान असतात. अगदी राज्यभराहून आलेल्या सर्व वयोगटातील स्पर्धकांनी मॅरेथॉनला चार चाँद लावले. परदेशी धावपटूंबरोबरच मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येकाला प्रोत्साहन देण्यासाठी रस्त्यांवर उतरलेल्या मुंबईकरांनीही विविध वेशभूषा करून आणि चित्ररूपी संदेश देत लक्ष वेधून घेतले. एका अनमोल घटनेचे ते साक्षीदार झाले.

५० हजारांपेक्षा अधिक धावपटूंचा सहभाग मुंबई मॅरेथॉनच्या इतिहासात एक विक्रमच म्हणता येईल. जणू काही धावपटूंनी दोन वर्षांची कसरच भरून काढली. ठिकठिकाणी खोदण्यात आलेले रस्ते आणि त्यामुळे अरुंद झालेल्या मार्गातून अडथळ्याची स्पर्धा करावी लागली असली तरी धावपटूंचा उत्साह अजिबात कमी झाला नव्हता. नेहमीप्रमाणे पेडर रोडवासीय रस्त्यांवर उतरून आपापल्या परीने धावपटूंचा उत्साह वाढवत होते. पाणी, बिस्किटे, फळे, एनर्जी ड्रिंक्स आदींची सोय त्यांनी स्वखर्चाने केली होती. विशेष म्हणजे, त्यात लहान मुलांचा समावेश उल्लेखनीय होता. ठिकठिकाणी करण्यात आलेल्या बॅण्ड पथकांचा निनाद वातावरण भारून टाकणारा होता.

थंडीमुळे स्पर्धकांत उत्साह
धावण्यासाठी थंड हवामान फार उपयुक्त असते. दोन दिवसांपासून मुंबई चांगलीच गारठली आहे. मुंबईतील तापमान १८ अंश सेल्सियस इतके कमी झाले आहे. अशा गुलाबी थंडीच्या वातावरणामुळे धावपटू सुखावले होते. त्यांनी धावण्याचा अधिक आनंद घेतला. हुरूप वाढल्यामुळे अनेकांनी अपेक्षित वेळेअगोदरच शर्यती पूर्ण केल्या.

माहीममध्येही भल्या पहाटे जल्लोष
आतापर्यंत अर्ध मॅरेथॉन वरळीतील दुग्धालय परिसरातून सुरू व्हायची; परंतु तिथे सध्या सागरी मार्गाचे काम सुरू असल्याने माहीम कॉजवे चौपाटी मैदानावरून शर्यत सुरू करण्यात आली. पहाटे ५.१५ वाजता शर्यतीला सुरुवात झाली. मोठ्या संख्येने आलेल्या धावपटूंच्या उपस्थितीने वातावरण भारून गेले होते. धावपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी माहीममधील रहिवासी आवर्जून उपस्थित होते.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMiXmh0dHBzOi8vd3d3LmVzYWthbC5jb20vbXVtYmFpL3RvZGF5cy1sYXRlc3QtbWFyYXRoaS1uZXdzLW11bTIzaDEzMDA0LXR4dC1tdW1iYWktMjAyMzAxMTUxMTI3MzHSAWJodHRwczovL3d3dy5lc2FrYWwuY29tL2FtcC9tdW1iYWkvdG9kYXlzLWxhdGVzdC1tYXJhdGhpLW5ld3MtbXVtMjNoMTMwMDQtdHh0LW11bWJhaS0yMDIzMDExNTExMjczMQ?oc=5