मुंबई बातम्या

एकनाथ शिंदे गटाला डावलले; मुंबई विद्यापीठ अधिसभेवर भाजपचेच वर्चस्व – Maharashtra Times

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेवर राज्यपाल नामनिर्देशित नऊ सिनेट सदस्यांची निवड करण्यात आली आहे. भाजपसोबत सत्तेत असलेल्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला या सदस्यांमध्ये प्रतिनिधीत्व दिले नसून भाजपचेच वर्चस्व असल्याचे दिसत आहे. तसेच मनसेची भाजप आणि शिंदे गटासोबत जवळीक वाढल्याचे चित्र असताना मनसेलाही दूर ठेवण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

विद्यापीठाच्या अधिसभेवर राज्यपालांकडून १० सदस्यांना नामनिर्देशित केले जाते. मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेची मुदत सप्टेंबर महिन्यात संपुष्टात आली. त्यानंतर राज्यपालांकडून नामनिर्देशित केल्या जाणाऱ्या सदस्यांची नियुक्ती रखडली होती. अखेर शुक्रवारी ६ जानेवारीला राज्यपाल नामनिर्देशित सदस्यांची मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेवर नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीचे पत्र राजभवनकडून मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंना पाठविण्यात आले आहे. राज्यपालांकडून विद्यापीठाच्या अधिसभेवर किरण लेले, अॅड. आशीष चव्हाण, संतोष परब, वर्षा परचुरे, चैतन्य गिरी, सुशीलकुमार जाजू, भुषण मार्डे, मयुरेश नेटकर, रुची माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यपालांनी नामनिर्देशित केलेल्या सदस्यांमध्ये शिंदे गटाला प्रतिनिधित्व मिळाले नसल्याचे या यादीवरून दिसत आहे. राज्यपाल नियुक्त सदस्यांमध्ये शिंदे गटातील सदस्य घेतले जावेत यासाठी शिंदे गटाकडून प्रयत्न केला जात होता. शिंदे गटातील इच्छुकांची यादीही बनविण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात शिंदे गटाला प्रतिनिधित्व मिळाले नसल्याने इच्छुकांचा हिरमोड झाल्याचे सूत्रांकडून समजते. अद्यापही राज्यपाल नामनिर्देशित सदस्याची एक जागा रिक्त आहे. त्यावर तरी शिंदे गटातील कोणाची वर्णी लागणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMiiQFodHRwczovL21haGFyYXNodHJhdGltZXMuY29tL21haGFyYXNodHJhL211bWJhaS1uZXdzLzktbWVtYmVycy1ub21pbmF0ZWQtYnktZ292ZXJub3ItdG8tYWdtLW9mLW11bWJhaS11bml2ZXJzaXR5L2FydGljbGVzaG93Lzk2OTI1NjIwLmNtc9IBAA?oc=5