मुंबई बातम्या

मुंबई इंडियन्स पलटनमध्ये ‘हिटमॅन’ ला 12 वर्ष पूर्ण! Video शेअर करत जागवल्या आठवणी – News18 लोकमत

मुंबई, 8 जानेवारी : मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएल मधील सर्वात यशस्वी संघ मानला जातो. सचिन तेंडुलकर, युवराज सिंह, हरभजन सिंह या सारख्या दिग्गज क्रिकेटपटूंनी मुंबई इंडियन्स संघाच्या कामगिरीत मोलाचे योगदान दिले. परंतु खऱ्या अर्थाने ‘हिटमॅन’ रोहित शर्मा हा मुंबई इंडियन्स संघाच्या आयपीएल विजयाचा शिल्पकार ठरला. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाने आतापर्यंत तब्बल 5 वेळा आयपीएल चषक पटकावला आहे. आज रोहित शर्माला मुंबई इंडियन्स पलटनमध्ये 12 वर्ष पूर्ण झाली असून आठवणींना उजाळा देत मुंबई संघाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

इंडियन प्रीमिअर लीगचे सुरुवातीचे तीन वर्ष रोहित शर्मा डेक्कन चार्जर्स या संघाकडून खेळला. मात्र सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असणाऱ्या ‘हिटमॅन’ रोहित शर्माला 2011 मध्ये मुंबई इंडियन्स संघाने खरेदी केले. अवघ्या 23 व्या वर्षी, तो चौथ्या आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनला. 2013 मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा मुंबई इंडियन्सने आयपीएलचा चषक उंचावला होता. त्यानंतर 2015, 2017, 2019 आणि 2020 असे तब्बल 5 वेळा रोहितने मुंबई इंडियन्स संघाला आयपीएलचे विजेतेपद मिळवून दिले आहे.

 हे हि वाचा :    IND VS SL : सूर्यकुमारने राजकोटच्या मैदानावर तोडला रोहित शर्माचा रेकॉर्ड

मुंबई इंडियन्स पलटन मध्ये 12 वर्ष पूर्ण झाल्यानंतर रोहित शर्माने आपल्या भावना व्यक्त केल्या. तो म्हणाला, “मला विश्वासच बसत नाही की मुंबई इंडियन्समध्ये 12 वर्षे झाली आहेत. माझ्यासाठी हा अत्यंत रोमांचक आणि भावनिक प्रवास आहे. आम्ही सर्व दिग्गज, तरुण आणि आमच्या पलटनने मिळून खूप काही साध्य केले आहे. मुंबई इंडियन्स हे माझे कुटुंब आहे .  मी माझे सहकारी खेळाडू, चाहते आणि व्यवस्थापनाचे आभार मानू इच्छितो. आमच्या पलटनसाठी आणखी अनेक आठवणी निर्माण करण्यासाठी आणि आणखी हसू पसरवून आनंद देण्यास मी उत्सुक आहे.”

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMijAFodHRwczovL2xva21hdC5uZXdzMTguY29tL3Nwb3J0L2hpdG1hbi1jb21wbGV0ZXMtMTIteWVhcnMtaW4tbXVtYmFpLWluZGlhbnMtcGFsdGFuLW11bWJhaS1pbmRpbmFzLXRlYW0tc2hhcmUtdmlkZW8tbWVtb3JpZXMtbWhwcC04MTEyODYuaHRtbNIBkAFodHRwczovL2xva21hdC5uZXdzMTguY29tL2FtcC9zcG9ydC9oaXRtYW4tY29tcGxldGVzLTEyLXllYXJzLWluLW11bWJhaS1pbmRpYW5zLXBhbHRhbi1tdW1iYWktaW5kaW5hcy10ZWFtLXNoYXJlLXZpZGVvLW1lbW9yaWVzLW1ocHAtODExMjg2Lmh0bWw?oc=5