मुंबई बातम्या

मुंबई विमानतळावर मोठी घटना, तब्बल 80 कोटींचे ड्रग्स जप्त – News18 लोकमत

अमित राय, प्रतिनिधी
मुंबई, 06 ऑक्टोबर : मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात ड्रग्स तस्करांवर कारवाई केली जात आहे. अशातच मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तब्बल 80 कोटी रुपयांचे ड्रग्स पकडण्यात आले आहे. DRI च्या टीमने विमानतळावर एका तरुणाला ताब्यात घेतले आहे.

मुंबई विमातळावर DRI च्या टीमने मुंबई आंतराराष्ट्रीय विमानतळावर मोठी कारवाई केली. एका नागरिकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्याच्याकडून 16 किलो उच्च दर्जाचे हेरोईन ड्रग्स जप्त केले. याची आंतरराष्ट्रीय बाजारात 80 कोटीपेक्षा जास्त किंमत असल्याचे सांगितले जात आहे. बिनू जॉन असं या आरोपीचं नाव आहे. तो केरळ इथं राहणार आहे. त्याने ट्रॉलीच्या बॅगमध्ये हेरोईन ड्रग्स लपवून आणले होते.

DRI च्या टीमने दिलेल्या माहितीनुसार, गुप्त खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर विमानतळावर ही कारवाई करण्यात आली. बिनू जॉनला ताब्यात घेण्यात आले. सुरुवातीला त्याची तपासणी केली असता त्यामध्ये काहीच आढळले नाही. पण जेव्हा ट्रॉली बॅगेची तपासणी केली असता बनावट कैविटीमध्ये ड्रग्स सापडले.

(2500 कोटींचं ड्रग्ज प्रकरण; मुंबईजवळ अँटी नार्कोटिक्स सेलची मोठी कारवाई)

आरोपी ड्रग्स तस्कर बिनू जॉनने DRI च्या टीमला सांगितलं की, एका परदेशी नागरिकाने हे ड्रग्स भारतात घेऊन जाण्यासाठी 1 हजार डॉलर दिले होते. कमिशन म्हणून ही रक्कम दिली होती. तसंच त्याने इतर आरोपींच्या नावाचाही खुलासा केला. या माहितीच्या आधारे DRI टीम पुढील चौकशी करत आहे. आरोपीने याआधी किती वेळा ड्रग्स आणले, कुणाला दिले याचा शोध घेतला जात आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मुंबई विमानतळावर केनिया येथून आलेले एका महिलेनं 5 कोटी रुपये किंमतीचे ड्रग्स सँडलमध्ये आणले होते. याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात 4.9 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे.

(पर्सनल व्हिडीओ, फोटो व्हायरल करण्याची धमकी; तुमचं नाव बाहेर न येता होईल बंदोबस्त)

29 सप्टेंबर रोजी मुंबई विमानतळावर सीमाशुल्क विभागाने मोठी कारवाई करत 490 ग्रॅम कोकेन जप्त केले होते. ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत अंदाजे 4.9 कोटी रुपये होती. सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे कोकेन सँडलमध्ये लपवून आणण्यात आले होते. या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. यानंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Source: https://lokmat.news18.com/maharashtra/drugs-worth-80-crores-seized-in-mumbai-airport-by-dri-team-mhss-770060.html