मुंबई बातम्या

मुंबई महापालिका – MahaMTB


irfaan

मुंबईच्या रस्त्यांवर असणारे खड्डे म्हणजे मुंबईकरांची मागील अनेक वर्षांपासून न सुटलेली समस्या आहे. या मुंबईतील खड्ड्यांमुळे अनेकांना आपले प्राणही गमवावे लागले आहेत. मुंबईतील या खड्ड्यांकडे जरी मुंबई महापालिकेने दुर्लक्ष केले असले तरी सामान्य जनतेच्या नजरेतून मात्र काहीही सुटलेले नाही. मुंबईतील इरफान मच्छीवाला यांनी साधारणतः २०१८ साली स्वतःच खड्डे बुजविण्यास सुरवात केली. त्यांच्या या कामात त्यांना फारूक धाला, एस एम इस्माईल, गुलझार राणा यांसारख्या अनेकांची साथही लाभली. त्यांच्या या कार्याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी “दै. मुंबई तरुण भारत”ने मुंबई ग्राउंड झिरोच्या माध्यमातून त्यांच्याशी संवाद साधला.आपण स्वतः पुढे येऊन मुंबईतील रस्त्यांवर असणारे खड्डे बुजवावे हा विचार मनात येणं म्हणजे देखील एक मोठी गोष्ट आहे. मात्र इरफान मच्छीवाला यांनी व त्यांच्या टीमने ही गोष्ट अंमलात देखील आणली. परंतु यामागची प्रेरणा ही मुंबईतील रस्त्यांवर झालेल्या अपघातांची बातमी वाचून मिळाल्याचे त्यांनी सांगितले. “मी जेव्हाही वृत्तपत्र वाचायचो तेव्हा त्यात रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे कोणालातरी प्राण गमवावे लागल्याची बातमीच वाचण्यास मिळत होती. त्यावेळी मनात असं आलं की जर मुंबई महापालिका खड्डे बुजविण्याचे काम करत नसेल तर आपण करावे म्हणून मी व माझ्या मित्रांनी मिळून रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यास सुरवात केली”, असेही इरफान मच्छीवाला यांनी म्हटले.तसेच या कामाबद्दल सांगत असताना त्यांनी म्हटले की,”मुंबईत कुठे ना कुठे इमारत किंवा घर दुरुस्तीचे काम सुरु असते. त्याचा जो फेकलेला मलबा असावयाचा तो आम्ही रस्त्यातील खड्डे बुजविण्यास वापरात असू. सुरवातीला केवळ मी व माझे मित्रच हे काम करण्यास सुरवात केली. मात्र काही काळानंतर आमच्याबद्दल बातमी नागरिकांनी पहिली व काही नागरिकांनी देखील रस्त्यावर उतरून खड्डे भरण्यास सुरवात केली. त्यावेळी पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी काही वर्तमानपत्रांमार्फत असे सांगितले की नागरिकांनी स्वतः रस्त्यावर उतरून खड्डे बुजवु नये. तर पालिका अधिकाऱ्यांना, वॉर्ड अधिकाऱ्यांना यासंदर्भात कालवावे. मात्र ज्यावेळी आम्ही स्वतः खड्डे बुजवत होतो त्यावेळी आम्हाला निकाल त्वरित मिळायला. मात्र आता प्रथम तक्रार करावी लागते. त्यांनतर एक आठवडा मागोस घेतल्यानंतर ते काम पूर्ण होते,”असे सांगत असतानाच आम्ही समाजकार्यात आहोत म्हणून आम्हाला एका आठवड्यात दाद मिळते. मात्र नागरिकांना एक एक महिना थांबावं लागत असल्याचंही इरफान मच्छीवाला यांनी स्पष्ट केले.तसेच “पालिकेकडून उत्तम दराचे काम होणे गरजेचे आहे मात्र ते होत नाही. त्यामुळे सतत रस्त्यांवर खड्डे पडत असतात. परंतु यासंदर्भात जे अधिकारी आहेत त्यांच्यावर फास्टट्रॅक कोर्टाकडून कारवाई करण्यात आली पाहिजे. तसेच त्यांच्या निवृत्तीनंतरच्या सुविधांवर बंदी आणली पाहिजे. जेणेकरून त्यांना त्यांची चूक समजेल व कामही योग्य त्या पद्धतीने होईल. तसेच भ्रष्टाचार केल्याची एवढी मोठी शिक्षा मिळणार हे जर त्यांना कळले तर ते आपल्या कामात सुधार आणतील. मागील २५ ते ३० वर्षांपासून सत्तेत बसलेल्यानी देखील येथे लक्ष द्यावे. कारण मागील २५ – ३० वर्षांपासून भ्रष्टाचारात वाढ होत असल्याचेच पाहत आहोत,” असे मत फारूक धाला यांनी व्यक्त केले आहे.त्याचबरोबर मागील ७२ वर्षांपासून माहीम मध्ये वास्तव्यास असणाऱ्या एस एम इस्माईल यांनी देखील मुंबई महापालिकेने गांभीर्याने लक्ष घालून मुंबईतील रस्ते नीट व खड्डेमुक्त बनवावे अशी मागणी केली आहे. तसेच आताच्या युवा पिढीने देखील पुढे येऊन आपली जवाबदारी बजावणे गरजेचे असल्याचे इरफान मच्छीवाला यांनी म्हटले आहे. सोशल मीडिया म्हणजे सध्याच्या काळात एक उत्तम आणि उपयोगी साधन आहे. जर अशा काही समस्या नागरिकांना दिसत आहेत तर त्यांनी ट्विटर किंवा इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रशासनाला ही गोष्ट दाखवून द्यावी. कारण जर सर्व नागरिकांनी मिळून ही गोष्ट केली तरच मुंबई महापालिकेचे डोळे उघडतील,” असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.– शेफाली ढवण

Source: https://www.mahamtb.com/Encyc/2022/9/29/pothole-irfaan-machhiwala.html