मुंबई बातम्या

यापूर्वी दसरा मेळाव्याला परवानगी कोणत्या आधारे?; मुंबई पालिकेचा तपास सुरू – Loksatta

मुंबई : गणेशोत्सवाची सांगता होताच आता दसरा मेळाव्याची चर्चा सुरू झाली असून परवानगीसाठी शिवसेना आणि शिंदे गटानेही मुंबई पालिकेकडे अर्ज केला आहे. या अर्जांची छाननी करण्यात येणार असून यापूर्वी दसरा मेळाव्यासाठी कोणत्या आधारावर परवानगी देण्यात आली आहे, हे तपासले जाणार आहे, असे समजते. त्याचा अहवाल पालिका आयुक्तांकडे सादर केला जाणार असून आयुक्त यावर लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दादरच्या शिवाजी पार्क मैदानात यंदाचा दसरा मेळावा कुणाचा होणार यावरून राजकीय वाद पेटला आहे. या मेळाव्यासाठी शिवसेनेने अर्ज केला आहेच पण शिंदे गटानेही अर्ज केला आहे. मात्र पालिका प्रशासनाने अद्याप यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही.

शिवाजी पार्क मैदानावर शिवसेनेकडून दसरा मेळावा आयोजित केला जातो. करोनाच्या संकटामुळे मागील दोन वर्ष बंदिस्त सभागृहात मेळावा घेण्यात आला. करोना नियंत्रणात आल्यामुळे यंदा निर्बंध हटवण्यात आले आहेत. त्यामुळे यंदाचा शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानावरच होणार हे निश्चित होते. मात्र शिवसेनेत फूट पडल्यानंतर ४० आमदारांसह बाहेर पडलेल्या शिंदे गटानेही दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्याचे ठरवले आहे. त्यांनीही पालिकेकडे याबाबत अर्ज केला आहे. त्यामुळे राजकीय वातावरणही तापले आहे. कुणाला परवानगी द्यायची हा पेच पालिकासमोर आहे. पालिकेचे अधिकारी याविषयावर उघडपणे बोलण्यास तयार नाहीत.

गणेशोत्सवानंतर याबाबत निर्णय घेतला जाईल असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले होते. आता गणेशोत्सव होताच दसरा मेळाव्याची चर्चा सुरू झाली आहे. पालिका आयुक्तांकडून याबाबत लवकरच निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यानंतरच दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क कुणाला मिळणार याबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे.

Source: https://www.loksatta.com/mumbai/permission-dussehra-gatherings-mumbai-municipality-investigation-continues-mumbai-print-news-ysh-95-3125652/