मुंबई बातम्या

मुंबई-नाशिक महामार्गावर चालकाचा ताबा सुटल्याने अपघात ; वाहन चालक जखमी – Loksatta

ठाणे : मुंबई-नाशिक महामार्गावर शनिवारी रात्री नाशिकहून मुंबईकडे जाणाऱ्या कंटेनर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. हा कंटेनर समोरच्या दिशेने येणाऱ्या ट्रकला आदळला. या अपघातात कंटेनर चालक जीतलाल पाल(५२) हे जखमी झाले असून त्यांच्यावर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मुंबई-नाशिक महामार्गावर शनिवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास कॅडबरी उड्डाणपूलावरुन टायर वाहून नेणारा कंटेनर नाशिकहून मुंबईच्या दिशेने जात होता. त्यादरम्यान चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने समोरच्या दिशेने येणाऱ्या लाकडी फळ्या वाहून नेणाऱ्या ट्रकवर हा कंटेनर आदळून अपघात झाला. या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडले होते. या घटनेची माहिती मिळताच तात्काळ आपत्ती व्यवस्थापन पथक,अग्निशमन दलाचे पथक, राबोडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आपत्ती व्यवस्थापन पथक, अग्निशमन दलाचे पथक आणि राबोडी पोलिसांच्या मदतीने कंटेनरमध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढले.

हेही वाचा : वालधुनी नदीचा रंग झाला गुलाबी ; प्रक्रिया न केलेले रासायनिक सांडपाणी सोडल्याचा संशय

या अपघातात कंटेनर चालक जीतलाल पाल यांच्या डाव्या पायाला दुखापत झाली असून त्याला कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातग्रस्त कंटेनर आणि ट्रक राबोडी पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने रस्त्याच्या बाजूला केले. तसेच रस्त्यावरील सांडलेल्या तेलावर आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकांनी माती टाकून वाहतूकीसाठी मार्ग खुला केला, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली.

Source: https://www.loksatta.com/thane/accident-on-mumbai-nashik-highway-due-to-driver-losing-control-tmb-01-3109714/