मुंबई बातम्या

सौंदर्यवतींच्या स्वप्नांची परिपूर्ती; ऋचा गायकवाड ठरली मुंबई श्रावणक्वीन – Maharashtra Times

मुंबई: तब्बल दोन वर्षे ताणून धरलेली उत्सुकता आणि वामन हरी पेठे ज्वेलर्स प्रस्तुत महाराष्ट्र टाइम्स श्रावणक्वीन २०२२ (Mumbai Shravan Queen 2022) पॉवर्ड बाय टुगेदरिंग अॅप, को पॉवर्ड बाय रिजेन्सी स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या रॅम्पवरचे ते निकालाची उत्सुकता, भीती, घशाला पडलेली कोरड, चेहऱ्यावर भीती न दाखवण्याचा आटोकाट प्रयत्न, सहस्पर्धकांचे हातात धरलेले हात, त्याचवेळी डोळ्यांमध्ये असलेली ती स्वप्ने… आणि या सगळ्या भावनिक आंदोलनांमध्ये झालेली विजेत्याची घोषणा आणि त्यानंतरचा जल्लोष.

महाराष्ट्र टाइम्सच्या २०२२च्या मुंबई श्रावणक्वीन स्पर्धेची विजेती ठरली ऋचा गायकवाड, पहिली उपविजेती ठरली कृपा म्हस्के, तर मोहिका गद्रे हिने यंदा मटा श्रावणक्वीन मुंबई स्पर्धेच्या दुसऱ्या उपविजेतेपदाचा मान पटकावला आहे. या तीनही स्पर्धक आता ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या महाराष्ट्राची श्रावणक्वीन स्पर्धेमध्ये अंतिम विजेतेपदासाठी पुणे, नाशिक आणि नागपूर येथील सौंदर्यवतींशी स्पर्धा करतील.

वांद्रे येथील बालगंधर्व रंगमंदिरामध्ये ‘मटा श्रावणक्वीन’च्या मुंबई विभागाची अंतिम फेरी पार पडली. या सोहळ्याकडे मराठी चित्रपट, नाट्य, मालिकासृष्टीचे लक्ष असते. या स्पर्धेतील अनेक विजेत्या, उपविजेत्यांना श्रावणक्वीन स्पर्धेच्या व्यासपीठावरून मनोरंजनसृष्टीचे दरवाजे खुले झाले आहेत. तसेच अनेक ब्रॅण्डच्या जाहिरातींमध्येही श्रावणक्वीन मॉडेल म्हणून झळकल्या आहेत. यंदाही बालगंधर्व रंगमंदिरामध्ये मनोरंजनसृष्टीतील दिग्गजांनी या स्पर्धकांचे सादरीकरण पाहण्यासाठी खास निमंत्रित म्हणून उपस्थिती लावली होती.

श्रावणक्वीन स्पर्धेची सुरुवात गणेशवंदनेने झाली. सहभागी स्पर्धकांच्या कला सादरीकरणासोबतच या स्पर्धेच्या मांडवाखालून गेलेल्या माजी श्रावणक्वीन आणि स्पर्धकांनीही पुन्हा एकदा याच व्यासपीठावर आपली कला सादर करून प्रेक्षकांच्या मनातील आपले स्थान अधिक दृढ केले. योगिता चव्हाण, रिचा अग्निहोत्री, सोनाली तांबे आणि दुर्वा पोकळे यांनी नृत्य सादरीकरण केले. लोकप्रिय नृत्यांगना फुलवा खामकर यांनी याचे नृत्य दिग्दर्शन केले होते. अभिनय क्षेत्रामध्ये स्थिरावलेल्या या कलाकारांच्या तोडीस तोड अशी तयारी यंदाच्या स्पर्धकांचीही होती.

MT Shravanqueen

रॅम्पवॉक, सादरीकरण, सादरीकरणासाठी केलेला पेहराव यातून २० स्पर्धकांमधून अंतिम फेरीसाठी पाच सौंदर्यवतींची निवड झाली. या अंतिम फेरीमध्ये स्वातंत्र्य म्हणजे काय, हा प्रश्न त्यांना विचारण्यात आला आणि या प्रश्नाचे उत्तर या स्पर्धकांना ९० सेकंदांमध्ये द्यायचे होते. या उत्तराने महाराष्ट्र टाइम्स श्रावणक्वीन स्पर्धेच्या मुंबई फेरीतील विजेत्याचा निर्णय झाला. मुंबईच्या अंतिम फेरीचे परीक्षण सिनेमॅटोग्राफर, दिग्दर्शक महेश लिमये, संवादलेखिका-अभिनेत्री मुग्धा गोडबोले, फॅशन डिझायनर पूर्णिमा ओक, अभिनेत्री गिरीजा ओक आणि लेखक-अभिनेते चिन्मय मांडलेकर यांनी केले. स्पर्धकांवर असलेला ताण गृहित धरून त्यांचा आत्मविश्वासही परीक्षकांनी यावेळी वाढवला. श्रावणक्वीन स्पर्धेची ही संध्याकाळ अधिक रंगतदार झाली ती पुष्कराज चिरपुटकर आणि स्वानंदी टिकेकर यांच्या सूत्रसंचालनामुळे.

श्रावणक्वीन अन्य पुरस्कार

मिस फोटोजनिक – कार्तिकी अदमाने
मिस ब्युटिफुल हेअर – कोमल पारवे
मिस कॅटवॉक – रिचा गायकर
मिस ब्युटिफुल स्किन – श्रावणी पवार
मिस कन्जिनिअॅलिटी – ऋचा गायकवाड
मिस पर्सनॅलिटी – स्वामिनी वाडकर
मिस ब्युटिफुल आइज – क्रांती गोडांबे
मिस ब्युटिफुल स्माइल – रिचा गायकर
मिस टॅलेंट – ऋचा गायकवाड
टूगेदरिंग डिजिटल क्वीन – नयना सावर्डेकर

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/maharashtra-times-shravan-queen-mumbai-2022-won-by-rucha-gaikwad/articleshow/93606790.cms